Tarun Bharat

कोरोना महामारी, लॉकडाऊनातही फोंडय़ात अपघाती मृत्यूत वाढ

महेश गावकर/ फोंडा

फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दित कोरोना महामारी काळातील लॉकडाऊन व वाहनांची वर्दळ कमी असतानाही सन 2020 च्या वर्षभरात एकूण 227 अपघांताच्या नोंदी झालेल्या असून त्यात सुमारे 30 जणांनी जीव गमावलेले आहेत. त्यात भर म्हणून अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांची आकडेवारी वाढली असून यंदा 119 अनैसर्गिक मृत्यू झाले आहेत. राज्यातील इतर पोलीस स्थानकाच्या तुलनेत हा आकडा फुगलेला आहे. या वाढत्या घटनांमुळे फोंडा पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक व कर्मचाऱयावर मात्र कामाचा ताण वाढत आहे.

 सन 2019 सालात 142 अनैसर्गिक मृत्यू नोंदी झाल्या होत्या. यंदा कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे यात घट झाली असून यंदा 119 अनैसर्गिक मृत्यूच्या नोंदी झालेल्या आहेत. अपघाती मृत्यूत मात्र कोरोनामुळे वाहतूकीची वर्दळ कमी असतानाही उलट परिस्थती घडलेली आहे. मागील वर्षी एकूण 284 अपघातात 27 जणांना जीव गमावला होता. यंदा अपघातांच्या नोंदी कमी झालेल्या असल्यातरी त्यात मृत्यूत वाढ झाली असून एकूण 30 जण दगावलेले आहेत. फोंडा पोलीस स्थानकाची कार्यक्षेत्रात फोंडा तालुक्यातील 19 ग्रामपंचायती व धारबांदोडा तालुक्यातील धारबांदोडा ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

 फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत दर तीन दिवसात एक अनैसर्गिक मृत्यूची नोंद ही नित्याचीच झालेली आहे. उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलेले रुग्ण मरण पावल्यास शवचिकित्सेच्या अहवालापासून इत सर्व सोपस्कार पोलिसांना पूर्ण करावे लागतात. त्यात भर पडते ती अपघाती मृत्यूची यंदा 17 जण जागीच ठार झाले असून अन्य स्वयंअपघात व उपचाराअंती 13 जण मरण पावले आहेत.

बोरी येथे वीजखांबवाहून ट्रक उलटून 3 ठार

ऐन चतुर्थीच्या काळात बोरी सर्कल येथे अपघातात माशेल येथील वीज खात्याचा वीजखांबवाहू ट्रक उलटून तीन वीज कर्मचाऱयाचा जागीच मृत्यू झाला होता. वडाकडे-उसगांव येथे झालेल्या अपघातात युवक व युवतीचा मृत्यूस पार्क करून ठेवलेल्या टिप्पर ट्रकवाल्याला कारणीभूत धरण्यात आले मात्र येथील ग्रामस्थाचा रोष बलत्याच वाहनावर होता. भोम येथे गतिरोधकावर झालेल्या अपघातात दुचाकीच्या पाठिमागे बसलेल्या युवती कंटेनरच्या पाठिमागील चाकात सापडून मृत पावली होती. उसगांव खुरसाकडे पथदीप व सुचनाफलक नसल्याने दुचाकीचालकाना जीव गमवावा लागला होता. कोने प्रियोळ हे फोंडय़ातील अपघाताचे प्रमुख केंद्र बनलेले असून याठिकाणी बुलेट चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. यंदाच्या 2020 व्या वर्षी कामावर जाताना व कामावरून परतत असताना अनेक अपघातात दुचाकीचालकांना जीव गमवावा लागलेले आहे. सावईवेरे व बेतकी खांडोळा येथे झालेल्या अपघातातील अश्याच घटना घडलेल्या आहेत. मानसवाडा कुंडई येथील जन्क्शन कायम वाहतूकीसाठी धोक्याचे असून वारंवार अपघात येथे घडत असतात मात्र अजूनपर्यंत कोणतीच उपाययोजना येथे करण्यात आलेली नाही. 

जागृती आवश्यक : पोलिस निरीक्षक मोहन गावडे

याविषयी बोलताना फोंडा निरीक्षक मोहन गावडे म्हणाले, अनैसर्गिक मृत्यू विशेषत: आत्महत्यांचे प्रमाण फोंडा तालुक्यात अधिक असून अशा घटना रोखण्यासाठी विविध स्तरांवर जागृती व समुपदेशनाची आवश्यकता आहे. भरधाव वेगात वाहने हाकणाऱयाविरोधात व नियम न पाळणाऱयाविरोधात कडत मोहीम अवलंबल्यानंतरही अपघातांचे प्रमाण आटोक्यात येत नाही यावर प्रत्येक दुचाकीचालकांने विचार करणे गरजेचे आहे.

फोंडा शहर व इतर काही पंचायत क्षेत्रामध्ये मागील चार वर्षापासून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यामुळे बहुतेक रस्ते चेंबरजवळ उंचवटे निर्माण झालेले आहेत, खोदल्यानंतर त्यांची व्यवस्थितपणे डागडुजी करण्यात आलेली नाही. अपघातांमागील हे असुरक्षित रस्ते हेही एक कारण प्रामुख्याने आहे.

उपनिरीक्षकांवर वाढता ताण

अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर पुढील सर्व सोपस्कार करण्याची जबाबदारी उपनिरीक्षकावर असते. अगदी घटनास्थळी पंचनाम्यापासून शवचिकित्सेसाठी कागदपत्रे तयार करण्यापर्यंत सर्व गोष्टी तातडीने कराव्या लागतात. एक अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाल्यास साधारण पूर्णदिवस उपनिरीक्षक या कामात गुंतून पडतात. त्यात एखादा अज्ञाताचा मृतदेह आढळल्यास त्याची ओळख पटवून पुढील सोपस्कार पुर्ण करावे लागतात. कोरोना महामारीत कोविड योद्धे म्हणून पावसाची तमा न बाळगता सेवा देणाऱया खाकी वर्दीतील देवदूतांच्या कामाची दखल सामान्य  जनतेने घेणे अंत्यत गरजेचे आहे.

Related Stories

मडगावात एटीएम मशीन उखडून नेऊन फोडले, 7.83 लाख लंपास

Omkar B

शेती नष्ट करून ‘आयआयटी’ होऊ देणार नाही

Omkar B

आषाढी एकादशीचे आज केवळ औपचारिक कार्यक्रम

Patil_p

मुद्दे, आकडेवारीला बगल देऊन बाजू मांडण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

कुडचडे पालिका सध्याचेच कचरा शुल्क आकारणार

Omkar B

सत्तरीत वादळी वाऱयासह पावसाचा तडाखा

Amit Kulkarni