संसर्गाचा नवा दुष्परिणाम : अमेरिकेत होतेय व्यापक अध्ययन अन् संशोधन : मानसिक तणाव ठरले प्रमुख कारण
कोरोना विषाणूप्रकरणी आतापर्यंत तो फुफ्फुसांना लक्ष्य करत असल्याचे दिसून आले होते. परंतु अमेरिकेत हा विषाणू लोकांच्या केसगळतीचे कारण ठरला आहे. केस गळण्याची समस्या घेऊन येणाऱया रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. केस गळतीमागे कोरोना विषाणू कारणीभूत असू शकतो. ही समस्या कोविड रुग्ण आणि सामान्य लोकांना समानपणे प्रभावित करत असल्याचे डॉक्टरांचे सांगणे आहे.
तणाव मोठे कारण
आजार, मोठी शस्त्रक्रिया किंवा भावनात्मक समस्येला तोंड देणारे लोक केसगळतीचा अनुभव अधिक घेत असतात. परंतु आता कोविड-19 मधून बरे झालेले रुग्ण केसगळतीचा अनुभव घेत आहेत. परंतु याचा कारण विषाणू नसून यातून होणारा मानसिक तणाव आहे. अनेक जण विषाणूच्या संपर्कात आले नाहीत, तेही केसगळतीने त्रस्त आहेत. याचे कारण नोकरी जाण्याचा तणाव, आर्थिक अडचणी किंवा ओळखीच्याचा मृत्यू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या महामारीच्या आसपास अनेक प्रकारचे तणाव आहेत. आम्ही सध्या केसगळती पाहत आहोत, कारण अद्याप तणाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. दर आठवडय़ाला या त्रासाशी झगडणारे सुमारे 20 रुग्ण हाताळत असल्याची माहिती क्लीवलँड क्लीनिकमध्ये डर्मेटोलॉजीच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर शिल्पी खेत्रपाल यांनी दिली आहे.
सर्वेक्षणातही दिसून आले
कोविडनंतर दिसून येणाऱया लक्षणांकरता जुलैमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात 1567 रुग्णांचा एक समूह सामील होता. सर्वाइवर कॉर्प्स आणि इंडियाना युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ मेडिसीनमधील सहाय्यक संशोधक प्राध्यापिका नताली लँबर्ट यांच्यानुसार यातील 423 जणांचे केस असामान्य स्वरुपात गळत होते. डॉक्टरांनुसार बहुतांश रुग्णांसाठी ही स्थिती तात्पुरती असली तरीही अनेक महिन्यांपर्यंत राहू शकते.
दोन प्रकारे केसांना नुकसान
व्यक्तीचे केस दररोज सामान्याच्या तुलनेत अधिक गळतात याला टेलोजन एफ्लूवियम म्हटले जाते. सर्वसाधारणपणे असे तणावाच्या अनुभवाच्या महिन्यांनी दिसून येते. एक स्वस्थ केसचक्रात बहुतांश केस वाढण्याच्या प्रक्रियेत असतात, अत्यंत कमी केसांचा विकास थांबलेला असतो आणि सुमारे 10 टक्के केस गळण्याच्या टप्प्यात असतात. टेलोजन एफ्लूवियमध्ये लोकांचे केस अधिक गळतात आणि कमी प्रमाणात वाढतात. सर्वसाधारपणे अशा स्थितीला महिला गरोदरपणानंतर 6 महिन्यांपर्यंत तोंड देतात. जर तणाव कायम राहिला किंवा पुन्हा आल्यास काही लोकांमध्ये ही क्रोनिक शेडिंग कंडिशन तयार होते.
दुसरा प्रकार एलोपेसिया


दुसऱया प्रकारच्या हेयरलॉसला एलोपेसिया एरिएटा म्हटले जाते, यात इम्युन सिस्टीम हेयर फॉलिसिल्सवर हल्ला करते. सर्वसाधारणपणे याची सुरुवात केस आणि दाढीच्या मुळांवर एका डागाच्या स्वरुपात होत असल्याची माहिती सेंटर मिशिगन युनिव्हर्सिटीतील सायकॅट्रिस्ट आणि डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर मोहम्मद जाफरानी यांनी दिली आहे.
एलोपेसियाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. यातील सर्वजण कोविड-19 चे रुग्ण नव्हते. परंतु ज्यांना हा आजार होता, त्यांच्यात ही समस्या वेगाने वाढत होती. त्यांच्या भुवया आणि पापण्यांच्या केसाचीही गळती सुरू झाली होती, असे माउंट सिनाईच्या इकान स्कुल ऑफ मेडिसीनच्या डर्मेटोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉक्टर एमा गटमॅन यास्की यांनी सांगितले आहे. स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल वाढणे किंवा रक्तपुरवठा प्रभावित होणे याचे कारण असू शकते असे डॉक्टर होगन यांनी म्हटले आहे.
तज्ञांचा सल्ला


काही प्रकरणांमध्ये उपचाराशिवाय सुधारणा होते, परंतु काही प्रकरणांमध्ये स्टेरॉयड इंजेक्शनची गरज भासते. काही कायमस्वरुपी समस्याही असू शकतात. प्रारंभिक अवस्थेतच उपचार न केल्यास ती कायमस्वरुपी राहू शकते असे डॉक्टर यास्की यांनी म्हटले आहे. तज्ञ चांगले पोषण आणि बायोटीन म्हणजेच व्हिटामिन, योग, स्काल्प मसाज किंवा ध्यान करण्याचा सल्ला देतात. केसगळतीमुळे तणावाला सामोरे जाणाऱया लोकांना सायकोथेरेपीचा सल्ला डॉक्टर जाफरानी यांनी दिला आहे.
फ्रान्समध्ये संसर्ग वाढताच


फ्रान्समध्ये दिवसभरात 14 हजार 412 नवे बाधित आढळले आहेत. सरकार कठोर निर्बंध लादू इच्छित असले तरीही व्यावसायिक संघटना आणि सर्वसामान्य लोक याच्या विरोधात उतरले आहेत. मार्सिले शहरात दोन क्लस्टर मिळाले असून दोन्ही रेस्टॉरंट्सशी संबंधित आहेत.
स्वीडन : चाचणीची स्वस्त पद्धत


कोरोना संसर्गाच्या जलद, स्वस्त आणि अचूक परीक्षणासाठी संशोधकांनी एक नवी पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमुळे महागडय़ा चाचणीपासून मुक्तता मिळू शकते. स्वीडनच्या करोलिंस्का इन्स्टीटय़ूटमधील संशोधन नेचर कम्युनिकेशन्स नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जॉन्सन अडचणीत


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोविड-19 ची दुसरी लाट पाहता अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. नागरिकांकडून याला विरोध सुरू आहे. जॉन्सन यांनी संसद आणि खासदारांना विश्वासात न घेता निर्बंधांचा आदेश काढल्याने लोकांमध्ये सरकारविषयी नाराजी वाढत असल्याचे खासदारांचे म्हणणे आहे. निर्बंधांच्या पहिल्या आठवडय़ात सरकारच्या लोकप्रियतेत तीन टक्क्यांची घट झाल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.