Tarun Bharat

कोरोनाबाधित नेत्यांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प

Advertisements

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पुष्टीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोविड -19 च्या जाळय़ात अडकल्याने जागतिक पातळीवरील महनीय नेत्यांच्या गटामध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाले आहे. त्यातच सध्या अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असल्याने ट्रम्प यांना मोठा फटका बसू शकतो. दुसरी प्रेसिडेंशियल डिबेट 13 दिवसांवर असतानाच ट्रम्प यांना दणका बसला आहे. येत्या 13 दिवसात त्यांचा अहवाल निगेटिव्ह न आल्यास 15 ऑक्टोबरला होणाऱया डिबेटमध्ये सहभागी होणेही ट्रम्प यांना अवघड जाईल. क्वारंटाईन कालावधी 14 दिवसांचा असल्यामुळे त्यांची डिबेटमध्ये सहभागी होण्याची शक्यता खूप कमी आहे.

केवळ दोन वेळा दिसले मास्कमध्ये…

ट्रम्प हे केवळ दोन वेळाच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून दिसले. 12 जुलैला ते वॉशिंग्टनच्या वॉल्टर रील मिलिट्री हॉस्पिटलच्या दौऱयावर जाताना त्यांनी निळा मास्क वापरला होता. त्यानंतर गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टिस गिन्सबर्ग यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी गेले असता त्यांनी मास्कचा वापर केला होता.

कोरोना विषाणूची बाधा झालेले जगभरातील काही महत्त्वाचे नेते

ब्राझीलचे अध्यक्ष जेयर बोल्सोनारो :

यांनी जुलैमध्ये आपल्याला कोरोना झाल्याची घोषणा केली होती. त्याचदरम्यान त्यांनी मलेरियासाठी वापरल्या जाणाऱया हायड्रोक्लोरोक्विन या औषधाचे जाहीर कौतुक केले होते. स्वत: बोल्सोनारो यांनीही हे औषध घेतले होते.

होंडुरासचे अध्यक्ष जुआन ऑरलँडो हर्नांडेझ :

हेंडुरासच्या अध्यक्षांनी जूनमध्ये आपल्या कोरोना संसर्ग झाल्याची माहिती जारी केली. जुआन हर्नांडेझ यांच्यासह त्यांची पत्नी आणि संपर्कातील अन्य दोन अधिकाऱयांनाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले होते.

ग्वाटेमालाचे अध्यक्ष अलेजांद्रो गियामाटेई :

अलेजांद्रो यांना सप्टेंबर महिन्यात कोरोना झाला होता. सुरुवातीला त्यांनी “आपल्याला किरकोळ लक्षणे आहेत’’ असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर काही दिवसातच त्यांनी कोरोनावर मात केली होती.

इराणचे उपराष्ट्रपती इशाक जहांगिरी :

इराणमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. सर्वसामान्य लोकांसह नेते व उच्चपदस्थांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. यामध्ये उपराष्ट्रपती (आय) इशाक जहांगिरी आणि उपराष्ट्रपती मसुमेह इबताकर यांचा समावेश आहे.

बोलिव्हियाच्या अंतरिम अध्यक्षा जीनिन अनेज :

जीनिन अनेज हय़ा जुलैमध्ये संसर्गग्रस्त आढळल्या होत्या. आपली तब्येत बरी असल्याचा दावा त्या करत होत्या. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते.

डोमिनिकन रिपब्लिकचे अध्यक्ष लुईस अबिंदर :

यांना निवडणूक प्रचारादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोना संसर्गामुळे जुलै महिन्यात होणाऱया निवडणुकांपासून त्यांना काही दिवस दूर रहावे लागले. तरीही निवडणुकीतील विजयानंतर अलिकडेच त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन :

जॉन्सन हे कोविड-19 मुळे बाधित झालेले जगातील पहिले मोठे नेते आहेत. जॉन्सन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आल्यानंतर त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांना आयसीयूमध्येही ठेवले गेले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता भासली नसली तरी ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला होता, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली.

Related Stories

अल्प प्रतिसादाने लसीचा साठा फेकण्याची वेळ

Patil_p

तालिबानचा खरा चेहरा झाला उघड

Patil_p

इराकमध्ये शिया मौलवी विजयासमीप

Patil_p

लढाऊ विमाने खरेदीसाठी स्वित्झर्लंडमधील नागरिकांचा विरोध

datta jadhav

पंजशीरमध्ये तालिबानच्या ७०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा

Abhijeet Shinde

40 वर्षांनी नेपाळला पृथ्वीच्या कक्षेत स्थान

Patil_p
error: Content is protected !!