Tarun Bharat

कोरोनाशी आपल्याला जुळवून घ्यावे लागेल!

कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांचे मत : कुडाळ येथे प्रकट मुलाखत : तुम्ही माझ्यासोबत लढणार आहात का? : मुख्यमंत्र्यांच्या वाक्याने प्रभावित

वार्ताहर / कुडाळ:

कोरोनाची आताची ही दुसरी लाट आपण म्हणणार नाही. कोरोना हा सागरासारखा आहे. किनाऱयावर सागराच्या लाटा येत असतात. त्या किनाऱयावर येईपर्यंत शीण होऊन फेस पसरवितात, ही कोरोनाची आजची अवस्था आहे. हा व्हायरस कायम राहणार आहे. आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यावे लागेल. बेफिकिरी व बेजबाबदारपणा यांची बेरीज ही आताची कोरोनाची उद्भवलेली आजची परिस्थिती आहे, असे मत महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी येथे व्यक्त केले.

येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (सिंधुदुर्ग), रोटरी क्लब व रोटरी सेवा प्रतिष्ठान आणि श्री गणेश हॉस्पिटल यांच्या सुशिला गणेश निगुडकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हॉटेल लेमनग्रास येथे डॉ. ओक यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. गुरुराज कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

कोविड काळातील घडामोडी या मुलाखतीतून समोर आल्या. चीन व इटलीमध्ये कोरोना वाढत असताना तुमच्या मनात काय विचार आला?, असे विचारले असता, लस निर्माण करण्याचा एक टप्पा असतो. त्या प्रयोगातून हा व्हायरस बाहेर पडला आणि त्याचा प्रसार झाला. मात्र, त्यामागील कारण आजही गुलदस्त्यात आहे, असे त्यांनी सांगितले.

कोरोना आपल्या देशात आला, तर त्याचा विस्फोट किती असणार, याची कल्पना होती. देशात विशेषतः मुंबईत येईल, याची भीती वाटत होती. पण त्यासाठी काही केले पाहिजे, याची खूणगाठ बांधली होती. महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केला.

‘कोरोनामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेत झोकून दिले

11 एप्रिल 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला. ‘मी कोरोनाशी लढणार आहे. तुम्ही माझ्यासोबत लढणार आहात का?’, या त्यांच्या फोनवरील एका वाक्मयाने आपण प्रभावित होऊन ‘कोरोनामुक्त महाराष्ट्र’ या राज्य शासनाच्या मोहिमेमध्ये स्वतःला झोकून दिले. टास्क फोर्सचा आपण प्रमुख होईल, असे वाटले नव्हते, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याची मुख्य भूमिका

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णांना योग्य सेवा मिळाली पाहिजे, याची जबाबदारी टास्क फोर्सची होती. राज्य सरकारने दिलेल्या मोठय़ा जबाबदारीमुळे सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याची आपली मुख्य भूमिका आहे, याचे भान ठेवून काम केले आणि करीत आहे. अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांची योग्य काळजी घेणे, समाजात काय उपाययोजना करता येतील, बेड वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, संक्रमण कमी होण्यासाठी कडक अंमलबजावणी करणे, ही मुख्यतः उद्दीष्टे होती. मुंबई येथे अवघ्या दहा दिवसांत दोन हजार बेडचे जम्बो कोविड रुग्णालय उभे करण्याची किमया एमएमआरडीएचे राजेश रंजन यांनी केली, याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

प्रत्येक जिल्हय़ातील डॉक्टरांशी जोडले गेलो

11 एप्रिल 2020 ते आतापर्यंत महिन्याच्या दर सोमवारी टास्क फोर्सची ऑनलाईन बैठक घेतो. जगातील काय परिस्थिती व त्या अनुषंगाने चर्चा केली जाते, असे सांगून या पदामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हय़ातील डॉक्टरांशी आपण जोडले गेलो. मुख्यमंत्री ठाकरे परदेशातील भारतीय डॉक्टर्सना फोन करून येथे काय उपाययोजना करायच्या, याबाबत चर्चा करतात. रात्री एक वाजताही ते आपल्याशी चर्चा करतात, असे डॉ. ओक यांनी सांगून मुख्यमंत्री ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाबाबत किती संवेदनशील आहेत, याची काही उदाहरणे दिली.

कोरोनाशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’नंतर ‘मी जबाबदार’, याचे भान ठेवले पाहिजे. कोरोना व्हायरस हा जाणार नाही. त्याच्यावर औषध शोधतो आणि तो स्वत:ला बदलतो आहे. आपल्याला त्याच्याशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही. सध्या कोरोनाचे रुग्ण गंभीर होत नाहीत. मृत्यूचे प्रमाणही कमी आहे, म्हणून ही दुसरी लाट म्हणता येणार नाही. मात्र, मतदान करणे कर्तव्य समजतो. त्याप्रमाणे मास्कचा वापर व अन्य स्वत:च्या सुरक्षिततेसाठी काही नियम पाळणे प्रत्येकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे. बेजबाबदार वागणे चुकीचे आहे. कोरोनाला रोखणे फक्त डॉक्टर व आरोग्य यंत्रणेचे काम नसून त्यासाठी लोकांची जबाबदारी व सहकार्य महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

..म्हणूनच धारावीला वाचवू शकलो

आशा वर्कर्स, कम्युनिटी हेल्थ वर्कर या यंत्रणा, हॉस्पिटलमधील कंपाऊंडर, वैद्यकीय तंत्रज्ञ, सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच धारावीला कोरोनापासून आपण वाचवू शकलो आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना आटोक्मयात आणू शकलो. आशा वर्कर्ससह आरोग्य कर्मचाऱयांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या लढाईत डॉ. अविनाश सप्रे यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. डॉ. शशांक जोशी व टास्क फोर्स टीमचेही योगदान आहे, असे ते म्हणाले.

डॉक्टर्स, रोटरी पदाधिकारी व सदस्य, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था पदाधिकारी, प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अतिदक्षता विभागात सिलिंग पाहिले!

कोरोनाची तुम्हाला बाधा झाल्यानंतर तुमच्या या कामात नैराश्य आले का?, या प्रश्नावर त्यांनी तसे आपल्याला या क्षणालाही वाटत नाही. पाच दिवस उपचार घेऊन सहाव्या दिवशी पुन्हा कामावर गेलो. पुन्हा त्रास जाणवू लागल्यानंतर दहा दिवस अतिदक्षता विभागात राहवे लागले. आतापर्यंतच्या चाळीस वर्षांच्या वैद्यकीय सेवेत फक्त बेड पाहिले होते. सिलिंग पाहायची वेळ आली नव्हती. अतिदक्षता विभागात सिलिंग पाहिले, असे ते मिश्किलपणे म्हणाले.

Related Stories

जिह्यात कोरोनाबाधितांची संख्या 22 हजाराच्या पार

Patil_p

‘माही’ मुळे मारेकऱयाचा सहा तासांत छडा

Patil_p

धक्कादायक : रत्नागिरी डेपोतील चालकाची आत्महत्या

Archana Banage

तारकर्ली समुद्रात पर्यटक बुडाला

Anuja Kudatarkar

पावसामुळे बळीराजाची वाढली चिंता

Patil_p

गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Patil_p