Tarun Bharat

कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

महाविकास आघाडीने शेतकऱयांसाठी दोन लाख रूपयांपर्यत म. फुले कर्जमुक्ती योजना राबवली आहे. जिल्हय़ातील 57 हजार शेतकऱयांना याद्वारे 392 कोटी रूपयांची कर्जमुक्ती मिळणार आहे. कर्जमाफीचा लाभ शेतकऱयांना एप्रिलपासून मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

   येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर रविवारी प्रजासत्ताकदिनाचा 70 वा वर्धापन दिन साजरा झाला. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळय़ाला आमदार चंद्रकांत जाधव, महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर पोलीस अधिक्षक डॉ. तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. व्ही. सी. केम्पीपाटील, स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.

पूरग्रस्तांना तात्काळ मदत देण्यावर भर

पालकमंत्री पाटील म्हणाले, गतवर्षीच्या महापुरात कोल्हापूरकरांनी दाखवलेल्या धैर्य आणि संयमाला आपण सलाम करतो. पूरग्रस्तांच्या मदत, बचा कार्यात प्रशासनाने केलेले काम कौतुकास्पद आहे. पूरग्रस्तांना आजपर्यत 322 कोटींइतकी मदत केली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांना अनुदानवाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पुरग्रस्तांना विनासायास, तात्काळ मदत देण्यावर प्रशासनाचा भर राहिला आहे.

खरीप पीक कर्ज वाटपासाठी प्रयत्नशील राहणार

महाविकास आघाडीने राज्यातील आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना दोन लाखांपर्यत पीककर्ज माफीची म. फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली जात आहे. जिल्हय़ातील 57 हजार शेतकऱयांना 31 मे पूर्वी या योजनेतून कर्जमुक्त करून खरीप पीक कर्ज वाटपासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

अल्पमुदत पीककर्ज नियमित परतफेड करणाऱयांसाठी लवकरच योजना

कर्जमुक्ती योंजनेच्या लाभासाठी शेतकऱयांनी आधार क्रमांक बॅक खात्याशी संलग्न करून घ्यावेत. या प्रमाणिकरणानंतरच दोन लाखांपर्यतची कर्जमुक्तीची रक्कम शासन थेट त्यांच्या कर्ज खात्यात भरणार आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा बँका, विकास सोसायटय़ांकडून घेतलेले पीककर्ज या योजनेतून माफ होणार आहे. अल्पमुदत पिककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच सरकार नवी योंजना आणेल, अशी घोषणाही त्यांनी केली.

शिवभोजन थाळी योजना निश्चितच यशस्वी होईल

दहा रूपयांत शिवभोजन थाळी योजनेला रविवारी राज्यभर सुरूवात झाली आहे. कोल्हापुरात चार ठिकाणी अशी केंद्रे सुरू झाली आहेत. हॉटेल शिवाज, हॉटेल साईराज, महालक्ष्मी भक्त मंडळ अन्नछत्र आणि रूद्राक्ष महिला बचत गट येथे सुरू होत आहेत. प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी ती सुरू होत आहेत. याला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. स्वस्त दरात भोजन देणारी योजना निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

विकास आराखडय़ाची प्रभावी अंमलबजावणी करणार

जिल्हय़ात वार्षिक विकास आराखडय़ाची प्रभावी अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यंदा जिल्हय़ासाठी 386 कोटींची तरतूद केली आहे. आतापर्यत 231 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हय़ात विविध विकास कामांना मान्यता देण्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये वळीवडे येथील वस्तू संग्रहालय, उजळाईवाडी विमानतळासाठी एव्हिगेशन वीज यंत्रणा, सीपीआरसाठी सोलर डीप फ्रिजर, कार्डियॉक ऍम्ब्युलन्स यांचा समावेश आहे. नाविन्यपूर्ण योजनांतून सुमारे 10 कोटीची जादा तरतूद केली आहे.

