वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारी संकटाला आता तब्बल आठ महिने उलटले आहेत. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी प्रत्येक देशाचे प्रयत्न चालू असून भारतही त्याला अपवाद नाही. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱया ऍथलीट्स आणि साहाय्यक प्रशिक्षक वर्गाला सर्वप्रथम मिळण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांनी दिली.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धा कोरोना समस्येमुळे एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही स्पर्धा 2021 साली 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी जाणाऱया भारतीय पथकातील सर्व खेळाडूंना तसेच साहाय्यक प्रशिक्षक वर्गाला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देताना पहिले प्राधान्य दिले जाईल, असे केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी रविवारी येथे एअरटेल पुरस्कृत दिल्ली हाफ मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.