Tarun Bharat

कोरोनामुळे राज्यात एकाच दिवसात तिघांचे बळी

Advertisements

तिन्ही व्यक्ती वास्कोच्या युवकासह दोन वयस्क व्यक्तींचा समावेश

प्रतिनिधी/ मडगाव, वास्को

कोरोनामुळे काल शनिवारी एकाच दिवशी तिघांचा बळी गेला. त्यात एका युवकासह  दोन वयस्क व्यक्तांचा समावेश आहे. कोविडमुळे एकाच दिवशी तिघांचा बळी जाण्याची पहिली घटना आहे. या तिन्ही व्यक्ती वास्कोतील आहेत. दोन बायणातील तर एक रूमडावाडा-वास्को येथील आहे. वास्कोत आतापर्यंत कोरोनामुळे सातजणांचा बळी गेला आहे.

शनिवारी पहाटे 3 वाजता जेटी रूमडावाडा-हेडलँण्डसडा, वास्को येथील श्रीमती मंगला मोरेश्वर मयेकर (80) हिचा कोविडमुळे बळी गेला. गेल्या काही दिवसामागे तिला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तिला मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा आजार होता.  या कुटुंबातील पाच सदस्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यात निगेटिव्ह आलेल्या तिघांना कॉरन्टाईन करण्यात आले होते तर दोघांना मडगावच्या कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. कॉरन्टाईन व उपचार पूर्ण करून इतर सर्व जण घरी परतले होते. मात्र, वृद्ध महिलेची प्रकृती खालावली व तिला मृत्यू आला.

युवकाचा बळी

दरम्यान, सकाळी 10.30 वा. सासमोळे-बायणा येथील शफिक हुसेन ऊर्फ लाला (31) या युवकाचा कोविडमुळे बळी गेला. या युवकाला अन्य कोणता आजार होता का ? यासंदर्भातील माहिती मिळू शकलेली नाही. हा युवक अतिदक्षता विभागात नव्हता तर वॉर्डमध्ये होता. मात्र, त्याला कोरोनाने मृत्यू आलेला असला तरी त्याच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत युवकाला बऱयाच दिवसांपूर्वी चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या यकृतामध्ये बिघाड असल्याचे त्यावेळी निदान झाले होते. काही दिवस उपचार करून तो घरी गेला होता. मात्र, पुन्हा त्रास होऊ लागल्याने तो पुन्हा चिखलीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. गोमेकॉमध्ये उपचार करताना त्याच्या झालेल्या कोविड चाचणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याने त्याला मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तेथे त्याला शनिवारी पहाटे मृत्यू आला. मयत युवक दाबोळी विमानतळावर टॅक्सी व्यवसाय करीत होता. त्याला पत्नी व दोन मुले आहेत. एका भाडय़ाच्या घरात राहणाऱया या कुटुंबात अन्य तीन भाऊ व बहिणी तसेच आई असून तीसुद्धा कोरोनाच्या सावटाखाली आलेली आहेत. त्यांची तपासणी होणार आहे. दरम्यान, संध्याकाळी सदर युवकावर वास्कोत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शनिवारी संध्याकाळी 3.30च्या दरम्यान बायणा वास्को येथील अमीर बेग (80) यांचा कोविड हॉस्पिटलमध्येच बळी गेला. ही व्यक्ती वयोवृद्ध असल्याने कोविडचा आजार पेलणे तिला शक्य झाले नाही. कोविड हॉस्पिटलच्या वॉर्डातच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सध्या कोविड हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग भरला असून यातील बऱयाच रुग्णांची प्रकृती खालावली आहे. सध्या अतिदक्षता विभागात सहा जणांवर उपचार सुरू आहेत. त्यात कुंकळळीतील भाजपचे आमदार क्लाफास डायस यांचाही समावेश आहे.

