Tarun Bharat

कोल्हापूरच्या डॉ. जी. डी. यादव यांना अमेरिकन सन्मान

युएस नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगची फेलोशिप जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी

पद्मश्री पुरस्कार विजेते कोल्हापूर सुपुत्र प्रोफेसर डॉ. जी. डी. यादव यांना अमेरिकन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग या जगप्रसिद्ध संस्थेची फेलोशिप जाहीर झाली आहे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी वॉशिग्टनमध्ये होणाऱया सोहळय़ात प्रोफसर यादव यांना सन्मानित केले जाणार आहे. या फेलोशिपमुळे जगभरातील मान्यवरांच्या यादीत डॉ. यादव यांचा समावेश झाला आहे.

अमेरिकन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग ही संस्था जगातील विविध विज्ञानशाखातील संशोधन करणाऱ्या संस्थांपैकी सर्वात प्रभावशाली संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या वतीने संशोधन करणाऱया, संशोधनात योगदान देणाऱया आणि संशोधानातून उद्योग समुहाची उभारणी करणाऱया मान्यवरांचा फेलोशिप देऊन सन्मान केला जातो. याआधी बावीस भारतीयांना ही फेलोशिप मिळाली त्यामध्ये टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा, रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश अंबानी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इन्फोसिसचे नारायण मूर्ती, डॉ. एम. एम. शर्मा, डॉ. किरण मुझुमदार-शॉ, जे. बी. जोशी, टाटाचे चंद्रशेखर, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला या भारतीयांसह अमेरिकेतील टेस्ला कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांचा समावेश आहे. या यादीत आता डॉ. यादव यांचा समावेश झाला आहे.

अर्जूनवाड (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) गावाचे सुपुत्र असणाऱ्या डॉ. यादव यांनी केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात देश आणि विदेशात संशोधक म्हणून ख्याती संपादन केली आहे. मुंबईत इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्थेची स्थापना करण्याचे श्रेय डॉ. यादव यांना जाते. तेच या संस्थेचे पहिले संस्थापक कुलगुरूही होते. विद्यापीठाचा दर्जा असणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून डॉ. यादव यांनी हजारो विद्यार्थ्यांना संशोधन आणि प्रकल्प कार्यातही मार्गदर्शन केले. संशोधक असणाऱ्या डॉ. यादव यांच्या नावावर तब्बल 113 पेटंट आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 104 विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आहे. आपल्या संपूर्ण देशात डॉ. यादव यांचा हा विक्रम आहे. त्याचबरोबर डॉ. यादव यांनी 491 रिसर्च पेपरही (शोध निबंध) सादर केले आहेत. सध्या ते हायड्रोजन आणि कार्बनडायऑक्साईड संदर्भात स्वतंत्र असे संशोधन करत आहेत. भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीतर्फे (इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग) दिला जाणारा यंदाचा प्रोफेसर जयकृष्ण स्मृती पुरस्कार त्यांना ऑक्टोबर 2021 मध्ये जाहीर झाला होता. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविले आहे. अनेक प्रकल्पातही मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या सल्लागार समितीवरही डॉ. यादव अमूल्य योगदान देत आहेत.

Related Stories

ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचत्वात विलीन केलं

datta jadhav

‘बोगस प्रवाशी पासच्या गोरख धंद्यापासून सावध राहा’

Archana Banage

राष्ट्रपती राजवटीची सर्व कारणे राज्य सरकारने पुर्ण केली – चंद्रकांत पाटील

Abhijeet Khandekar

पीएफआयवरच बंदी का? RSS या संघटनेवर बंदी का नाही; काँग्रेस खासदारांचा सवाल

Archana Banage

राधानगरी धरण ६० टक्के भरले,१४०० क्यूसेकने विसर्ग सुरू

Abhijeet Khandekar

शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे हे, उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

Archana Banage