गरजेनुसार जास्तीत जास्त निधी देणार

पुढील आर्थिक वर्षासाठी सुमारे 400 कोटींचा आराखडा तयार केला असला तरी यंत्रणांकडून 588 कोटींची मागणी आली आहे. त्यामुळे गरजेनुसार जास्तीत जास्त निधी देण्यावर आपला भर राहील. प्रशासनाने कुमरी पद्धतीने शेती करणाऱया वननिवासींना कायमस्वरूपी जागा दिली आहे. तसेच सातबाऱयावरही त्यांच्या नावांची नोंद घेतली आहे. त्यामुळे चंदगड, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, शाहूवाडी, करवीर तालुक्यातील शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. जिल्हय़ातील या सात तालुक्यांतील 41.29 हेक्टर शेतजमीन, 20 हजार चौरस मीटर क्षेत्र1 हजार 720 लोकांना मिळाले आहे. चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम जमिनी आणि शाहूवाडी तालुक्यातील 65 मागासवर्गीय शेतकरी कुटुंबांना मालकी हक्काने जमिनीचा देण्याचा चांगला निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

गावठाण वाढीसाठी पथदर्शी प्रकल्प सुरू

जिल्हय़ात यापुर्वी झालेल्या गावठाण वाढीमध्ये प्रदान केलेल्या भुखंडांवर धारकांची नावे लावण्याची मोहीम जिल्हाधिकाऱयांनी हाती घेतली आहे. कागल तालुक्यातील लिंगनुर दुमाला व सिद्धनेर्ली येथे हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. यामुळे भूखंडधारकाचे क्षेत्र गावठाण घोषित झाल्याने बांधकामाशी निगडीत प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

घर तेथे शौचालय मोहीम गतिमान करणार

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हय़ात घर तेथे शौचालय मोहीम गतीमान करणार आहे. याद्वारे वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता जोपासत जिल्हय़ाची आरोग्य संपन्नतेची गौरवशाली परंपरा अखंड ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हय़ातील पुलांची रोबोटीक पद्धतीने तपासणी करणार

जिल्हय़ाच्या विकासासाठी रस्ते विकासाचे जाळे निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे. सध्या जिल्हय़ात सुरू असलेल्या रस्ते, पुल, शासकीय इमारतीच्यां बांधकामांना गती दिली जाणार आहे. महापुरात जिल्हय़ातील बहुतांसी पुल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे पुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हय़ातील अशा 31 मोठय़ा पुलांची मदास येथील आयआयटी संस्थेकडून रोबोटीक तंत्राने पाण्याखाली तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हय़ातील 7 पुल आणि 160 किलोमीटर लांबीचे रस्ते आठ दिवस पाण्याखाली होते. त्यातून पुढे आलेली वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कामे प्रस्तावित आहेत.

लोकशाही पंधरवडय़ात उद्देशिका सामूहिक वाचन उपक्रम

प्रजासत्ताकदिनापासून लोकशाही पंधरवडा राबवला जात आहे. याद्वारे लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांनी निर्भयपणे आपला अधिकार वापरावा, संविधानाचा परिपूर्ण परिचय होण्यासाठी सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे हा संविधान उद्देशिका सामुहिक वाचनाचा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे सुजाण नागरीक घडण्यास मदत होणार आहे.

बचत गटांसाठी इंटेसिव्ह कार्यपद्धती राबवणार

शहर स्वच्छतेसाठी राबवलेल्या महास्वच्छता अभियानातून जयंती नाल्याने मोकळा श्वास घेतला. या मोहिमेला मिळालेला लोकसहभाग महत्वपूर्ण आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी 7 कोटींचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. एकात्मिक फलोत्पादन कार्यक्रमांर्गत 16 कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. याद्वारे हायटेक कृषी साधन संपदा तयार होणार आहे. ग्रामीण भागात महिला बचत गटांची चळवळ गतीमान झाली आहे. बचत गटांसाठी इंटेसिव्ह कार्यपद्धती राबवली जात आहे. खेलो इंडियात कोल्हापूरने बाजी मारले असून हा लौकीक कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

महाराणी ताराराणींचे तख्त पाहण्यासाठी खुले

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कालकुंद्री-कुदनूर शिवारात गव्याचे वास्तव्य

Abhijeet Shinde

पन्हाळा कोंविड सेंटरला पुणे उपायुक्तांची भेट

Abhijeet Shinde

असत्यमेव जयते.. जप्तीनंतर संजय राउतांचं ट्विट

Sumit Tambekar

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? : देवेंद्र फडणवीस

prashant_c

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथे एकाचा संशयास्पद मृत्यू ?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!