ऑनलाईन टीम / देहरादून :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्षीची चारधाम यात्रा आता रद्द करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी ही माहिती दिली आहे.


आज गुरुवारी या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत म्हणाले की, चार मंदिरांमध्ये फक्त त्या त्या मंदिराचे पुजारी पुजा आणि इतर धार्मिक विधी करतील, इतर कोणालाही या मंदिरांमध्ये प्रवेश असणार नाही.
दरम्यान, पुढच्या महिन्याच्या 14 तारखेपासून ही यात्रा सुरु होणार होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार ठिकाणच्या मंदिरातले पुजारीच फक्त इथली पूजाअर्चा आणि इतर धार्मिक विधी करतील.
गेल्या वर्षीसुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. जुलैपासून सरकारने अंशतः परवानगी दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा यात्रा रद्द केली आहे.