प्रतिनिधी / फोंडा
फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात कोरोना संसर्ग चाचणी विभाग कार्यान्वित करण्यात आली असून आज बुधवार 8 एप्रिलपासून याठिकाणी ही सेवा सुरु होणार आहे. संशयित रुग्णांच्या रक्त चाचणीचे नमुने तपासून एका तासात अहवाल उपलब्ध होईल, अशी माहिती इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांनी दिली.
फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत काल मंगळवारी सकाळी मोल्बियो कंपनीचे शिवा श्रीराम यांनी कोरोना रक्त चाचणीसंबंधी प्रात्यक्षिके सादर केली. या कोरोना चाचणी विभागात दोन सुक्ष्मजीव तपासणी तज्ञ व चार प्रयोगशाळा तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेतल्यानंतर एका तासात अहवाल उपलब्ध होणार आहे. फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात कोरोना चाचणी विभाग सुरु झाल्याने फोंडा तालुक्यासाठी चांगली सोय झाल्याचे आमदार रवी नाईक म्हणाले. कोरोनाचे संक्रमण कायमचे रोखण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार असून नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान फोंडय़ातील कोरोना दक्षता विभागात एका संशयित रुग्णाची भरती होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या सर्व संशयित रुग्णाचा अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.