Tarun Bharat

कोल्हापूरच्या राजकारणाची धृवीकरणाकडे वाटचाल !

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर भविष्यकालिन पडसाद, काँग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप-मित्र पक्ष आमने-सामने, जिल्हा बँक, महापालिका निवडणुकीत तीव्र संघर्षाची नांदी

संजीव खाडे/कोल्हापूर

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सोमय्या यांच्या पहिल्या थांबलेल्या कोल्हापूर दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी केलेली अतिआक्रमक भाषा, त्याला भाजपने दिलेले उत्तर. त्यातून झालेली वादावादी यातून दोन्ही पक्षातील संघर्ष सर्वांनी पाहिला. ज्या पद्धतीने सोमय्यांच्या रूपाने भाजप मंत्री मुश्रीफ यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातून दोन्ही पक्षातील संघर्ष वाढत जाणार हे स्पष्ट आहे. संघर्षातून भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणाची वाटचाल ध्रृवीकरणाकडे सुरू झाली आहे. त्याचे पडसाद आगामी काळात होऊ घातलेल्या कोल्हापूर महापालिकेसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) यांच्या निवडणुकांत उमठण्याची शक्यता आहे.
सोमय्यांच्या आरोपानंतर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड प्रमाणात घुसळण होत आहे. मुश्रीफ यांच्यासारख्या तब्बल पाचवेळा आमदारकी आणि दीड दशक मंत्रीपद भूषविणाऱया बड्या मंत्र्याला खिंडीत पकडण्यामागे भाजपचे भविष्यकालिन राजकरण आहे. केवळ राज्याच्या अनुंषगाने नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात असलेली राष्ट्रवादीची राजकीय, सहकारातील ताकद कमी करण्याचे भाजपचे डावपेच, रणनीती लपून राहिलेले नाहीत. त्यासाठी जी शस्त्र, हत्यारे, आयुधे वापण्यात येत आहेत, त्यामध्ये आरोपांचेही प्रभावी शस्त्रही आहे. त्यातून शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रहार केले जात आहेत. तेच अस्त्र मुश्रीफांविरोधात वापरण्यात आले आहे. आरोपानंतर मुश्रीफांनी उत्तर दिले आहे. अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. न्यायालयीन, चौकशीच्या स्तरावर त्याचे काय होईल ते माहित नाही, पण सध्या तरी मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा पाटील अर्थात भाजप यांच्यातील संघर्षाचा आलेख उंचावत चालला आहे. त्याचे भविष्यकालिन परिणामही होणार आहेत.

जिल्ह्यात राजकीय ध्रृवीकरणाची नांदी
संघर्षातून बदलत जाणाऱया स्थितीत जिल्ह्याचे राजकारणही दोन गटात विभागले जाणार आहे. राजकीय ध्रृवीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नजीकच्या काळात होणाऱ्या महापालिका आणि केडीसीसीच्या निवडणुकीत थेट पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस असा एक गट आणि त्याला शिवसेनची साथ विरूद्ध चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि मित्र पक्ष असा गट. भाजपकडे चंद्रकांतदादा यांना साथ देण्यासाठी माजी खासदार धनंजय महाडिक, शाहू समुहाचे सर्वेसर्वा समरजितसिंह घाटगे यांची ताकद असणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा महाडिक गट, ताराराणी आघाडीची भाजपला साथ असणार आहे. माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे सध्या भाजपबरोबर आहेत. ते भविष्यात भाजपबरोबरच राहितील, असे चित्र आहे. राजकारणातील या दोन गटातील ध्रृवीकरणानंतर त्यांना आपापली राजकीय ताकदही दाखवावी लागणार आहे. त्यातून त्यांचे राजकीय अस्तित्वही सिद्ध होणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. केडीसीसीची निवडणूक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी होऊ शकते. त्याच दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थातील काही नगरपालिका आणि सहकारी संस्थांच्याही निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय बांधणी आणि रणनीतीची दोन्ही गटांनी सुरूवात केली आहे. त्यात खऱ्या अर्थात भाजपचा कस लागणार आहे. खरी कसोटी चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरीने महाडिक आणि घाटगेंची लागणार आहे.

राजू शेट्टींच्या भूमिकेकडे लक्ष
पूरग्रस्त शेतकऱयांच्या मदतीवरून राजू शेट्टी ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत, ते पाहता, भाजपला ऍडव्हाटेज मिळत आहे. किंबहुना त्यांची भाजपबरोबर जवळीक वाढत असल्याचीही चर्चा आहे. त्यातून उद्या जिल्हÎाच्या राजकीय ध्रृवीकरणात शेट्टींची `स्वाभिमानी’ भाजपबरोबर असू शकते.

Related Stories

शिंदेवाडीतील ४९ अहवाल निगेटिव्ह

Archana Banage

रिक्षा मीटर फेरफार करणाऱ्या व्यावसायिकांना योग्य सूचना द्या

Archana Banage

कोल्हापूर : कबनुरात कोरोना बाधितांची संख्या 106 वर

Archana Banage

भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांचा फोन आला; यड्रावकरांचा खुलासा

Archana Banage

कोल्हापूरात  महापुराने बाधित ऊस क्षेत्राच्या तोडणीबाबत आढावा बैठक

Archana Banage

कोल्हापूर : अज्ञाताकडून 35 हजाराचा दारूसाठा लंपास

Archana Banage