Tarun Bharat

कोरोना रुग्णांसाठी 1200 बेड उपलब्ध

550 इंजेक्शन्स उपलब्ध : दोनशे जम्बो ऑक्सिजन सिलिंडर मागविले

ऑक्सिजन प्लांटही चार दिवसात सुरू करणार

जिल्हय़ात 599 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

कोरोना बाधित रुग्णांसाठी 1200 बेड उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत हे बेड पुरेसे आहेत. मात्र गरज पडल्यास कणकवली, सावंतवाडी आणि शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्येही कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. रेमडेसिवीरची 550 इंजेक्शन्सही उपलब्ध झाली आहेत. 200 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर मागविण्यात आले असून चार दिवसात ऑक्सिजन प्लान्टही सुरू करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हय़ात सध्या 599 कोरोना बाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यासाठी रॅपिड टीम नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, डॉ. संदेश कांबळे उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱया कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी संपूर्ण टीम पुरेपूर प्रयत्न करून चांगली सेवा देत आहे. तरी देखील ज्या काही त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला असून त्यामध्ये सुधारणा झाली आहे. जिल्हय़ात सद्यस्थितीत शासकीय व खासगी हॉस्पिटल मिळून 1200 बेड उपलब्ध आहेत. चार खासगी हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आली असून कणकवलीच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये 12 बेड, पडवेच्या लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये 30 बेड आणि मालवणच्या रेडकर हॉस्पिटलमध्ये 18 बेड आहेत. या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱया रुग्णांचे बेडचे दर निश्चित केले असून ते जाहीर केले जाणार आहेत. नायब तहसीलदार समन्वयक अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून खर्चावर त्यांचा लक्ष राहणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हेल्थ सेंटर व डेटीकेडेट सेंटरमध्येही 1 हजार 33 बेडची व्यवस्था केली आहे. जिल्हय़ात सद्यस्थितीत 1 हजार 106 सक्रिय रुग्ण असून त्यातील 599 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. इतर रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. सध्या 1200 बेड कोरोना रुग्णांसाठी पुरेसे आहेत. परंतु, रुग्णांमध्ये वाढ झाल्यास कणकवली, सावंतवाडी व शिरोडा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणीही कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. तसेच क्रीडा संकुल व कुडाळच्या महिला बाल रुग्णालयातही गरजेनुसार कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे, असे सांगण्यात आले.

599 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

कोरोना बाधित 599 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी रॅपीड टीम नेमली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दोन प्रकारची ओपीडी सुरू केली असून एक नियमित रुग्ण तपासणी, तर एका ओपीडीमध्ये होम आयसोलेशनच्या रुग्णांना किंवा इतर रुग्णांना कोरोनाची लक्षणे असल्यास त्यांची तपासणी होणार आहे. तसेच मेडिकल कौन्सिलिंगही सुरू करण्यात आले आहे.

550 इंजेक्शन्स उपलब्ध

रेमडेसिवीरची 550 इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत. त्यातील 100 इंजेक्शन्स यापूर्वी रत्नागिरीतून घेण्यात आली होती. ती त्यांना परत केली असून आता 450 इंजेक्शन्स उपलब्ध आहेत, अशी माहिती देण्यात आली.

200 जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची मागणी

ऑक्सिजनचा पूर्ण राज्यातच तुटवडा होता. परंतु, आता ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. सध्या दररोज 150 ते 200 ऑक्सिजन सिलिंडर लागतात. आता 200 जम्बो सिलिंडरची मागणी करण्यात आली आहे. तर ऑक्सिजन प्लान्टचे काम सुरू झाले असून चार दिवसांत हा प्लान्ट सुरु होणार आहे. जिल्हा नियोजनमधून त्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. तसेच 40 व्हेन्टीलेटर उपलब्ध आहेत. सावंतवाडीत कोविड हेल्थ सेंटर सुरू झाल्यावर तेथील व्हेन्टीलेटरचा वापर केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नवीन स्मशानशेड उभारणार

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर प्राधिकरण क्षेत्रातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात होते. परंतु, स्थानिक लोकांना त्याचा त्रास होऊ लागल्याने प्राधिकरणमध्ये अंत्यसंस्कार विरोध करण्यात आला. त्यामुळे प्राधीकरणमध्ये दुसऱया ठिकाणी स्मशानशेड उभारण्यात येत असून त्याचे कामही सुरु झाले आहे. तसेच मृतदेह गावातच अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांनी विरोध करू नये, असे आवाहन करण्यात आले.

डॉक्टर, सामाजिक सेवा संघांनी पुढे यावे!

कोरोना काळात कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी अनेकवेळा जाहिराती दिल्या. मात्र डॉक्टर कुणी येत नाहीत. तीन महिन्यांच्या कंत्राटी सेवेमुळे काहीजण येत नाहीत. परंतु, त्यांना आणखी तीन महिने वाढवून देणार आहेत. फिजीशियन, एमबीबीएस, बीएमएस डॉक्टरांनी पुढे यावे. महिन्याच्या 1 व 15 तारीखला वॉक-ईन इंटरव्हय़ू ठेवलेले आहेत. तसेच सामाजिक सेवा संस्थांनीही मदत करण्यास पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले. बीएमएस डॉक्टरांनाही घेण्यात येत असून सर्व नगरपालिका क्षेत्रासाठी प्रत्येकी एक डॉक्टर नेमण्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Stories

पूरग्रस्तांच्या मदतीला वंचित बहुजन आघाडीची धाव

Anuja Kudatarkar

महिला मच्छीमारांची न्यायासाठी एकजूट

NIKHIL_N

आपच्या अलिना साल्ढाना ‘या’ घटकांवर करणावर लक्ष केंद्रित

Abhijeet Khandekar

वेंगुर्ले-ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टींग बेंचप्रेस एलिट जीमला २ सुवर्ण तर १ कांस्यपदक

Anuja Kudatarkar

पोटच्या मुलीवर शारीरिक अत्याचार

Patil_p

वेंगुर्ले आगारातून मठमार्गे जाणाऱ्या एस.टी.बस बुधवारपासून बाजारपेठ-मारूती स्टाँप मार्गे

Anuja Kudatarkar