Tarun Bharat

कोरोना भारतात

Advertisements

जगातील शंभर देशांमध्ये हाहाःकार माजविणाऱया कोरोना विषाणूचा भारतात प्रवेश झाल्यानंतर आणि पुणेसारख्या शहरात पाच रूग्ण, केरळमध्ये एक बळी गेल्यानंतर भारतात त्याबद्दल भितीचे वातावरण निर्माण होणे सहाजिकच आहे. तसे ते झालेही आहे. कारण सरळच आहे चीनमध्ये तीन हजारावर लोकांचे या विषाणूने प्राण घेतले आहेत. तिथले मृत्यूचे तांडव थांबलेले नसतानाच आपल्या जवळच्या इतर देशातूनही येणाऱया लोकांना त्याची लागण होत आहे. दुबईहून आलेल्या काही लोकांना हा प्रादूर्भाव झाला. त्यातून पुण्यातील एका कॅब चालकाला झाला आणि तिथून तो पाच लोकांना झाला. ही संख्या वाढण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त केली जाऊ लागली. दाट लोकसंख्येच्या चीन आणि भारतासारख्या देशात अशा प्रकारचा विषाणूजन्य आजार पसरला तर त्यातून मोठय़ा जनसंख्येच्या जिवीताला धोका पोहोचू शकतो हे तर स्पष्टच आहे. पण, अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाताना काही गोष्टींची माहितीही आपणास हवीच. काही प्रतिबंधक उपाययोजना ज्या शासन आणि आरोग्य यंत्रणा सांगताहेत त्या मी पाळणारच असा जर निर्धार प्रत्येकाने केला आणि तो अगदी प्रारंभापासून कृतीत आणला तर या संकटावर मात करणे शक्य आहे. याबाबत जागृती होण्यास भारताला पुरेसा वेळ मिळालेला आहे आणि ही जमेची बाजू लक्षात घेऊन या आव्हानाला सामोरे गेले पाहिजे. कोरोना हा विषाणूजन्य आजार आहे. तो आपणास माहित नाही असे नाही. पहिला विषाणू 1960 साली सापडला होता अशी माहिती आता तज्ञ सांगताहेत. यापूर्वीचे सहा कोरोना विषाणू यंत्रणांना माहित आहेत. सार्स, मोर्स यांना आपण तोंड दिले आहे. चीनच्या वुहानमध्ये जेव्हा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला तेव्हा त्याच्याबद्दलची भिती जगभर पसरायला लागली. जगभरात चार हजारांवर बळी आजअखेर गेले आहेत. त्यातील 3136 हे एकटय़ा चीनमधील आहेत. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेतही वादळ उठले. सोशल मिडीयाने हे भय फार मोठय़ा प्रमाणावर पसरत गेले. पण, त्याचवेळी भारतातील आरोग्य यंत्रणा सतर्कही झाली. त्यांनी प्राथमिक पातळीवरच बाहेरून आलेल्या संशयास्पद व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या घरात किंवा विलगीकरण केंद्रांमध्ये ठेवण्यास सुरूवात केल्याने अचानक फार मोठा हाहाःकार माजला असे काही घडलेले नाही. सध्या तर भारतात 30 विमानतळांवर येणाऱया प्रत्येक प्रवाशांच्या तपासण्या सुरू आहेत. ताप असणारे वेगेळे केले जात आहेत. तपासणी करून संशयितांना स्वतंत्रपणे उपचारही केले जात आहेत. मोठ मोठय़ा कंपन्यांचे प्रमुख जे परदेश प्रवासात होते त्यांना सक्तीने घरी राहण्याचे सल्ले देण्यात आले आहेत. अनेकांनी त्याप्रमाणे कृतीही केलेली आहे. पण, तरीही गेल्या काही दिवसांमध्ये केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामीळनाडूत संशयित रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात लाखाहून अधिक लोकांच्या आतापर्यत तपासण्या झालेल्या आहेत. त्यात 300 हून अधिक लोकांच्या बाबतीत काही लक्षणे आढळली. त्यातील केवळ पाच रूग्ण संशयित आढळले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे लाखभर लोकांच्या तपासणी नंतर आणि कठोर चाचण्यांनंतर पाच रूग्ण आढळले म्हणून घाबरून जाण्यात अर्थ नाही. कोरोना विषाणू हे एक वास्तव आहे आणि ते एक अचानक उद्भवलेले आव्हान असले तरी त्याच्या पूर्वीचे त्याच जातकुळीतील विषाणूंचे आव्हान आपण परतवलेले आहे हा विश्वास जागृत ठेवण्याची आवश्यकता आहे आणि तेवढीच काळजही घेण्याची गरज आहे. