Tarun Bharat

कोरोना चाचण्या वाढविण्याचा प्रयत्न

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : सोमवारी 208 जण झाले कोरोनामुक्त

प्रतिनिधी / पणजी

गोव्यात काल सोमवारी तिघांना प्राण गमवावे लागल्याने कोरोना बळींचा आकडा 56 झाला आहे. 286 नवीन कोरोनाबाधित सापडले असून 208 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 1884 सक्रिय कोरोना रुग्ण असून 57 जणांना संशयित कोरोना रुग्ण म्हणून आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6816 वर पोहचली असून 4876 जण बरे झाल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे. दरम्यान सध्या प्रतिदिन 300 जणांची चाचणी अहवाल करण्यात येत असून ती क्षमता 500 पर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.

सोमवारी 1297 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात अले तर 2265 जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात 286 नवीन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. 983 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून विविध हॉटेल्स, रेसिडेन्सी मध्ये 64 जणांना क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले आहे. गोव्यात विविध मार्गाने आलेले 21 जण प्रवासी पॉझिटिव्ह सापडल्याची नोंद आरोग्य खात्याने केली आहे.

विविध आरोग्य केंद्रानुसार नोंदणी करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे ः डिचोली 10, सांखळी 46, पेडणे 22, वाळपई 46, म्हापसा 68, पणजी 79, हळदोणा 22, बेतकी 16, कांदोळी 51, कासारवर्णे 6, कोलवाळ 33, खोर्ली 28, चिंबल 104, शिवोली 11, पर्वरी 42, मये 6, कुडचडे 23, काणकोण 8, मडगाव 120, वास्को 390, बाळ्ळी 53, कासावली 30, चिंचिणी 8, कुठ्ठाळी 312, कुडतरी 46, लोटली 32, मडकई 24, केपे 21, सांगे 13, शिरोडा 29, धारबांदोडा 30, फोंडा 102, नावेली 32.

सोमवारी तिघांचे गेले बळी

काल सोमवारी दिवसभरात तिघांचे बळी गेले असून त्यात एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. त्यांचे वय 65 ते 75 वर्षे दरम्यान होते. कोरोनाचे बळी पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्यामुळे जनतेमध्ये चिंता पसरत असून त्याला रोखण्यासाठी उपाययोजना होत नसल्याचे लोक नाराज झाले आहेत.

सध्या प्रतिदिन 300 जणांची चाचणी : आरोग्यमंत्री

कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह यांच्यासाठी आणखी एका हॉस्पिटलची गरज नाही आणि तशी कोणतीही योजना नसल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले आहे. एक कोविड हॉस्पिटल सध्या पुरेसे असून मंडूर येथील आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर करण्याचा बेत त्यांनी बोलून दाखवला. कोरोना तपासणीचा अहवाल लवकर मिळण्याचा वेग वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न चालू असून सध्या प्रलंबित असलेले कोरोना अहवाल दोन दिवसात निकालात काढण्याची ग्वाही त्यांनी दिली. सध्या प्रतिदिन 300 जणांची चाचणी अहवाल करण्यात येत असून ती क्षमता 500 पर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • – राज्यात 3 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधित    6816
  • – आतापर्यंत बरे झालेले रुग्ण                    4876
  • – उपचार घेणारे सक्रिय रुग्ण                     1884
  • – 3 ऑगस्टला दाखल झालेले रुग्ण 286
  • – 3 ऑगस्टला बरे झालेले रुग्ण                 208
  • – 3 ऑगस्ट रोजी मृत्यू                3
  • – आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या         56

कोरोनाचे सोमवारी आणखी तीन बळी

प्रतिनिधी / मडगाव

सोमवारी कोरोनाचे आणखी तीन बळी गेले. यात मेरशी-तिसवाडी येथील रत्नाकर च्यारी 72 वर्षे यांचा मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये बळी गेला तर दोन बळीची नेंद गोमेकॉत झाली आहे. यात एका महिलेचा समावेश असून ती सांगे येथील आहे. तिचे वय 70 वर्षे तर दुसरी व्यक्ती वास्को येथील असून तिचे वय 68 वर्षे आहे. गोव्यातील कोरोना बळीची संख्या 56 वर पोचली आहे.

रविवारी फोंडा तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली होती. तर काल सोमवारी सांगे तालुक्यात पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली. मुरगांव तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले असून ही संख्या 30 वर पोचली आहे. त्यानंतर सासष्टीत 9, बार्देश 5, तिसवाडी 5, सत्तरी 2, डिचोली 2, फोंडा 1, काणकोण 1 व सांगे 1 अशी एकूण बळीची नोंद सरकारी दफ्तरात झाली आहे. कोरोनाचे बळी रोखण्यात सरकारला मोठे अपयश आले आहे. गेल्या 43 दिवसात एकूण 56 बळीची नोंद झाली आहे. त्यात 37 पुरूष तर 19 महिलांचा समावेश आहे.

कोविड हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग फुल्ल

कोविड हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग फुल्ल झाला असून आयटीयूमध्ये ही रूग्णांना दाखल करण्यात आले आहे. यातील बऱयाच रूग्णांची प्रकृती नाजूक बनलेली आहे. या हॉस्पिटलची परिस्थिती नियंत्रणा बाहेर असून असंख्य रूग्ण येथून आपली सुटका करा अशी मागणी करू लागले आहेत.

परिस्थितीला कंटाळून हॉस्पिटलमधून मुक्त करण्याची मागणी

कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या संतोष रिवणकर याने प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांना उद्देशून एक संदेश व्हायरल केला असून त्याने कोविड हॉस्पिटलातील परिस्थिती कथन केली आहे. सर्व रूग्णासाठी एकच संडास, दररोज रूग्णांमध्ये संघर्ष, जेवणही व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी यामुळे जीव वैतागला असून आपली लवकर सुटका करावी अशी मागणी त्याने केली आहे. यापूर्वी दोघांनी येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते. कोविड हॉस्पिटलची परिस्थिती वाईट झाली असून त्यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न येथील डॉक्टरासमोर उभा ठाकला आहे.


तालुकानिहाय बळीची संख्या

  • मुरगांव                       30
  • सासष्टीत                     9
  • बार्देश             5
  • तिसवाडी                    5
  • सत्तरी             2
  • डिचोली                      2
  • फोंडा              1
  • काणकोण         1
  • सांगे               1

Related Stories

राज्यात 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद

Amit Kulkarni

विनयभंग प्रकरणी कन्हैय्या नाईक निर्दोष

Amit Kulkarni

रॉयल्टी भरलेला खनिजमाल उचलण्यास मुभा

Patil_p

कसोटी… उमेदवार अन् मतदारांचीही!

Patil_p

संजीवनी कारखान्याच्या आवारात उद्या ऊस उत्पादकांचे धरणे

Patil_p

किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा मसुद्यास विरोध

Amit Kulkarni