Tarun Bharat

कोरोना महामारीमुळे बुरुड समाज सापडला आर्थिक संकटात

Advertisements

बांबूपासून सूप, टोपली, चाळण, बुट्टय़ा आदी विविध साहित्य बनविणारा व्यवसायच ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

आण्णप्पा पाटील / बहाद्दरवाडी

कोरोनामुळे छोटय़ा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हय़ात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बांबूपासून टोपल्या, सूप, चाळण, बुट्टय़ा आदी वस्तू तयार करणारा बुरुड समाज संकटात सापडला आहे. गेल्या वषीपासून या व्यवसायाला घरघर लागली आहे. लॉकडाऊनमुळे बनविलेल्या साहित्याची उचल होत नसल्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासनामार्फत या समाजाला मदत मिळण्याची गरज आहे.

ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायासह बारा बलुतेदारांच्या व्यवसायावर अवलंबून असते. सध्या कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येतात. सुतार, लोहार, बुरुड, कुंभार समाजातील कारागिरांचे पोट हातावरचे असते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे या छोटय़ामोठय़ा व्यावसायिकांवर फार मोठे संकट निर्माण झाले आहे.

बुरुड समाज हा बांबूपासून टोपली, सूप, बुट्टय़ा, परडी, दुरडी आदी विविध प्रकारच्या वस्तू बनवून त्याची विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. लॉकडाऊनमुळे त्यांचे गावोगावी फिरणे बंद झाले असून बनविलेले साहित्य घरातच शिल्लक राहू लागले आहे. यामुळे हा समाज सध्या हतबल झाला असल्याचे चित्र पहावयास मिळते.

पूर्वी जंगल भागातून अगदी सहजपणे या समाजाला बांबू मिळत असे. बांबूची रक्कमही कमी मोजावी लागत होती व बांबूपासून बनविलेल्या साहित्याला ग्रामीण भागात मागणी अधिक प्रमाणात होती. सध्याच्या आधुनिक युगात प्लास्टिक, फायबरचा वापर अधिक होऊ लागला आहे. घरगुती प्लास्टिकच्या साहित्यांमध्ये वाढ झाली आहे आणि हे प्लास्टिकचे साहित्य बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहे. यामुळे बांबूपासून बनविलेल्या साहित्याची विक्री मंदावल्याचे जाणवत
आहे. बांबूपासून बनविलेल्या सुपांचा प्रत्येकाच्या घरात वापर असायचाच. सध्याही तो बहुतांशी प्रमाणात आहे. पण काही ठिकाणी प्लास्टिक आणि अल्युमिनियमची सुपे वापरण्यात येऊ लागली आहेत. तसेच शेतशिवारात कामकाजासाठी बांबूच्याच बुट्टय़ांचा आधार शेतकरी घेत असतात. अलीकडे मात्र प्लास्टिक व लोखंडी बुट्टय़ा वापरात येऊ लागल्या आहेत. बांबूने बनविलेली बुट्टी घरी नेऊन त्याला शेणाने सारवतात व ही बुट्टी शेतकरी वापरतात. प्लास्टिकमुळे बांबूंच्या बुट्टय़ांच्या मागणीत घट झाली आहे. याचा परिणाम बुरुड समाजावर होऊ लागला आहे. कारण वर्षानुवर्षे हा समाज या व्यवसायावरच अवलंबून असतो.

काही समाजातील कारागिरांवर बेरोजगाराची वेळ आली आहे. कारण पूर्वीसारखे म्हणावे तसे काम त्यांच्या हाताला मिळत नाही आणि इतर व्यवसाय करण्याइतका त्यांच्याकडे पैसा नसतो. त्यामुळे या लोकांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

लग्नसराईतला व्यवसाय बुडाला

उन्हाळय़ाच्या दिवसात लग्नकार्यासह विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांसाठी बांबूपासून तयार केलेली सुपे, टोपल्यांची मागणी अधिक असते. यावषी कोरोनामुळे लग्न व इतर कार्यक्रमांवर निर्बंध आले. त्यामुळे लग्न व इतर कार्यक्रम हे अगदी साधेपणानेच झाले. यामुळे लग्नसराईतला बुरुड समाजाचा व्यवसायही बुडाला आहे.