वास्कोतील संख्या पोहचली सातवर

वास्कोत कोविडमुळे बळी गेलेल्याची संख्या सध्या सातवर पोहचली आहे. सुरुवातीला खारीवाडा-वास्को येथील बाळा चोडणकर यांचा कोविड हॉस्पिटलमध्ये बळी गेला होता. त्यानतंर ट्रॉलवर काम करणाऱया एका युवकाला राहत्या खोलीत मृत्यू आला होता. या युवकाला ताप येत होता व त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर वास्को पालिकेचे नगरसेवक पास्कॉल डिसोझा यांचा कोविड हॉस्पिटमध्ये बळी गेला होता. खारीवाडय़ावरील या तीन व्यक्ती होत्या.

न्यू वाडे येथील महम्मद हनीफ याचा ही कोविडमुळे बळी गेला. त्याला दहा दिवस ताप येत होता. पण, त्याकडे त्याने दुर्लक्ष केल्याने शेवटी गोमेकॉत त्याला मृत्यू आला. तर काल बायणा-वास्को येथील दोघांना मृत्यू आला. तर रूमडावाडा-वास्को येथील महिलेला बळी गेला. हे सर्वजण कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सातपैकी पाचजण हे कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. तर दोघे घरीच होते.

वास्को व मुरगाव परिसरात चिंतेचे सावट

 दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या व सतत वाढणाऱया कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे वास्को मुरगाव परिसरात चिंता पसरलेली आहे.

   मुरगावचे नगरसेवक पास्कॉल डिसोझा यांच्यासह खारीवाडा भागातील तिघांच्या मृत्यूनंतर नवेवाडेतील एका टॅक्सीव्यावसायिकाचा तीनच दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. काल शनिवारी सकाळी पुन्हा वास्कोतील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची बातमी वास्कोत धडकली. संध्याकाळपर्यंत त्यात आणखीन एकाची भर पडली. त्यामुळे मागच्या पंधरा दिवसांत वास्कोतील कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांची संख्या सात झालेली असून दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या व वाढत जाणाऱया मृत्यूमुळे वास्को व मुरगाव परिसरात चिंतेचे सावट पसरलेले आहे.

खारीवाडा कंटेनमेंट झोनमध्ये मोठय़ा प्रमाणात चाचण्या करा    दरम्यान, वास्को शहराला जवळ असलेल्या खारीवाडा भागाचाही कंटेनमेंट झोनमध्ये समावेश करण्यात आल्याने स्थानिक लोकांच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ झालेली आहे. यासंबंधी शनिवारी सकाळी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी उपजिल्हाधिकारी व इतर अधिकाऱयांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत आमदारांनी काही उपयुक्त सूचना अधिकाऱयांना केल्या. मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनबाबत वाईट अनुभव घेतलेल्या आमदारांनी यावेळी खारीवाडा भागातील कंटेनमेंट झोनमध्ये मोठय़ा संख्येने कोविड चाचण्या करण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे. जे कोणी कोरोनाबाधित आढळून येतात त्यांना उपचारासाठी बाहेर काढा व झोन लवकर खुला करा. या झोनमध्ये कोरोनाबाधित तपासणीविना राहिल्यास संसर्गाचा पसार होण्यास मदत होईल. तसेच या झोनमधील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा प्राधान्याने करा. कोणताही निर्णय घेताना स्थानिक नगरसेवक व पालिका मंडळालाही विश्वासात घ्या, अशा सूचना आमदार कार्लुस आल्मेदा यांनी शासकीय अधिकाऱयांना केल्या आहेत.

Related Stories

चिखली कोलवाळ येथे बांध फुटल्याने पाणी शेतात

Omkar B

ज्योतीने तेजाची आरती…!

Omkar B

म्हादईप्रश्नी गोव्यावर अन्याय होऊ देणार नाही

tarunbharat

दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वर्ष समाप्तीपूर्वी थकबाकी भरा

Omkar B

आमदार युरी आलेमाव यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

Amit Kulkarni

पणजी येथे 16 रोजी ‘गुणीरंग संगीत महोत्सव’

Amit Kulkarni
error: Content is protected !!