Tarun Bharat

कोरोना लस : अमेरिका-चीनमध्ये तीव्र स्पर्धा

जगभरात रूग्णसंख्या 40 लाखांच्या घरात, 2.71 लाख लोकांचा मृत्यू

कोरोना विषाणूने जगाला घातलेला विळखा जसजसा अधिकाधिक घट्ट होत आहे तसतशी या विळख्यातून सुटण्यासाठी स्पर्धाही वाढीला लागली आहे. सध्या इस्रायल व ब्रिटन या दोन देशांनी कोरोनावरील लस शोधून काढल्याचा दावा केला असला तरी अमेरिका आणि चीन यांच्यातही यासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अमेरिकेची वैज्ञानिक प्रति÷ा याकामी पणाला लावलेली आहे. विक्रमी अल्पकालावधीत लस शोधून काढा, असा आदेशच त्यांनी अमेरिकेतील सर्व विषाणू संशोधन प्रयोगशाळांना दिला आहे.

चीनवर कोरोना विषाणूची माहिती प्रारंभीच्या काळात लपविल्याचा आणि जगभरात या विषाणूचा प्रसार केल्याचा आरोप केला जातो. या चीननेही कोरोनाची लस शोधण्यासाठी आकाशपाताळ एक केले आहे. अमेरिकेच्या आधी चीनची लस बाजारात आली पाहिजे, असा या देशाचा आग्रह असून चीनमधील सर्व सरकार नियंत्रित प्रयोगशाळा यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत.

जागतिक सहकार्याची सूचना, पण…

जगातील सर्व प्रगत देशांनी एकत्र येऊन लसीवर संशोधन करावे, अशी सूचना काही शास्त्रज्ञांनी केली आहे. तथापि, प्रत्येक देशाचे स्वतःचे हितसंबंध यात गुंतलेले असल्याने जागतिक सहकार्य जवळपास अशक्मय असल्याचे मानण्यात येत आहे. विकसित व प्रगतशील अशा सर्व देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या पातळीवर लस किंवा औषध शोधण्याचे प्रयत्न सुरू असून प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची आहे. त्यामुळे ही स्पर्धा रंगात आली असून यात कोणाचा ना कोणाचा विजय लवकरात लवकर व्हावा, अशीच जगातील सर्व लोकांची इच्छा असल्याचे दिसून येते.

श्रीलंकेचा पर्यटन उद्योग विकसित

जगातील इतर देशांमध्ये कोरोना ऐन भरात आलेला असतानाच श्रीलंका मात्र त्या मानाने या उदेकापासून अलिप्त आहे. तेथे बाधितांची संख्या आणि मृतांची संख्या अत्यल्प असल्याने तो देश आता पर्यटन विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. जगातील विकसित देशांमधून आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात श्रीमंत आणि हौशी पर्यटक यावेत, यासाठी विस्तृत योजना आखली जात आहे. जास्तीत जास्त खर्च करू शकणारे पर्यटक आकर्षित करून त्यांना उत्कृष्ट सुरक्षा, आरोग्यदायी सेवा आणि सुविधा देण्यासाठी श्रीलंकेचे सरकार कटिबद्ध असल्याचे समजते.

पाकिस्तानचा एकदिवशीय विक्रम

गुरुवार संध्याकाळ ते शुक्रवार संध्याकाळ या 24 तासांच्या कालावधीत पाकिस्तानमध्ये कोरोनाचे 1764 नवे रुग्ण आढळून आले असून हा त्या देशातील एकदिवशीय विक्रम मानला जात आहे. पाकिस्तानमध्ये मृतांची संख्याही 590 हून अधिक झाली आहे. या एकदिवशीय विक्रमासह पाकिस्तानमध्ये आता कोरोना बाधितांची संख्या 26 हजारच्या घरात पोहचली आहे. असून साडेसात हजार रुग्ण बरेही झाले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या पंजाब प्रांतात असून ती 10,033 इतकी आहे. त्याखालोखाल सिंध प्रांतात 9,093 रुग्ण आहेत.

सिंगापूरमध्ये रुग्णसंख्या 21 हजारपार

सिंगापूर या छोटय़ा देशात कोरोना बाधितांच्या संख्येने 21 हजारची पातळी ओलांडली असून आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी एका दिवसात 768 नवे रुग्ण आढळले असून त्यामध्ये प्रामुख्याने धर्मशाळांमध्ये राहणाऱया विदेशी नागरिकांचा समावेश आहे. सध्या या देशात 18483 विदेशी रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 1706 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा तेथील प्रशासनाने केला आहे.

