Tarun Bharat

कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊन; पहा ही दृश्ये

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिह्यात 7 दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला. आणि सोमवारी त्याचे काटेकोर पालन झाल्याचेही दिसून आले. रविवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली असून सकाळपासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वच रस्ते, गजबलेले चौक, बाजारपेठा आदी ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत होता. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वाहने रस्त्यावर दिसत होती. तर औषध दुकाने, हॉस्पिटल्स वगळता इतर सर्व व्यावसायिक दुकाने बंद होती. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत नागरीकांनी दिवसभर घरात राहणे पसंद केले.

 कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, चंदगड, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहूवाडी आदी तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची मोठय़ा संख्येने वाढ होत आहे. जिह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 316 हून अधिक झाली आहे, तर जवळपास 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. समूहसंसर्गजन्य स्थिती उद्भवल्यामुळे अखेर प्रशासनाने सात दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी पहिल्या दिवशी कोल्हापूर शहरासह जिह्याच्या सर्वच भागातील व्यवहार ठप्प होते. नेहमी वर्दळ असलेले शहरातील रस्ते, चौक निर्मनुष्य दिसत होते. यापूर्वी देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात किराणा मालाची दुकाने आणि भाजीपाल्याची विक्री सुरु ठेवण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाऊन असून देखील भाजीपाला आणि किराणा खरेदीच्या नावाखाली अनेक जण घराबाहेर पडत होते. पण या सात दिवसांच्या कालावधीत दुकानांसह भाजीपाला विक्रीही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी सर्व किराणा मालाच्या दुकानांसह भाजीपाला विक्री बंद होती. परिणामी किराणा व भाजी खरेदीच्या निमित्ताने विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱयांची पंचाईत झाली. काही ठिकाणी कामाशिवाय बाहेर फिरणाऱया तरुणांना पोलीसांनी चोप दिला.

दुध संकलन व विक्रीसह बँकांची मुख्य कार्यालये आणि उद्योग सुरु
प्रशासनाने सुरुवातीस दुध संकलन व विक्रीसाठी वेळेचे निर्बंध घातले होते. 25 टक्के कर्मचारी मर्यादेत उद्योग सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. तर एटीएम सेंटर्स वगळता बँका बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. पण या प्रतिबंधात्मक आदेशात रविवारी किरकोळ बदल केला. त्यानुसार सोमवारी दुध संकलन व विक्री दिवसभर सुरु होती. बँकाची मुख्य कार्यालये आणि औद्योगिक वसाहतीमधील उद्योग  50 टक्के कर्मचारी मर्यादेत सुरु होती. तरीही लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक औद्योगिक कारखान्यातील कर्मचाऱयांनी कामावर जाणे टाळल्यामुळे परवानगी असूनही काही कारखाने बंद होते.

नागरिक स्वयंस्फुर्तीने झाले ‘लॉकडाऊन’
पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह आरोग्य यंत्रणेने केलेल्या आवाहनानुसार जिह्यातील नागरिक स्वयंस्फुर्तीने ‘लॉकडाऊन’ झाले होते. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील रस्ते, प्रमुख चौकासह बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांकडून घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात होते.

शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरुच
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिह्यात सोमवारी संचारबंदीसदृष्य चित्र होते. पण जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आदी सर्व शासकीय कार्यालये मात्र सुरुच होती. कामानिमित्त येणाऱया अभ्यांगतांना कार्यालयामध्ये येण्यासाठी मज्जाव केला असला तरी सर्व कर्मचारी उपस्थित हेते.

Related Stories

म्हासुर्लीतील आरोग्य केंद्र इमारत खुदाईत पाईप लाईन फुटल्याने पाणीटंचाई

Archana Banage

जयसिंगपूर येथील तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे सहा बळी

Archana Banage

आजारास कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Khandekar

आंतरराष्ट्रीय शूटर चंद्रो तोमर यांचे निधन

Tousif Mujawar

उपनगराध्यक्ष मनोज शेंडेंच्या पत्नीने चोरली वीज

Patil_p
error: Content is protected !!