Tarun Bharat

कोल्हापूर : ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण कमी,समूह संसर्गात वाढ

जास्तीत जास्त ‘हाय रिस्क कॉन्टॅक्टस्’ शोधण्याचे आदेश

कृष्णात चौगले / कोल्हापूर

कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची माहिती संकलित करण्याचे काम ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेल’ च्या माध्यमातून सुरु आहे. यामध्ये बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेले (हाय रिस्क कॉन्टॅक्ट), आणि बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले लोक पुढे किती व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत (लो रिस्क कॉन्टॅक्ट), याची माहिती घेतली जात आहे.

आतापर्यंत कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 80 हजाराहून अधिक नागरिकांचा शोध घेतला आहे. पण केवळ बाधितांच्या घरामध्ये एकत्रित राहणार्‍या हाय रिस्क कॉन्टॅक्टस् शोधण्यावर भर दिला असून कामाच्या ठिकाणी संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली गेलेली नाही. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात समूह संसर्गजन्य स्थिती निर्माण झाल्याची खंत राज्य शासनाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहर व ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कोरोना रुग्णांच्या मागे शोधण्यात आलेले ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ कॉन्टॅक्टस्ची सरासरी संख्या अनुक्रमे 3.4 व 1.0 एवढी आहे. ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाचे जास्तीत जास्त हाय रिस्क कॉन्टॅक्टस् शोधण्याचे निर्देश प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना नुकतेच दिले आहेत. ‘पॉझिटिव्ह केस’ आढळल्यानंतर कंटेनमेंन्ट झोन निश्चित करण्यात येतो. या झोनमध्ये दररोज 14 दिवसांपर्यंत घरोघर फिरून सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे. पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या टिम दररोज या झोनमध्ये भेट देत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे अत्यंत त्रोटक अहवाल न देता परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण सर्व्हे करण्याच्या शासनाने सुचना दिल्या आहेत. रुग्णाचे निदान झाल्यानंतर 24 तासांच्या आत संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क कॉन्टॅक्टस्’ची माहिती घेणे, कंटेनमेंन्ट झोन निश्चित करून दररोज सर्व्हे करणे, या परिसरामध्ये ‘आयएलआय’ तसेच ‘सारी’चे रुग्ण शोधणे, तसेच कार्यक्षेत्रातील व्याधीग्रस्त लोकांचा सर्व्हे करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणेला सूचना देण्याचे निर्देशही शासनाने प्रशासनाला दिले आहेत.

जिल्ह्यातील सीपीआर हॉस्पिटल, इचलकरंजी व गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालये व काही खासगी रुग्णालयांना डीसीएच (डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल) म्हणून निश्चित केले आहे. पण सध्या रुग्णांची वाढती संख्या पाहता खासगी हॉस्पिटल्स अधिग्रहित करून तेथे कोरोनाबाधितांवर उपचार करणे अत्यावश्यक आहे. आजतागायत कोल्हापूर महानगरपालिकेचे कोणतेही रुग्णालय डीसीएच म्हणून निश्चित केलेले नाही. त्यामुळे सध्या कार्यान्वित असलेले महापालिकेचे रुग्णालय डीसीएच करून तेथे कोरोनाबाधितांवर उपचार सुरु करण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. अशा ‘डीसीएच’ रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा तपासण्या उपलब्ध ठेवून अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सीजन देण्याच्या सुविधेमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने डूरा सिलिंडर व ऑक्सीजन टँक उपलब्ध करून ऑक्सीजन मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही शासनाचे प्रशासनाला दिले आहेत.

भविष्यातील रुग्णसंख्येचा अंदाज चुकणार !
जिल्ह्यात 15 दिवसानंतर किती रुग्णसंख्या होईल याचा अंदाज घेऊन आवश्यक वैद्यकीय यंत्रणेबाबतचा शासनाने आढावा घेतला आहे. त्यानुसार 64 ऑक्सीजनेटेड बेड, 6 आयसीयू बेड आणि 94 व्हेंटीलेटर्सची गरज भासणार असल्याचा शासनाचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध करण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या आहेत. पण जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता शासनाने 15 दिवसानंतरच्या कोरोना रुग्णसंख्येबाबत आणि आवश्यक वैद्यकीय यंत्रणेबाबत बांधलेला अंदाज चुकणार आहे. येत्या महिनाभरात जिह्यात कोरोनाचा विस्फोट होणार असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. त्या तुलनेत सर्व आरोग्य यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी मुंबईतील बंद झालेल्या कोविड केंद्रातील साहित्य तत्काळ कोल्हापूरला आणण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे.

Related Stories

डॉ. सुनीलकुमार लवटे सत्कार समितीची सामाजिक बांधिलकी

Archana Banage

‘आरोग्य’मध्ये स्थानांतरण, काम बांधकाम विभागात

Archana Banage

तर अशोक चव्हाणांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, सकल मराठा क्रांतीचा इशारा

Archana Banage

कोल्हापूर : यंदा पहिली उचल एफआरपी अधिक दोनशे

Archana Banage

Ratnagir : जिल्ह्यात तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार

Abhijeet Khandekar

नृसिंहवाडी मंदिर परिसरात बेकायदेशीर मासेमारी कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Archana Banage