Tarun Bharat

‘कोरोना’विरोधी लढाईतील ‘प्रंटलायनर्स’

5 लाखांहून अधिक लोकांच्या चाचण्या…

मोठय़ा प्रमाणात चाचण्या घेणं हा ‘कोव्हिड-19’च्या साथीला रोखण्यासाठीचा एक प्रभावी उपाय मानला जातो. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत भारतात 5 लाख 41 हजार लोकांच्या चाचण्या करण्यात आल्याहेत (10 लाख लोकांमागं 362 चाचण्या असं हे प्रमाण…मागील 10 दिवसांत दुप्पट). सध्या दिवसाकाठी 55 हजार चाचण्या घेण्यात येत असून त्या 31 मेपर्यंत 1 लाखांवर नेण्याचा सरकारनं इरादा बाळगलाय….कोरोना विषाणूनं जेव्हा भारतात शिरकाव केला तेव्हा सुरुवातीला चाचण्या घेणारी ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी’ची एकच प्रयोगशाळा पुण्यात होती. मात्र मागील तीन महिन्यांत 87 खासगी लॅब्सना दिमतीला घेण्याबरोबर सरकारी प्रयोगशाळांची संख्या भरपूर वाढविण्यात आलीय. सरकारी प्रयोगशाळांचा आकडा आता 300 वर पोहोचविण्याचा संकल्प सरकारनं सोडलाय…

400 हून अधिक जिल्हय़ांत 4 लाख खाटा सज्ज…

कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी खासगी क्षेत्राचीही मदत घेतलेली असून याअंतर्गत 400 हून अधिक जिल्हय़ांतील इस्पितळं, गेस्ट हाऊसेस तसंच हॉस्टेल्स यांचं त्रिस्तरीय ‘कोव्हिड-19’ आरोग्य केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आलंय. त्यात जवळजवळ 4 लाख ‘आयसोलेटेड’ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक तृतियांश खाटा ‘कोरोना’नं जिथं सर्वांत जास्त उत्पात माजविलाय त्या महाराष्ट्रात असून त्यामागोमाग प्रत्येकी 8 टक्क्यांनिशी तामिळनाडू व मध्यप्रदेश आणि 7 टक्क्यांनिशी राजस्थानचा क्रमांक लागतो…यापैकी सुमारे 40 हजार खाटा आहेत त्या अतिदक्षता विभागातील…

1.88 कोटी ‘पीपीई’साठी ऑर्डर्स…

‘कोरोना’ विषाणूविरुद्धच्या लढाईत आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱयांनी सुरक्षित राहण्यासाठी ‘पीपीई’ म्हणजेच ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स’ची (वैयक्तिक सुरक्षा उपकरणं) अत्यंत गरज असून भारतात त्यांची निर्मिती करणारे 77 उत्पादक आहेत. सध्या सरकारनं 1.88 कोटी ‘पीपीई’साठी ऑर्डर्स दिलेल्या असून देशात उपलब्ध असलेल्या ‘एन-95’ मास्कचा आकडा 25 लाखांच्या घरात जातो. याशिवाय आणखी 2.5 कोटी मास्कसाठी ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत…

‘पीपीई’ म्हणजे नेमकं काय ?…

‘पीपीई’चं स्वरूप आरोग्य कर्मचारी कोणत्या स्वरूपाचे कामकाज हाताळतात त्याप्रमाणं बदलतं. इस्पितळाच्या ‘ओपीडी’मध्ये काम करणारे डॉक्टर वा परिचारिका यांना ‘कोव्हिड-19’ रुग्णांच्या जवळ राहून काम करावं लागत असतं. त्यांना तपासणीसाठी लागणाऱया ‘पीपीई’मध्ये ‘एन-95’ मास्क, गॉगल्स, जलप्रतिबंधक गाऊन आणि हातमोज्यांच्या दोन जोडय़ांचा समावेश होतो…काही डॉक्टर व परिचारिकांना चाचणीसाठी नमुने घेण्याचं काम करावं लागत असतं. त्यांच्या कीटमध्ये वरील साऱयांच्या जोडीला शू कव्हर, चेहऱयावरील आवरण (हूड) यांचा समावेश होतो. याशिवाय प्रयोगशाळेत नमुन्यांची चाचणी करण्याचे काम करणाऱयांनादेखील ‘ओपीडी’त वावरणाऱयांमध्ये वैयक्तिक सुरक्षा उपकरणं वापरावी लागतात. जर श्वसनविषयक समस्या नसेल, तर त्यांना ‘एन-95’ मास्कऐवजी ‘सर्जिकल मास्क’ वापरण्याची मुभा मिळते…अतिदक्षता विभागात काम करणाऱयांसाठी हे ‘कीट’ जसं व्यापक बनतं त्याचप्रमाणं त्या विभागात साफसफाईचे काम करणाऱयांनाही ते वापरणं बंधनकारक…

