बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर पासून सुमारे ८० किमी अंतरावर असणाऱ्या बांगरपेट येथे कोरोना संक्रमित व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यावरून ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला. मंगळवारी रात्री मृतदेह घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेवर ग्रामस्थांनी दगडफेकही केली.
गंगमनपाल्य आणि कुमारबरपल्या येथील रहिवाशांना अशी भीती होती की कोरोना बाधित रुग्णाचे शव त्यांच्या गावातून गेले तर गावात कोरोना पसरेल. या मूर्खपणामुळे त्यांनी रुग्णवाहिकेचा मार्गही रोखला. वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार ते मृतदेह दफन करण्यासाठी नेत असल्याचे कर्मचार्यांनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी सहमत नव्हते. नंतर परिस्थिती बिघडल्याचे पाहून घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. नंतर रुग्णवाहिका दुसर्या मार्गाने हलविण्यात आली. यावेळी रुग्णवाहिकेवर दगडफेक केल्याप्रकरणी एकूण आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.