कणगी-बोऱयाच्या मागणीत घट

सुगी हंगामाला सुरुवात झाली की धान्यसाठा जमा करून ठेवण्यासाठी बांबूपासून तयार केलेल्या कणगी व तट्टीपासून बनविलेला बोऱया याची खरेदी प्रत्येक शेतकरी हमखास करीत असे. अलीकडे या कणगी व बोऱयाची जागाही प्लास्टिक व लोखंडाच्या साहित्याने घेतली आहे. यामुळे सुगी हंगामाच्या आधी सुमारे महिनाभर लागणारे कणगी व बोऱयासाठीचे कामही बंद झाले असल्याची माहिती बुरुड समाजातील काही नागरिकांनी दिली
आहे.

बांबू सोलून त्यापासून विविध प्रकारचे साहित्य बनविताना मोठी कसरत करावी लागते. वेळ जास्त द्यावा लागतो आणि उत्पन्न मात्र एकदमच कमी मिळते. सूप, बुट्टय़ा हे साहित्य बनविताना हाताची कला महत्त्वाची असते. मात्र, सोललेल्या बांबूची सालपटे हाताला लागण्याचा धोका अधिक असतो. अनेकवेळा या समाजातील महिलांच्या हाताला जखमाही या वस्तू बनविताना होतात. पण हाताच्या बोटांना झालेल्या जखमांवर घरगुती उपचार करून पुन्हा कामाला सुरुवात करावी लागते, अशी माहिती महिलांनी दिली.

बांबूची किंमत वाढल्याने व्यवसाय करणे कठीण

आमचा वडिलोपार्जित हा व्यवसाय असून यावरच आमचा संसाराचा गाडा चालू आहे. सध्या प्लास्टिकचा वापर अधिक होऊ लागला असल्यामुळे आमच्याकडील साहित्याची मागणी कमी झाली आहे. तसेच पूर्वी बांबू कमी रकमेत मिळायचा. सध्या मात्र 40 ते 50 रुपयांना एक याप्रमाणे बांबू खरेदी करावा लागतो. वेळ व मेहनत जास्त लागते. पण त्याचा योग्य मोबदला आम्हाला मिळत नाही.

– रवळनाथ बुरुड

आमच्या समाजाकडे सरकारने लक्ष द्यावे

सूप, बुट्टय़ा बनविण्याचे कामच कमी झाले. आता मुलाबाळांना मोठे कसे करायचे? त्यांचे शिक्षण कसे पूर्ण करायचे? असे प्रश्न आमच्यासमोर उभे ठाकले आहेत. कोरोनामुळे बाहेर फिरून विक्री बंद झाली. गेल्या दोन वर्षापासून आमचे हाल होऊ लागले आहेत. सरकारकडून आम्हाला कोणतीच मदत मिळालेली नाही. आमच्या समाजाकडे सरकारने लक्ष द्यावे.

– लक्ष्मी नागाप्पा बुरुड

कॉलेज बंद असल्यामुळे आई-वडिलांना व्यवसायात मदत करते

कॉलेज बंद असल्यामुळे आई-वडिलांना या व्यवसायात मदत करते आहे. पण कोरोनामुळे मागणीच नाही. पूर्वीसारखी घरात साहित्य बनविण्याची लगबग दिसून येत नाही. लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांची प्रगती करा, असे सांगतात. पण आमच्या घरातील व्यवसायच बंद झाला तर आमची प्रगती कशी होणार? आमच्या समाजातील आम्हा विद्यार्थ्यांसाठी सरकारने योजना राबवून आम्हाला मदत करावा.

– शीतल बुरुड

मायबाप सरकारने आमचा विचार करावा

शिवारात माती टाकण्यासाठी लागणाऱया मोठय़ा बुट्टीची किंमत 80 रुपये, लहान टोपल्याची किंमत 60 रुपये तसेच एका सुपाची किंमत 150 रुपये आहे. घरात बुट्टय़ा बनवून ठेवलेल्या आहेत. मात्र, त्याची उचल होत नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मायबाप सरकारने आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.

– लक्ष्मी महादेव बुरुड

Related Stories

कर्मचारी व कामगारांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर

Amit Kulkarni

गांधी चौकातील रस्ता कधी खुला होणार?

Amit Kulkarni

केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत

Patil_p

महसूल कर्मचाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni

आजपासून नववी-दहावीचे वर्ग पूर्णवेळ भरणार

Amit Kulkarni

रेशनधान्य दुकानांची मंगळवारची सुट्टी रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!