Tarun Bharat

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी

आज गोव्यासह देश आणि संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्याखाली आले आहे. गत वर्षभरापासून आम्ही या महामारीचा सामना करत आहोत. त्याकामी आरोग्य खाते, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा यांच्यासह संपूर्ण सरकारी ताकद कोरोना व्यवस्थापनासाठी वावरत आहे. अशावेळी या महामारीवर मात करण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयाचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. पूर्ण लॉकडाऊन हा या समस्येवर उपाय होऊ शकत नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आपल्या वाढदिनी सायंकाळी राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. गत मार्च महिन्यापासून जरी गोव्यात कमीजास्त प्रमाणात कोरोनारुग्ण सापडत होते, तरीही मध्यंतरी गोवा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. परंतु आता दुसऱया लाटेच्या विळख्यात गोवा सापडला आहे. हे अत्यंत दुःखदायक आहे. रोज 18- 20 रुग्ण बळी पडत आहेत. सरकारने सर्व ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा व उपाययोजना उपलब्ध केलेल्या आहेत. गरज आहे ती प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याची. कोणतीही लक्षणे दिसून आल्यास त्वरित तपासून घ्या, हयगय करू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सध्या बळी जाणाऱया कोरोना रुग्णांपैकी रोज तीन ते चार जणांना आधीच मृत्यू आलेला असतो. तर तीन ते चार जणांचा दाखल केल्यानंतर 24 तासातच मृत्यू होतो. यामागील कारणे म्हणजे ते अंतिम क्षणी दाखल झालेले असता. त्यामुळे डॉक्टरही काहीच करू शकत नाहीत. रुग्णांचे कोरोना व्यवस्थापन योग्य होण्यासाठी त्यांच्यावर लक्षणे दिसताक्षणीच उपचार झाले पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टीका करण्यापेक्षा सूचना करा

सध्या अडीज लाख पेक्षा जास्त लोकांनी लस घेतली आहे. त्यापैकी एखाद्यास चुकूनसुद्धा कोरोना बाधा झाल्यास घाबरू नका, तसेच येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. असे सांगताना, सर्वांनी लस घ्यावी व सरकारला सहकार्य करावे. ही लस मोफत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा विषयांवर विरोधकांनी टीका करण्यापेक्षा सरकारला सूचना कराव्यात, टीका करणाऱयांची पर्वा करत नाही. आपले जीवन सर्वस्वी गोवा आणि गोमंतकीयांसाठी आहे. आपण आपले काम करतच राहणार. सूचना करणाऱयांचे आम्ही स्वागत करू व अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

गोवा स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने अनेक कार्यक्रम

गोवा स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील दहा महिन्यांच्या कालावधित अनेक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सरकारच्या या प्रयत्नांना सर्व गोमंतकीयांनी सहकार्य करावे, एखाद्यास कोणतीही सूचना, सल्ला द्यावयाचा असले तर अवश्य द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

म्हादई, खाण विषयी सरकार गंभीर

म्हादई आणि खाण या विषयात सरकारला अवश्य विजय प्राप्त होईल. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे. म्हादई, खाण आदी विषयांवरून अनेक सतत टीका करत असतात, परंतु आपल्या सरकारचे दोन्ही विषयात गांभीर्याने प्रयत्न चालू आहेत, खाण महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच खाणी सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्लाझ्मा दान करणाऱयांनी पुढे यावे

सध्या अनेक रुग्णांना प्लाझ्माची मोठी गरज आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱयांनी पुढे यावे. त्यांचा योग्य तो मानसन्मान राखण्यात येईल. राज्यातील विविध इस्पितळात रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. प्रत्येकाला आपली व्यक्ती प्रिय असतेच. तरीही अनेकदा एखाद्या रुग्णाकडे लक्ष देण्यात डॉक्टरना थोडा उशीर लागू शकतो. मात्र त्यासाठी लोकांनी डॉक्टरांवर राग काढू नये, त्यांची अडचण समजून घ्यावी, कोणताही डॉक्टर रुग्णाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. लोकांनी समंजसपणा दाखवावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लवकरच राज्यात दोन ऑक्सिजन प्लांट

गोमेकॉतील ऑक्सिजन उपलब्धतेची काल आपण माहिती घेतली. लवकरच राज्यात दोन ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यात येणार आहेत. त्यातील एक गोमेकॉत तर दुसर उपजिल्हा इस्पितळात स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्राचे गोव्याकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे आपण केंद्राचे आभार मानतो, असे सांगून कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षत सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

सुपर स्पेशालिटी इस्पितळातही तपासणीचा विचार

सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता गोमेकॉजवळ उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी इस्पितळातही कोरोना रुग्णांची तपासणी करण्याचा विचार असून लवकरच त्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. कोरोनाची दुसरी लाट अजूनही वाढण्याचा धोका असून, त्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय नेत्यांकडून शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त कोणताही जाहीर कार्यक्रम आयोजित केला नसला तरी दिवसभरात शुभेच्छा देणारे असंख्य फोन, ट्विट आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते आणि राष्ट्रीय पदाधिकाऱयांचा त्यात समावेश होता. हजारो चाहत्यांनी अन्य विविध माध्यमातून शुभेच्छा व्यक्त केल्या. त्या सर्वांचे आपण आभार व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

मडगावातील सरकारी, सार्वजनिक इमारतींचे फायर ऑडिट आवश्यक

Amit Kulkarni

राज्यात 15 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

Amit Kulkarni

प्रभात देसाई यांना फार्मसी क्षेत्रात डॉक्टरेट

Amit Kulkarni

पणजी मनपा क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण सुरू

Omkar B

आजपासून मासेमारीला प्रारंभ

Amit Kulkarni

ऑनलाईन कर वसुलीसाठी मडगाव पालिकेचे प्रयत्न

Omkar B