कोलकाता
कोरोना व्हायरस महामारीने संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंत कोव्हिड-19 च्या संकटात जागतिक स्तरावर बळींची संख्या सुमारे 70 हजार झाली असून लाखो जणांना या व्हायरसची बाधा झाली आहे. फिफातर्फे कोरोना जागरूकता मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत आता कोलकाताचे बलाढय़ फुटबॉल क्लब मोहन बगान आणि इस्ट बंगाल सहभागी होणार आहेत.
विश्व आरोग्य संघटना तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमाने आणि फिफाच्या सहकाऱयाने मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेत जागतिक स्तरावरील फुटबॉलपटू सहभागी होणार आहेत.
रियल माद्रीद, एफसी बार्सिलोना, लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड या फुटबॉल क्लबनी आपल्या देशामध्ये फिफाच्या या मोहिमेला यापूर्वीच प्रारंभ केला आहे. जगातील सर्व जनतेला कोरोना व्हायरसपासून सावधगिरी बाळगण्याकरिता आपल्या घरामध्ये सुखरूप राहण्याचा संदेश या मोहिमेतून फिफाने दिला आहे.