Tarun Bharat

कोरोना रुग्णांमध्ये बालक, सैनिकांचाही समावेश

रात्री उशिरापर्यंत संख्या वाढण्याचे संकेत

प्रतिनिधी / मडगाव

मडगावच्या ‘कोविड-19’ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या काल सोमवारी सायंकाळपर्यंत 29 वर पोचली होती. त्यात रात्री उशिरा आणखी 6 जणांची वाढ झाली. गोव्यात सध्या 35 कोरोना पॉझिटिव्ह असून त्यामध्ये बाहेरुन आलेले 31 गोमंतकीय व 4 बिगर गोमंतकीय असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

 मडगाव कोविड हॉस्पिटलच्या बाल विभागात अगोदरच्या एका बालकासह सोमवारी तिघांची भर पडल्याने बालकांची ही संख्या चारवर पोचली आहे. एकूण 35 पैकी 4 रुग्ण बालक आहेत.

राजधानी एक्सप्रेस या दोन विशेष रेलगाडय़ांतून आलेल्या प्रवाशांमुळे गोव्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. गोव्यात सद्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ही 35 वर पोचली आहे. त्यात रेल्वेतून आलेल्याची संख्या 20 झाली आहे. उत्तर गोव्यातील एकाच कुटुंबातील 5 तसेच त्य़ांचा चालक मिळून 6 जण, मालवाहू ट्रकांचे 2 चालक तसेच 1 क्लिनर मिळून 3, पश्चिम बंगालमध्ये बार्ज घेऊन गेलेले 2, औद्योगिक वसाहतीतील 2 कामगार, कारमधून आलेली 1 महिला व 1 गोमंतकीय खलाशी मिळून ही संख्या 35 वर पोचली आहे. या 35 कोरोना पॉझिटिव्ह मध्ये बाहेरुन आलेले 31 गोमंतकीय असून 4 बिगर गोमंतकीय असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

कोविड इस्पितळात प्रत्येक वॉर्डात सात ते आठ रूग्णांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक रूग्णांची एकूण तब्बेत जाणून घेऊन तशा प्रकारे विभागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सद्या सर्व रूग्णांची प्रकृती चांगली असून ते वैद्यकीय उपचाराना देखील चांगला प्रतिसाद देत आहेत.

सुखाचो जीव त्रासात घातलो…

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने अनेकांनी गोव्याचा रस्ता धरला. त्यात रेल्वेतून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोना बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढली. त्यामुळे सुखी असलेल्या गोमंतकीयांना जबरदस्त धक्काच बसला. सद्या कोविड हॉस्पिटलमध्ये काम करणाऱया काही कर्मचाऱयांना थोडीसुद्धा उसंत न घेता काम करावे लागत आहे. त्याच पद्धतीने कोविड-19ची चाचणी घेणाऱया लॅबमधील कर्मचाऱयांनाही थोडासुद्धा मोकळा वेळ मिळत नसल्याने, ‘सुखाचो जीव त्रासात घातलो’ अशा प्रतिक्रिया त्यांच्या तोडून व्यक्त होत आहे.

  प्रयोग शाळेत चाचणीसाठी गर्दी

गोव्याच्या चेक नाक्यावर जलद चाचणी घेतली जाते, त्याचबरोबर त्यांच्या थुंकीचे नमूने घेऊन ते प्रयोग शाळेत पाठविले जातात. गोव्याबाहेरुन येणाऱया रुग्णांमुळे संख्या वाढत असल्याने प्रयोग शाळांमध्ये चाचणीसाठी गर्दी पडली असून येथील कर्मचारी दिवस-रात्र चाचण्या घेण्यात गुंतलेले आहेत. दक्षिण व उत्तर गोव्यात एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली तर तिची अंतिम चाचणी गोमेकॉतील व्हायरोलॉजी लॅबमध्ये घेतली जाते. या चाचणीत जर पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले तर थेट मडगावातील कोविड हॉस्पिटलात पाठविण्यात येते. कोविड हॉस्पिटलमध्ये येणारे रूग्ण हे खास करून रात्री उशिरा किंवा पहाटे येत असतात.

चार महिन्याच्या बालकालाही कोरोना

सद्या कोविड इस्पितळाच्या बाल रूग्ण विभागात एकूण पाच जणांना दाखल करण्यात आले असून त्यात काल सोमवारी रात्री दाखल झालेल्या चार महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. चार महिन्यांचे बालक कोरोना पॉझिटिव्ह आहे तर त्याची आई मात्र कोरोना निगेटिव्ह आहे. या बालकाची देखभाल करण्यासाठी तिलाही कोविड हॉस्पिटलात ठेवण्यात आले आहे. सुरूवातीला मुंबईहून आलेल्या एका कुटुंबातील पाच जणांना दाखल करण्यात आले होते. त्यात एक वर्षाचे बालक होते. नंतर सोमवारी उत्तर गोव्यातील एकाच कुटुंबातील तीन मुलांना आणले. नंतर रात्री चार महिन्याच्या बालकाला आणले गेले. हे चार महिन्याचे बालक गोमंतकीय आहे. दोन सैनिक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांनाही रात्री कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हे सैनिक सुट्टीत आपल्या मूळ गावी गेले होते. ते पुन्हा गोव्यात आले असता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

Related Stories

रेल्वे दुपदरीकरणासाठी रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा आदेश रद्द करा

Patil_p

गोव्यासह अनेक राज्यांत सीबीआयचे छापे

Patil_p

पणजीत उत्पल पर्रीकरनांच पाठिंबा !

Amit Kulkarni

ठरावाआधीच दोन वाहनांची खरेदी मडगाव पालिकेची नवी करामत

Amit Kulkarni

प्रतापसिंह यांच्या कॅबिनेट दर्जावर ठाम

Amit Kulkarni

तरुणाच्या मृत्यू प्रकरणी राजकारण नको – संतोष मळीक

Amit Kulkarni