प्रतिनिधी / कोल्हापूर
महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक, अहोरात्र परिश्रमामुळे कोल्हापूर व सांगली जिह्यातील एकूण 4 लक्ष 27 हजार बाधित ग्राहकांपैकी 2 लक्ष 75 हजार 662 ग्राहकांचा वीजपुरवठा अल्पावधीत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या अथक आणि अहोरात्र परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे.


अंकुश नाळे यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांची धावती बैठक घेतली. नागरिकांची गैरसोय टळावी याकरीता पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करणेबाबत प्राधान्य देण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे नियोजनाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शन केले. त्यासोबतच आवश्यक साधनसामुग्री व मनुष्यबळाचा आढावा घेऊन उपलब्ध मनुष्यबळाचा कुशल वापर करणेबाबत सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील ग्राहकांच्या भेटी घेऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यातील अडचणी व नेमका किती कालावधी लागू शकतो ही वस्तुस्थिती ग्राहकांना अवगत करावी, असे सुचित केले. यावेळी मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनीही शेवटच्या वीजग्राहकाचा वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत याच वेगाने वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे काम व्हावे, असे आवाहन केले.
प्राप्त अहवालानुसार पुरस्थितीमुळे कोल्हापूर जिह्यातील 4 उपकेंद्रे ( गांधीनगर, थावडे, आवाडे मळा, शिरवाड) बंद आहेत. 206 गावांचा वीजपुरवठा पुर्ववत केला असून अद्याप 15 गावे पुर्णत: व 30 गावे अंशत: बाधित असून 37 हजार 630 घरगुती, वाणिज्य औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजपुरवठा सुरळीत होणे बाकी आहे. 101 वीजवाहन्या पुर्ववत केल्या असून 7 वीजवाहिन्या बंद आहेत. 2865 वितरण रोहित्रे पुर्ववत केली तर 426 बंद आहेत. उच्चदाब वीज वाहिनीचे 136 व लघुदाब वाहिनीचे 210 वीज खांब पडले आहेत. कोल्हापूर जिह्यातील 2 लक्ष 24 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. नागाळा, पाटपन्हाळा व शिरटी या उपकेंद्राचा वीजपुरवठा पुर्वपदावर आला आहे.
सांगली जिह्यात 51 हजार 480 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत
पुरस्थितीमुळे सांगली जिह्यातील 06 उपकेंद्रे ( शेरीनाला, ब्रम्हनाळ, मर्दवाडी, कवठेपिराण, कृष्णाघाट, दुधगाव) आहेत. दुरूस्ती कार्य सुरू असून 69 गावांचा वीजपुरवठा पुर्ववत केला आहे. अद्याप 25 गावे अंशत: बाधित असून अद्याप घरगुती, वाणिज्य औद्योगिक वर्गवारीतील 45 हजार 942 ग्राहकांच्या वीजपुरवठा सुरळीत होणे बाकी आहे. 54 वीजवाहन्या पुर्ववत केल्या असून 78 वीजवाहिन्या बंद आहेत. 629 वितरण रोहित्रे पुर्ववत केली तर 1990 बंद आहेत. उच्चदाब वीज वाहिनीचे 717 व लघुदाब वाहिनीचे 1335 वीज खांब पडले आहेत. सांगली जिह्यातील 51 हजार 480 वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. खटाव उपकेंद्राचा वीजपुरवठा पुर्वपदावर आला आहे. सांगलीचे अधिक्षक अभियंता धर्मराज पेठकर हे स्थिती हाताळत आहेत. महावितरणकडून 2019 च्या पुर्वानुभावाच्या बळावर योग्य दिशेने कामकाज सुरू आहे. अनेक ठिकाणी उपकेंद्र पाण्यात असले तरी रिंगफिडींगची पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा पुर्ववत केला आहे.