Tarun Bharat

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी फिल्डींग

निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे इच्छुकांत चढाओढ
सध्याचे पालकत्व तात्पुरते

कोल्हापूर / संतोष पाटील

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची मुंबईसह कोल्हापूरचे पालकमंत्रीपदी निवड झाली. ना. केसरकर यांनी कोल्हापुरचा पदभार तात्पुर्ता असल्याचे स्पष्ट केले आहे. ना. चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री झाल्याने मंत्रीमंडळ विस्तारानंतरच कोल्हापूराचे पालकत्व सिद्ध होईल. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद शिंदे गटाकडे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मंत्रीमंडळात संधी मिळाल्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे आदींच्या नावाची जोरात चर्चा सुरू आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री बदलणार काय? बदलल्यास कोण होणार याची चर्चा रंगली असतानाच खाते कोणतेही मिळो, कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी इच्छुकांनी फिल्डींग लावली आहे.

मागील अडीच वर्षात पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आ. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. तिन्ही पक्षातील राजकीय समझोत्यानुसार कोल्हापूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसच्या वाटय़ाला गेले. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी निवडही जाहीर झाली. मात्र, थोरात यांनी नकार दिल्याने पालकमंत्री पदाची माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गळ्यात माळ पडली होती. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळावे, अशी हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षानंतर पुन्हा जाहीर इच्छा व्यक्त केली होती. वाढता काँग्रेसचा प्रभाव रोखून राष्ट्रवादीला पुनर्वैभव मिळवून देण्यासह हसन मुश्रीफ यांच्या मागणीला अनेक राजकीय कंगोरे होते. दोन्ही काँग्रेसमधील वादामुळे मागील अडीच वर्षात कोल्हापूरचे पालकमंत्री पद शेवटपर्यंत कोल्हापूरच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले होते. काँग्रेस आणि सतेज पाटील यांचे जिह्यातील राजकीय वजन वाढवण्यात मैलाचा दगड ठरले होते.

राज्यातील कोणतेही मोठे मंत्रीपद असले-नसले तरी पालकमंत्री पदामुळे जिह्यातील राजकारणात वजन राहते. जिह्याचे राजकारण स्वतःभोवती फिरवता येते. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून वर्षाला किमान हजार कोटींचे बजेट पालकमंत्री म्हणून हातात असते. यंत्रणेवर दबाव कायम राहतो. जिह्याच्या राजकारणात, पक्षांतर्गत आणि राज्यात राजकीय वजन कायम ठेवण्यासाठी स्थानिक जिह्यातील पालकमंत्री असावे, हे लोकप्रतिनिधींचे स्वप्न असते. त्यासाठी पॉलिटिकल गॉडफादरकडे जोरकसपणे ताकद लावली जाते. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाचे ताकदवान नाव होते. ना. पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्याने कोल्हापूरसाठी कोण? ना. पाटील नसतील तर माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आबिटकर, विनय कोरे, प्रकाश आवाडे हे मंत्रीपद आणि कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धेत असलेली नावे आहेत. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत राज्य नियोजन मंडळांचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे नाव असून त्यांना आमदार आणि त्यानंतर मंत्रीपद कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. आता सुप्रीम कोर्टाने बारा आमदार नियुक्तीबाबत भाष्य केल्याने विषय काहीसा मागे पडेल. देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेवरच विनय कोरे किंवा प्रकाश आवाडे यांना पालकमंत्री पद अवलंबून आहे. यासर्व घडामोडीत भाजपची मात्र अत्यंत सावध भूमिका आहे.

40 दिवसांचा स्पेस

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. त्यानंतर 35 दिवसांच्या अंतराने मंत्रीमंडळ अस्तित्वात आले. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? याकडे इच्छुकांचे डोळे लागले असतानाच 40 दिवसानंतर राज्यातील पालकमंत्रीपदाची नियुक्ती जाहीर झाली. आता दिवाळीनंतरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी अटकळ आहे. नियुक्त्यांमध्ये मोठा स्पेस देत, इच्छुकांच्या उत्साहावर पाणी फेरण्याची राजकीय खेळी सुरु असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

कोल्हापूर आणि संघर्ष नेहमीचाच..!

कोल्हापूरला मंत्रीपद मिळावे यासाठी सुरूवातीपासूनच झगडावे लागत असल्याचे वास्तव आहे. बाजूच्या सांगली जिह्यात मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांसह पाच-पाच आमदारांची मंत्रीमंडळात वर्णी लागत असताना कोल्हापुरची पाटी मात्र कोरीच राहत होती. 1999 नंतर राष्ट्रवादीच्या निर्मितीनंर कोल्हापूरला हक्काने मंत्रीमंडळात स्थान मिळू लागले. राष्ट्रवादीचे दिग्वीजय खानविलकर, भाजपचे चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे सतेज पाटील अशी मोजक्या नावांनाच स्थानिक असूनही कोल्हापूरचे पालकत्व करण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त बहुतांश वेळा पाहुण्या पालकमंत्रीवरच जिह्याला राज्यकर्त्यांनी भागवले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही काँग्रेसने जिह्याला मंत्रीपद देताना मात्र हात हाखडता घेतला. दोन खासदार आणि चार-चार आजीमाजी आमदारांनी साथ देऊनही आता शिंदे-फडणवीस सरकारमध्येही मंत्रीपदाची आस जिह्याला आहे. कालच्या प्रमाणेच आजही मंत्री आणि पालकमंत्रीपदासाठी कोल्हापूरची प्रतीक्षा आणि संघर्ष आजही कायम आहे.

Related Stories

शिवसेनेकडून ऑफर आल्यास विचार करू

Archana Banage

नांदणी येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Abhijeet Khandekar

नोंदीपेक्षा कमी लोकांना धान्य देणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा इशारा

Archana Banage

मराठा आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा

Archana Banage

चंदगड नगरपंचायतीची प्लास्टिक बंदी अंतर्गत धडक कारवाई

Archana Banage

सादळे-मादळे घाटात बीएमडब्ल्यू मोटारीने घेतला पेट

Abhijeet Khandekar