Tarun Bharat

‘कोरोना’साठी पुन्हा कठोर निर्बंध

मास्क न वापरल्यास दोनशे रु. दंड : लग्न समारंभास 50 जणांच्याच उपस्थितीस परवानगी – जिल्हाधिकारी

अंत्यविधीसाठी 20 जणांच्या उपस्थितीलाच मान्यता

होम आयसोलेशनची होणार काटेकोर अंमलबजावणी

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ात सर्व नगरपालिका, पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. मास्क न वापरणाऱयांना 200 रुपये दंड आकारण्यात येईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयांना एक हजार रुपये दंड आकारण्यात यावा. त्यासाठी कठोर पावले उचलावीत तसेच लग्न सभारंभासाठी 50, तर अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीलाच मान्यता देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.

जिल्हय़ातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, नगर प्रशासन अधिकारी वैभव साबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सतर्कता बाळगणे गरजेचे!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड-19 विषयक नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाल्या, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अजूनही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करावे, मास्कसह सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत. गर्दी करून कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात येऊ नयेत. लग्न समारंभासारख्या कार्यक्रमामध्ये 50 एवढय़ाच मर्यादित लोकांची उपस्थिती राहील, असे आयोजकांनी पाहावे. तसेच अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांनीच उपस्थित राहावे. जिल्हय़ात कोरोना तपासणीचे प्रमाण वाढवण्यात यावे. कोविड केअर सेंटर्स कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तसेच गृह अलगीकरण याविषयी काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. परराज्यातून विशेषतः राजस्थान, दिल्ली, गोवा, गुजरात आणि केरळ या राज्यांमधून येणाऱया लोकांची माहिती नागरिकांनी तातडीने प्रशासनास द्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱयांनी सदर माहिती जमा करून दररोज जिल्हा प्रशासनास सादर करावी. तसेच या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी व चाचणीचा अहवाल येईपर्यंत सदर व्यक्ती गृह अलगीकरणात राहतील, याबाबत दक्षता घ्यावी. त्यासाठी पोलीस, ग्राम प्रशासन विभाग यांनी एकत्रित काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

सध्या महाविद्यालये सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचीही कोरोना तपासणी करण्यात यावी. जत्रांबाबत मंदिरांचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांच्याही तपासण्या करण्यात याव्यात. लक्षणे असणाऱया प्रत्येकाची कोरोना तपासणी होईल, असे नियोजन करण्यात यावे, अशाही सूचना जिल्हाधिकाऱयांनी यावेळी दिल्या. तसेच जत्रेच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लोकांनी गाफिल न राहता कोरोनाचे नियम पाळावेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा फैलाव कमी होत आहे. त्यामुळे नागरिक गाफिल झाले आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने नियमांची कडक अंमलबजावणी जिल्हय़ात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

नात्याला नव्हते नाव, गहिवरले गाव…

NIKHIL_N

दै. तरूण भारतचे डेस्क इन्चार्ज अवधुत पोईपकर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार

Anuja Kudatarkar

आरोस विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

Anuja Kudatarkar

रिफायनरी समर्थकांनी घेतली खा.सुनिल तटकरेंची भेट

Patil_p

वायंगणतड येथील हानीची अधिकाऱयांकडून पाहणी

NIKHIL_N

दराच्या संघर्षात भरडला जातोय काजू बागायतदार

NIKHIL_N