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, सर्दी ही लक्षणे तशी तर अनेक आजारात आढळतात. त्यामुळे अशी काही लक्षणे आढळली तर कोरोनाच असेल असे नाही. कोरोनाचा रूग्ण शिंकतो किंवा खोकतो तेव्हा त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱया थेंबातून हा विषाणू पसरू शकतो. खोकल्यामुळे किंवा शिंकेतून बाहेर पडणारे थेंब जमीनीपासून फर्निचरपर्यंतच्या कुठल्याही पृष्ठभागावर पडल्यामुळे आणि त्याच्यावर इतरांचा हात पडून तोच हात त्यांनी चेहरे, डोळय़ाला लावल्यामुळे हा विषाणू व्यक्तीच्या शरीरातील रक्ताच्या संपर्कात येऊन शरीरात पसरू शकतो. त्यामुळेच माणसांचा वावर असणाऱया प्रत्येक ठिकाणच्या वस्तु आणि फर्निचरचा पृष्ठभाग सातत्याने स्वच्छ ठेवला जावा, पुसला जावा अशा सुचना करण्यात आलेल्या आहेत. लोकांनीही नेहमी हात स्वच्छ ठेवावेत अशी सूचना आरोग्य यंत्रणांनी दिली आहे. कोणाशीही हस्तांदोलन करू नका, अंतर राखून रहा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शिंकताना, खोकताना नाका, तेंडासमोर रूमाल धरणे अशा सभ्यतेचे दर्शन घडविणाऱया सवयी जोपासा अशा काही प्रतिबंधात्मक गोष्टींचा आरोग्य यंत्रणा सल्ला देत आहेत. त्या जरी काटेकोरपणे पाळल्या तरीही भारतात विशेषतः जिथले तपमान मुळातच अधिकचे आहे  तिथे या विषाणूच्या प्रसाराला आपोआपच आळा बसणार आहे. या बाबतीत हेही लक्षात घेतले पाहिजे की, परदेशातून आलेल्या लोकांच्यामुळे हा विषाणूंचा प्रादुर्भाव काही लोकांना झालेला आहे. अर्थात हा स्थानिक प्रसार सुरू झालेला नाही. म्हणजे इथल्या लोकांच्यात हा विषाणू उद्भवून तो प्रसार पावत आहे असे काही झालेले नाही. त्यामुळे जितक्या काटेकोरपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक व्यक्तीकडून पाळल्या जातील तितके यातून नुकसान टळणार आहे. ज्या सोशल मिडीयातून भितीचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर झाला आहे, त्याच माध्यमाचा वापर करून याबाबतीत लोकांची मने तयार करणे आणि अशी सकारात्मक माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही प्रत्येकाने पार पाडणे आवश्यक आहे. स्वाईन फ्लू, टी. बी. अशा आजारांना भारत सामोरा गेलेला आहे. कोरोना ही त्याहून फार वेगळा नाही. फक्त तो नव्याने आला असल्याने उपायाची व्यवस्था होईपर्यंत सर्वसामान्यांनी आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. जयपूरमध्ये इटलीच्या कोरोनाग्रस्त जोडप्यावर एचआयव्हीवरील औषधांचा वापर त्यांच्या संमतीने आणि औषध महानियंत्रकांच्या परवानगीने करण्यात आला. त्यातील महिलेची प्रकृती स्थीर आहे. चीनमध्ये अशा उपचाराचा विचार झाला होता. भारतात तो करण्यात आला. आव्हानांवर मात करण्याचे प्रयत्न सुरू असतात तेव्हा घाबरून जाण्याऐवजी तज्ञांचे ऐकणे आणि त्याला प्रतिसाद देणे कर्तव्य असते. त्यातूनच या संकटांवर मात होऊ शकते.

Related Stories

इक दिन जाना है भाई…

Patil_p

महाशक्तीची कुजकी मनोवृत्ती

Patil_p

अतिरिक्त भार नसलेला चाकोरीबद्ध!

Patil_p

प्रत्ययेंविण बोलावें ! तेंची पाप !!

Patil_p

2019-20 मध्ये बायजूसचा नफा दुप्पट

Patil_p

प्रॅक्टीस मेक्स मॅन परफेक्ट

Patil_p
error: Content is protected !!