Tarun Bharat

कोल्हापूर :`केआयटी’च्या अमृता कारंडेला 41 लाखांचे पॅकेज

आंतरराष्ट्रीय ऍडोब कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून निवड : कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा


प्रतिनिधी / कोल्हापूर

इंजिनिअरिंगच्या शिक्षणात राज्यातील अव्वल संस्थांपैकी एक म्हणून लौकिक असणाऱया केआयटी (कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) कॉलेजची विद्यार्थिंनी अमृता कारंडेची ऍडोब या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. सर्व सामान्य घरातील असणाऱ्या अमृताला तब्बल 41 लाख रूपयांचे पॅकेज मिळाले आहे. मेहनत आणि कष्टाच्या जोरावर अमृताने आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवून कोल्हापूरबरोबर केआयटीचा नावलौकिक वाढविला आहे.

केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागांतर्गत संगणकशास्त्र विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या अमृताला निवडीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले असल्याची माहिती केआयटीचे चेअरमन सुनील कुलकर्णी, ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. अमित सरकार यांनी दिली. तिच्या या यशाबद्दल केआयटीच्यावतीने अमृतासह तिचे वडील विजयकुमार आणि आई राजश्री यांचा विशेष गौरव करण्यात आला.

अमृता केआयटी कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. तेंव्हाच ती ऍडोब कंपनीने घेतलेल्या `सी कोडिंग’ स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेतून अमृताची अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. त्या काळात तिला महिन्याला एक लाख रुपये शिष्यवृत्ती देखील मिळाली. या इंटर्नशिप काळात घेण्यात आलेल्या विविध चाचणी परीक्षांमधून तिने दाखविलेली गुणवत्ता प्रमाणभूत धरुन ऍडोब कंपनीने तिला खास प्री-प्लेसमेंटची ही ऑफर दिली. अमृताला केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जींन्नी, कुलसचिव डॉ. मनोज मुजुमदार, विभागप्रमुख डॉ. ममता कलस, प्लेसमेंट अधिकारी डॉ. अमित सरकार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहान लाभले.

सर्वसामान्य कुटुंबातील अमृताचा झेंडा

अमृताचे वडील विजयकुमार कारंडे रिक्षाचालक आहेत. आई राजश्री कारंडे या गृहिणी आहेत. भाऊ सुजल दहावीत शिक्षण घेतो. कारंडे कुटुंब जवाहर नगरात वास्तव्यास आहे. अमृताचे शालेय शिक्षण इंदुमती गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले. विवेकानंद कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ती केआयटी कॉलेजमध्ये दाखल झाली. जवाहरनगर ते केआयटी ते ऍडोब कंपनी असा तिचा शैक्षणिक यशाचा प्रवास कोल्हापूरच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरला आहे.

इटर्नशिपमध्ये ऍडोब कंपनीने एक प्रोजक्ट दिला होता. त्यामध्ये सी कोडिंगचे ज्ञान आणि थिंकिंग स्किल (विचार करण्याची क्षमता) तपासण्यात आली. त्यातील गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात आली. -अमृता कारंडे, केआयटीची विद्यार्थिनी

 

Related Stories

रूग्णांसाठी तप्तर सेवा !

Archana Banage

निरंजन टकले यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी कोरोना बाधित

Archana Banage

जिल्ह्यात चार नवे रुग्ण, १६ जण कोरोनमुक्त

Archana Banage

कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण तरच सातवा वेतन आयोग

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात सक्रीय रूग्णांमध्ये वाढ,नवे रूग्ण, कोरोना मृत्यूमध्ये घट

Archana Banage