Tarun Bharat

कोरोनावरील लस येत्या वर्षारंभी

एकाहून अधिक लसी उपलब्ध होण्याची शक्यता : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात कोरोनावरील लस आणण्याची तयारी जोरात सुरू असून पुढील वर्षाच्या सुरुवातीस ती बाजारात उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी मंत्र्यांच्या गटाच्या बैठकीत ही माहिती दिली. इतकेच नव्हे, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीस देशात एकापेक्षा जास्त कोरोना लसीही मिळू शकतील. आमचे तज्ञ लसीच्या वितरणासाठी योजना आखत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लसीच्या शर्यतीत सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठ बरेच पुढे आहे. सध्या भारतात कोरोना विषाणूवरील चार लसी क्लीनिकल चाचणीपूर्व प्रगत टप्प्यात असून भारत बायोटेक, सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि झाइडस कॅडिला अशी नामवंत देशी आस्थापने लसीच्या शोधात गुंतलेली आहेत. ‘पुढील वर्षाच्या सुरुवातीस देशात आम्हाला बहुधा एकापेक्षा अधिक स्रोतांकडून लस मिळेल अशी अपेक्षा आहे. आमचे तज्ञांचे गट लसींचे वितरण कसे राबवायचे यासाठी योजना व धोरण आखत आहेत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्र्यांच्या गटाच्या बैठकीत सांगितले. प्रथम लस दिली जाईल आणि त्याचबरोबर अर्थातच ‘कोल्ड चेन’ सुविधा मजबूत केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्य विश्वनाथन यांनी देखील कोरोना विषाणूची लस 2020 च्या अखेर किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस नोंदणीसाठी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केलेली आहे. लस बनविणाऱया 40 कंपन्या क्लीनिकल स्तरावरील विविध टप्प्यांत आहेत. यातील 10 लसी चाचणीच्या तिसऱया टप्प्यात आहेत. या लसी सुरक्षित असल्याचे दिसत आहे आणि चाचण्यांमध्ये त्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत, असे त्यांनी म्हटलेले आहे.

‘कोल्ड स्टोअरेज’वर भर

लस तयार झाल्यावर योग्य प्रकारे वाटप करता यावे म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारांकडून माहिती मिळवत आहे. देशात कोरोनावरील सर्व लसी उपलब्ध करण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे यापूर्वी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केलेले आहे. कोविड-19 वरील लस काही महिन्यांत उपलब्ध होण्याची शक्मयता असल्याने सरकारने मोठय़ा प्रमाणात कोल्ड स्टोअरेज व्यवस्था निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. देशभरात लसींची उपलब्धता सुनिश्चित करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय तज्ञांचा एक गट औषध क्षेत्र, अन्न प्रक्रिया आणि कृषी क्षेत्रातील खासगी व सरकारी कंपन्यांशी चर्चा करत आहे. त्याचप्रमाणे घरी खाद्यपदार्थ पुरविणाऱया स्विगी आणि झोमाटोसारख्या कंपन्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे.

लस वितरण योजनेची लवकरच घोषणा ?

लसी साठवून ठेवून वितरित करण्याच्या दृष्टीने अगदी तालुका स्तरावर रेफ्रिजरेटर, कोल्ड स्टोरेज इत्यादींची व्यवस्था करणे हा या संपूर्ण धडपडीमागचा हेतू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील आठवडय़ाच्या मध्यासपर्यंत लस वितरणाची योजना जाहीर होण्याची शक्मयता असल्याचे सूत्रांनी सांगितले. बहुतेक करून लसी दोन ते आठ डिग्री सेल्सियस तापमानात साठविल्या जातील. बहुतांश लसी द्रव स्वरूपात ठेवल्या जातील. कोल्ड स्टोअरेजची साखळी तयार करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले आहेत, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी 2021 च्या पहिल्या तिमाहीत कोविड-19 ची लस उपलब्ध होईल, असे जाहीर केले होते. भारतातील लोकसंख्येचा आकार लक्षात घेता एक लस किंवा लस उत्पादक संपूर्ण देशाची लसीकरणाची गरज पूर्ण करू शकणार नाही, असे हर्षवर्धन यांनी रविवारी म्हटले होते. त्यामुळे देशात कोविडवरील अनेक लसी त्यांच्या उपलब्धतेनुसार उतरविण्याची शक्यता पडताळून पाहण्याचा पर्याय आमच्यासाठी खुला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

Related Stories

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या 12 प्रचार सभा

datta jadhav

परिस्थितीप्रमाणे धोरण बदलणे आवश्यक

Amit Kulkarni

गुगलचे सीईओ पिचाई ‘पद्मभूषण’ने सन्मानित

Patil_p

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून NDRF टीमचे कौतुक

Archana Banage

अयोध्या रामजन्मभूमी परिसरातील शिवलिंगाचा 28 वर्षांनी रुद्राभिषेक

Patil_p

शोपियानमध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

prashant_c