डॉक्टरांचं प्रमाण कमी, तरीही चांगली कामगिरी…

भारतात 1457 लोकांमागं एक डॉक्टर असं प्रमाण…जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) 1 हजार लोकांमागे 1 डॉक्टर असं प्रमाण असावं अशी शिफारस केलीय. त्यामानानं अमेरिकेत 1 हजार लोकांमागे 2.54 डॉक्टर्स असं चांगलं प्रमाण दिसून येतं. तरीही तिथं ‘कोरोना’ विषाणूनं प्रचंड हैदोस घालताना 50 हजारांहून अधिक बळी मिळविलेत. त्यामानानं आपल्याकडे स्थिती खूपच चांगली राहिलीय…

ताण आणणारं काम…

‘कोव्हिड-19’ च्या रुग्णांना ठेवलेल्या वॉर्ड वा अतिदक्षता विभागात काम करणाऱया आरोग्य कर्मचाऱयांना विश्रांती कमी आणि कामाचा प्रचंड ताण अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. त्याशिवाय संसर्ग होण्याचा धोकाही असतो. डॉक्टर, परिचारिका यांना संसर्ग होण्याच्या घटना भारतात दिल्ली, मुंबई नि अन्य ठिकाणी घडल्याहेत…सहसा हे कर्मचारी ठरवून दिलेल्या स्थानिक पद्धतीनुसार एक ते दोन आठवडे सलग काम केल्यानंतर 14 दिवस विलगीकरणा त राहतात. बाराव्या दिवशी त्यांची चाचणी नकारात्मक आली, तर त्यांना एक आठवडय़ाची सुट्टी आणि कुटुंबाला मिळण्याची मुभा मिळते. हा अनुभव या सर्वांसाठी नवा, कारण त्यांच्या वैद्यकीय वा परिचारिका प्रशिक्षणादरम्यान त्यांना अशा प्रकाराला कधीच तोंड द्यावं लागलं नव्हतं…त्याशिवाय वैयक्तिक सुरक्षा उपकरणं परिधान करून सतत वावरणं आणि सध्याच्या उष्ण हवामानात वातानुकूलित व्यवस्था नसलेल्या ठिकाणी कार्यरत राहणं खूप जिकिरीचं असतं. यामुळं मोठय़ा प्रमाणात घाम येऊन वारंवार तहान लागते. मात्र ‘डिस्पोजेबल पीपीई’ फुकट जाऊ नये यासाठी सहसा 6 ते 8 तासांच्या डय़ुटीदरम्यान खाणं, पिणं, प्रसाधनगृह वापरणंही टाळलं जातं…

आरोग्य क्षेत्रासाठी पॅकेज, विमा कवच…

मोदी सरकारनं आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांची स्थिती सुधारण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं असून राज्य सरकारांना हा निधी ‘कोव्हिड’ इस्पितळं विकसित करण्यासाठी, प्रयोगशाळा उभारण्यासाठी तसंच ‘वैयक्तिक सुरक्षा उपकरणं’ खरेदी करण्याकरिता वापरता येईल. यापैकी 7774 कोटी रुपये सरकार जूनपर्यंत उपलब्ध करेल…याशिवाय ‘कोरोना’ विषाणूशी लढणाऱया आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलंय. यात समावेश होतो तो डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, ‘आशा’ कार्यकर्ते आदी सर्वांचा…त्याखेरीज आपली सेवा बजावणाऱया डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य क्षेत्रातील अन्य कर्मचाऱयांवर हल्ले करण्याचे अत्यंत निंद्य प्रकार घडलेत. त्यांना आळा घालण्याकरिता सरकारनं गुन्हय़ाच्या तीव्रतेनुसार 6 महिने ते 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखांपर्यंतचा दंड अशा शिक्षेची तरतूद करणारा अध्यादेश जाहीर केलाय…याच्या जोडीला आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे ‘आरोग्य सेतू ऍप’. ते आतापर्यंत 7.5 कोटी लोकांनी ‘डाऊनलोड’ केलंय…

देशभरात 723 ‘कोव्हिड’ इस्पितळं…

कोव्हिड-19 संदर्भातील उपचार करण्यासाठी या रोगाचा संसर्ग किती तीव्रतेनं झालाय ते विचारात घेण्यात येतं. त्याकरिता तीन स्तर करण्यात आलेत. कमी लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ‘कोव्हिड निगा केंद्रं’, मध्यम लक्षणं असलेल्यांसाठी ‘कोव्हिड आरोग्य निगा केंद्रं’ आणि गंभीर लक्षणं आढळणाऱया रुग्णांकरिता ‘कोव्हिड इस्पितळं’…सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशभरात स्थापन करण्यात आलीत ती 723 ‘कोव्हिड-19’ इस्पितळं. त्यांची संख्या मागील महिन्याभरात 3.5 पटींनी, तर ‘आयसोलेटेड’ खाटांचा आकडा 3.6 पटींनी वाढलाय…

Related Stories

मुख्यमंत्री भेटीपूर्वीच केंद्राची फेरविचार याचिका!

Patil_p

बालक पालक

Patil_p

उद्धवा, सद्गुरु ज्याच्यावर कृपा करतो, त्याचा मी तत्काळ उद्धार करतो

Patil_p

कर्नाटक निकालाने लोकसभेचे गणित बिघडेल काय?

Patil_p

पालकमंत्र्यांसमोर भाजपला थोपविणे, संघटना वाढीचे आव्हान

Patil_p

शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू व्हावीत

Patil_p
error: Content is protected !!