Tarun Bharat

कोल्हापूर : अन्यथा मनपा इमारतीवरुन उड्या घेवू

शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा आत्मदहनाचा इशारा

घरफाळा घोटाळ्याची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी

प्रतिनिधी / कोल्हापूर

महापालिकेच्या बहुचर्चित घरफाळा घोटाळ्यासंदर्भात गेली वर्षभर पाठपुरावा सुरु आहे. वारंवार मागणी करुनही प्रशासन ठोस माहिती जाहीर न करता अधिकारी, कर्मचारी यांना पाठीशी घालत आहे. प्रशासनाने पुढील सात दिवसात घरफाळा घोटाळ्याची श्वेतपत्रिका जाहीर करा अन्यथा महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात मनपा इमारतीवरुन उड्या घेवून आत्मदहन करण्याचा इशारा शहर व जिल्हा नागरी कृती समितीने दिला. तसेच घरफाळा घोटाळ्याची एसआयटी तर्फे चौकशी करण्याची मागणीही समितीने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे केली.

समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी घरफाळा घोटाळ्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त देसाई यांची भेट घेवून चर्चा केली. याप्रसंगी बोलताना समितीचे रमेश मोरे म्हणाले, घरफाळा घोटाळ्याबाबत गेली वर्षभर वारंवार जनआंदोलन करुन संबंधित दोषींवर कारवाई करुन संबंधित मिळकत धारकांकडून घरफाळा वसुल करण्याची मागणी करत आहे. मात्र घोटाळ्याबाबत प्रशासनाकडून केवळ चालढकल करण्याचे काम सुरु आहे. अहवालही अद्याप सादर करण्यात आलेला नाही. घोटाळ्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी केवळ चौघांवर कारवाई केली आहे. यामध्ये एकूण 19 कर्मचाऱयांच्या समावेश असल्याचे समोर आले आहे. मग केवळ चौघांवरच कारवाई का, उर्वरीत कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी केली.

शिष्टमंडळामध्ये अशोर पोवार, कादर मलबारी, राजू माळेकर, भाऊ घोडके, श्रीकांत भोसले, सी. एम. गायकवाड, लहूजी शिंदे, मोहन पाटील, रामभाऊ कोळेकर, राजेश वरक आदींचा समावेश होता.

दोषी असल्यास कारवाई झालीच पाहीज

घरफाळा घोटाळा प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये गेली पंधरा दिवस एकमेकांवर चिखल फेक सुरु आहे. दोन्ही बाजूने कागदपत्र सादर करुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मग प्रशासन गप्प का, कागदोपत्री प्रकरणे पुढे आणूनही प्रशासन कारवाई का करत नाही. प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सत्ताधारी, विरोधक यांनी सादर केलेल्या कागपत्रांची तपासणी करावी. यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई झालीच पाहीजे, अशी मागणीही समितीने केली. यावर सहाय्यक आयुक्त सतेज औंधकर यांनी कागद पत्रांची तपासणी सुरु असल्याचे सांगितले.

 लवकरच थर्ड पार्टी ऑडीट

घरफाळा विभागाचे लवकरच थर्ड पार्टी ऑडीट केले जाणार आहे. यानंतर विभागातील घोटाळा निश्चित होईल. ऑडीटसाठी लवकरचा समिती येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले.

10 लाखावरील थकबाकीदारांची नावे जाहीर करा

शहरातील 10 लाखांवर थकबाकी असणाऱया मिळकतधारकांची नावे प्रशासनाने डिजीटल फलकावरुन जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप काहीच हालचाल नाही. वाटल्यास फलकाचे खर्च आम्ही देतो पण 10 लाखांवरील थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

Related Stories

जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर एक टक्‍क्‍यावर आणण्यासाठी प्रयत्नशील रहा

Archana Banage

सलग दोन दिवस शिरोळ तालुक्यात तेरा पॉझिटिव्ह

Archana Banage

KOLHAPUR; जिल्ह्यातील अस्सल सोनं बेन्टेक्स होणार! खासदार मंडलिक, माने शिंदेशाहीत दाखल होण्याची चिन्हे

Rahul Gadkar

इराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू

Archana Banage

‘सीपीआर’चे ‘किचन’ व्हेंटिलेटरवर..!

Archana Banage

कोल्हापूर : महापालिकेची सभा तहकूब

Archana Banage