Tarun Bharat

कोरोना उपाययोजनेतून विरोधक बाजूला

सरकाकडून विरोधी आमदारांना आमंत्रणच नाही

प्रतिनिधी/ मडगाव

राज्यात सद्या कोरोनाचा फैलाव जोमाने होत आहे. आत्तापर्यंत आठ जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे कोरोना कशा पद्धतीने रोखता येईल, रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रत्येत तालुक्यात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांना आमंत्रित केले जात नसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर पसरला आहे.

कोरोनावर कुणीही राजकारण करू नये असे सरकार एका बाजूने म्हणत आहे. या महामारीच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे अशी विधाने केली जातात. पण, प्रत्यक्षात विरोधी पक्षाच्या आमदारांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे विरोधी आमदारांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.

मंगळवारी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी सासष्टी तालुक्यात बैठक घेतली. या तालुक्यात आठ मतदारसंघ आहेत. पण, या बैठकीला केवळ भाजपचे सत्ताधारी आमदार असलेले विल्प्रेड डिसा व मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स एवढेच उपस्थित होते. मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

विरोधी आमदारांना विश्वासात घेतले पाहिजे

सरकारच्या या कृतीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला वाटत असावे की, केवळ भाजपचेच आमदार या महामारीवर तोडगा काढू शकतात. विरोधकांचे सहकार्य नको असावे. आपल्या मडगाव मतदारसंघात कोविड हॉस्पिटल आहे व जेव्हा ईएसआय हॉस्पिटलचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले, त्यावेळी आपण पूर्ण सहकार्य केलेले आहे. कोरोना संदर्भात निर्णय घेताना विरोधी आमदारांना विश्वासात घेतले पाहिजे होते. ते घेतले जात नाही ही अत्यंत चुकीची गोष्ट असल्याचे मत कामत यांनी मांडले.

सरकारचा काय छुपा एजेंडा आहे का?

माजी उपमुख्यमंत्री तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी देखील सरकारच्या कृतीवर सडकून टीका केली आहे. नवे जिल्हा इस्पितळ आपल्या फातोर्डा मतदारसंघात आहे. या ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जातात. पण, कोरोनाच्या संदर्भात महत्वाचे निर्णय घेताना विरोधी पक्षाच्या आमदारांना विश्वासात का घेतले जात नाही. सरकारचा काय छुपा एजेंडा आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कोविड हॉस्पिटलचा ‘बी’ प्लॅन तयार असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्या संदर्भात गुप्तता का ठेवली जाते असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

डॉ. प्रमोद सावंत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

Patil_p

ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण फळदेसाई यांचे निधन

Omkar B

सत्ताधारी, उद्योजकांकडून स्वागत, विरोधकांची टीकाच!

Amit Kulkarni

पालये सार्व. गणेशोत्सवात आज कीर्तन

Amit Kulkarni

संगीत संमेलनातून कलाकारांना समाजात ओळख निर्माण होत असते – डॉ देविया राणे

Amit Kulkarni

अमलीपदार्थ अड्डा उद्ध्वस्थ केला याचा सर्वाधिक अभिमान

Amit Kulkarni