प्रतिनिधी / सातारा
आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे. व्यापाऱ्यांना नाही.. लॉकडाऊन हटवा व्यापारी जगवा, शासनाच्या नियमांचे पालन करु व्यापार बंद ठेवून नका उपाशी मारु…,माझा व्यवसाय माझी जबाबदारी, मत छिनो हमारा कारोभार, हमारा है परिवार, न्याय द्या न्याय द्या व्यापाऱ्यांना न्याय द्या, अशी घोषवाक्ये हाती धरत वाई व्यापारी महासंघाच्यावतीने मानवी साखळी करुन प्रशासनाचा निषेध नोंदवला. व्यापाऱ्यांनी सकाळी 10 ते 11 या वेळेत हातात बोर्ड धरुन मुक आंदोलन केले.
या आंदोलनापूर्वी व्यापाऱ्यांच्या दोन बैठका पार पडल्या. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. किसनवीर चौकापासून लक्ष्मी मंदिरासह रविवार पेठ, गणपती आळी, धर्मपूरी आदी व्यापारी पेठेतले सर्व व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते. या मानवी साखळीत व्यापारी संघटनेच्या घरातील महिला, मुले व दुकानातील कामगार यांचाही समावेश होता. या मानवी साखळी मध्ये सफेद शर्ट अथवा टि शर्ट परिधान करुन सहभागी झाले होते. या आंदोलनात सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले होते. प्रत्येकाने मास्कचा वापर केलेला होता. प्रशासनाचा निषेध अनोख्या पद्धतीने नोंदवला होता.
वाईमध्येही तरुण भारतचाच गाजवाजा
तरुण भारतने प्रशासनाच्या विरोधात प्रखरपणे मांडलेली भूमिका वाईमधील व्यापाऱयांना चांगलीच आवडली आहे. त्यामुळे तरुण भारतचाच वाई शहरात गाजावाजा सुरु आहे.

