अनेक कामे रखडली.. !
रवींद्र केसरकर / कुरुंदवाड
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर १२ वर्षांनी येणारा कन्यागत महापर्व काल २०१६-१७ मध्ये पार पडला. यासाठी मोठा गाजावाजा करून शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तत्कालीन भाजप-सेना युती सरकारने १२१ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कन्यागतच्या पहिल्या टप्प्यातून अनेक कामेही झाली, मात्र दुसऱ्या टप्प्यात २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही यातील सुमारे ११ कोटींचा निधी थकल्याने दुसऱ्या टप्प्यातील अनेक कामे रखडली आहेत. निधी न आल्यामुळे अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक ठेकेदारांची बिले थकली आहेत.
मंजूर असलेल्या थकित अकरा कोटीच्या निधीसाठी आजी-माजी लोकप्रतिनिधींबरोबर ठेकेदार आणि संबंधितांचे मुंबई औरंगाबादकडे हेलपाटे झाले. मागील वर्षीच्या कोरोनामुळे निधी उपलब्ध नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आल्याची चर्चा जोरदार होऊ लागली आहे. कोरोनाची परिस्थिती आता सुधारली असून निदान आता तरी दुसऱ्या टप्प्यातील अर्धवट राहिलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी शासनाने मंजूर निधी त्वरित संबंधित खात्याकडे वर्ग करावा अशी मागणी भाविक यात्रेकरू तसेच संबंधितांकडून होत आहे.


गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा फटका विविध विकास कामाच्या शुभारंभांना बसू नये यासाठी घाईगडबडीत आचारसंहिता लागण्यापूर्वीच मोठा डामडौल न करता तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दुसऱ्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करत कामांना सुरूवात झाली पण दुसऱ्या टप्प्यातील निधी महापूर पाठोपाठ कोरोना आदी कारणांमुळे शासनाकडे अडकला. चालू झालेली कामे आहे त्या स्थितीत बंद पडली याबाबत यात्रेकरू ग्रामस्थांकडून विचारणा होऊ लागली मात्र निधी नसल्यामुळे काम बंद आहे असे संबंधितांकडून सांगण्यात येऊ लागले.
कन्यागत दुसऱ्या टप्प्यातील ९ कोटी ४८ लाख ९३ हजार ४३१ रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत. ५ कोटी २१ लाख ९६ हजर ९८९ रुपये प्रलंबित आहेत. १४ कोटी ७० एवढी बिले एन्व्हायरमेंट पूर्ण आहे. एकूण ११ कोटी ३३ लाखाची बिले प्रलंबित आहेत. यामध्ये आर बी सी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (२ कोटी ९८ लाख) याचा समावेश आहे. यासाठी वाढीव निधीची गरज आहे.
कन्यागतच्या दुसऱ्या टप्प्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये सुरू असलेली बहुमजली पार्किंग, विठ्ठल मंदिर भक्त निवास, जैन संस्कृतिक भवन, जनाबाई संस्कृती हॉल, यांचे काम ४० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. आरसीबी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, संभाजीनगर भुयारी गटार, ओतवाडी भागातील रस्ते, वाढीव वसाहत गटार काम आदी कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत.
एकूणच कन्यागतच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी न आल्यामुळे या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ज्या पायाभूत सुविधांसाठी निधी मंजूर झाला तो न आल्याने येथील विकास रखडला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. तात्काळ हा निधी संबंधित खात्याकडे वर्ग झाल्यास प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होऊन या भागाचा सर्वांगीण विकास होणार आहे व खऱ्या अर्थाने कन्यागत महापर्व कालाचे पुण्य त्यांच्या पदरात पडणार आहे.