पाकिस्तानात हिंदुंची अन्नान्न दशा

पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक भयानक स्थितीत असताना तेथील हिंदू अल्पसंख्याकांची दशा अन्नान झाली आहे. प्रशासनाकडून त्यांच्यावर हेतुपुरस्सर अन्याय केला जात असून त्यांना धान्य व औषधे यांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. कोरोनाचे निमित्त करून त्यांना अन्नपाण्यावाचून मारण्याचा कट असल्याचा आरोप होत आहे.   त्यांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत असून प्रशासनाने त्यांच्या अन्न व औषधांची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. कोरोनाचे निमित्त करून येथील हिंदुंना उपाशी ठार मारण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप येथील अनेक हिंदू संघटनांनी केला आहे.

ट्रम्प यांची दैनंदिन चाचणी होणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सेनासाहाय्यकाला कोरोनाची बाधा झाली असल्याने ट्रम्प यांची प्रतिदिन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय व्हाईट हाऊसच्या प्रशासनाने घेतला आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये हा अधिकारी उच्च पदावर होता. आतापर्यंत ट्रम्प यांच्या चार चाचण्या झाल्या असून त्यांना कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही आता व्हाईट हाऊसमध्येच कोरोनाने प्रवेश केल्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांसंबंधी कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय अमेरिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

इराणमध्ये 6 हजाराहून अधिक मृत

इराणमध्ये कोरोनाचा कहर सुरूच असून मृतांच्या संख्येने 6 हजारांची पातळी गाठली आहे. तर बाधितांची संख्या 1 लाख 2034 इतकी झाली आहे. अद्यापही तेथे हा उदेक नियंत्रणाखाली आला नसून येत्या दोन महिन्यात परिस्थिती सुधारली नाही तर कोरोना संक्रमण 5 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. इराणच्या बहुतेक भागात सध्या लॉकडाऊन असूनही परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालल्याचा आरोप तेथील टीकाकार करीत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाचा पुढाकार

आफ्रिका व आशिया खंडातील गरीब देशांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेण्यास प्रारंभ केला असून अनेक देशांकडे पुरेसे अन्नधान्यही नसल्याची परिस्थिती आहे. अशा देशांना वित्तीय व तांत्रिक साहाय्य करण्यात संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेतला असून 6.7 अब्ज डॉलर्सचा निधी तयार करण्याचा संकल्प सोडला आहे. या निधीत विकसित देशांनी सढळ हातांनी देणग्या द्याव्यात, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांनी निधी संकलनाचे लक्ष्य पूर्ण करून द्यावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष गटरेस यांनी केले आहे.

थायलंडमध्ये कोरोना नियंत्रणात

थायलंड देशात शुक्रवारी कोरोनाचे केवळ आठ नवे रुग्ण सापडल्याने तेथील उदेक नियंत्रणात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये एका दिवसात इतके कमी रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. या देशात बाधितांची एकूण संख्या 3 हजारच्या वर आहे. तर आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला असून 997 लोक बरे झाले आहेत. गेल्या आठवडय़ात रुग्णसंख्या जास्त वाढल्याने प्रशासनाने अधिक कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

फिलिपाईन्समध्ये 700 मृत

फिलिपाईन्स देशात कोरोना बाधितांची संख्या 10,463 पर्यंत पोहोचली असून शुक्रवारच्या एका दिवसात त्यात 768 रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत 700 जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुरुषांची संख्या 75 टक्के आहे. फिलिपाईन्समधील अल्पसंख्य समाजामध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिकतर असल्याचे सांगण्यात आले. आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांचीच गर्दी वाढल्याने इतर रुग्णांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे.

Related Stories

नौदलाचे 21 जवान कोरोनाग्रस्त

Patil_p

भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाची यादी जाहीर; नितीन गडकरींना डावललं

Abhijeet Khandekar

एकाच फुटबॉल संघातील 25 जणांना कोरोनाची लागण

datta jadhav

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन मेजरसह ६ सैनिक ठार

Archana Banage

सीडीसीचे आवाहन

Patil_p

आता न्यूझीलंडला भूकंपाचा धक्का

Patil_p