Tarun Bharat

कोल्हापूर : कोरोनाबरोबरच आता ‘सीसीएफ’चा धोका

कोविड विषाणू बरोबरच करावा लागणार सीसीएफचा सामना, जनावरांपासून माणसांना होणारा रोग, गुजरात राज्यात जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव , महाराष्ट्रामध्येही या रोगाचा धोका, शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून सर्व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश

कृष्णात चौगले/ कोल्हापूर

देशात कोरोनाचा कहर झालेला असताना आता गुजरात राज्यातील बोताड व कच्छ या जिल्हयांमध्ये ‘क्रिमीन कोंगो हेमोरहाजीक फेवर ‘ (सीसीएफ) या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाल्याचे आढळुन आले आहे. हा रोग झुनोटिक स्वरुपाचा (जनावरांपासुन माणसांना होणारा रोग ) असुन या रोगाचा प्रादुर्भाव यापूर्वी कोंगो दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशांमध्ये झाला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव गुजरातमधून महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. हा रोग माणसांसाठी धोकादायक असल्यामुळे त्याबाबत तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सर्व जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

   हा रोग नैरो व्हायरस या विषाणुमुळे होत असुन हे विषाणु मुख्यत्वेकरुन 'ह्यालोम्मा' या जातीच्या गोचिडांव्दारे एका जनावरांपासुन दुसऱ्या जनावराला व बाधित जनावरांपासुन मानवांमध्ये संक्रमित होतात. या रोगामुळे पाळीव जनावरांमध्ये ( गाई, म्हशी, शेळया, मेंढया आदी. ) तसेच ऑस्ट्रीच , शहामृग पक्ष्यामध्ये सहसा रोगाची कोणतीही लक्षणे दिसुन येत नाहीत. पण अशी बाधित जनावरे , पक्षी या विषाणुंचे वाहक म्हणुन कार्यरत राहतात. अशा वाहक जनावरांच्या संपर्कामध्ये आलेल्या मानवांना ( जनावरांचे मालक, जनावराच्या संपर्कातील व्यक्ती, खाटीक, उपचार करणारे पशुवैद्यक व कर्मचारी ) या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे बाधित जनावरांचे मांस खाल्याने तसेच बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने व किटकांच्या (गोचिड, पिसवा, डास आदी ) दंशामुळे या रोगाचा मानवांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मानवांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत घातक असल्याचे दिसुन आले आहे . या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाधित व्यक्तींपैकी 30 टक्क्यांपर्यंत व्यक्ती त्वरीत निदान व उपचार न झाल्यास मृत्यु पावण्याची शक्यता असते. या विषाणुजन्य रोगाविरुध्द प्रभावी व हमखास उपयुक्त असे उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाह्य किटकांचे उच्चाट्न करण्याची प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.                   

        रोगामुळे 9 ते 30 टक्के मृत्यूचे प्रमाण
 या रोगाने बाधित झालेल्या व्यक्तीमध्ये सुरवातीला डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी होणे आदी लक्षणे दिसुन येतात. आजारी व्यक्तींचे डोळे लाल दिसतात. घशात तसेच तोंडातील वरच्या भागात लाल ठिपके दिसु लागतात. आजार बळावल्यास त्वचेखालील रक्तस्त्राव, नाकातून रक्तस्त्राव, लघवीतुन रक्तस्त्राव अशी विविध लक्षणे दिसुन येतात. काही रुग्णांमध्ये कावीळी सारखी लक्षणे दिसतात. या रोगामध्ये मृत्युचे प्रमाणे 9 ते 30 टक्के इतके असु शकते. सीसीएचएफ रोगाची लागण प्रमुख्याने ज्या व्यक्तीचा व्यावसायीक कारणामुळे संक्रमित पशुशी संपर्क येतो, अशा व्यक्तींना होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये पशुपालक किंवा पशुधन प्रक्षेत्रावर काम करणारे कामगार, पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबधित व्यक्ती आणि कत्तलखान्यात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती या शिवाय मानवी आरोग्य क्षेत्रात काम करण्याच्या व्यक्तींना देखील या रोगाची लागण होण्याचा धोका अधिक असतो.                                 
                                                    
   रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनप्रबोधनाची गरज

महाराष्ट्र राज्य गुजरात राज्याच्या लगत असल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव राज्यात होण्याची शक्ता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यात सदर रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी शासनाने खबरदारीचा उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.यामध्ये जनावरांवरील, शेळया – मेंढयावरील व गोठयातील गोचिड आणि किटकांचे उच्चाटन करणे आत्यंत आवश्यक आहे. यासाठी बाहय किटकांचा ,गोचिडांचा नाश करणाऱ्या औषधांची जनावरांवर तसेच गोठयामध्ये इतरत्र योग्य प्रमाणात फवारणी करणे आवश्यक आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकरी, दुग्ध व्यावसायीक, शेळी-मेंढी पालक यांचे विस्तृत प्रमाणावर प्रबोधन करणे आवश्यक आहे. सदर रोगाचा प्रसार गोचिडांशी संपर्क आल्याने होत असल्याने गोचिड हाताने काढणे, हाताने मारणे टाळावे. तसेच गोचिड चावणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी. हा रोग पशुंचे कच्चे मांस खाल्याने होवू शकतो .त्यामुळे मांस चांगल्या प्रकारे शिजवून खावे. आजारी जनावरांवर उपचार करताना वापरण्यात येणारी सामग्री जंतूनाशकांनी , साबणाने हात स्वच्छ धुवावेत.जनावरांचे बाजार तसेच यात्रेच्या ठिकाणी विविध भागातील तसेच इतर राज्यातुन जनावरे येत असतात. अशावेळी व्यावसायीकांना योग्य ते मार्गदर्शन करावे.

गुजरात मधून जनावरे आणणे टाळणे आवश्यक गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात गीर गाई, मेहसाना व जामाबादी माशी तसेच शेळ्या,मेंढ्या आदी जनावरे येत असतात. सीसीएफ हा आजार गुजरात राज्यातील कच्छ व बोताड जिल्ह्यांमध्ये नियंत्रणात येत नाही, तो पर्यंत गुजरात राज्यातील गाई, मशी तसेच शेळया- मेधा खरेदी करणे थांबवणे आवशक आहे. कत्तलखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचा-यांनी प्राण्यांच्या रक्ताची मांसाची अथवा इतर दवाशी थेट संपर्क येणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

महाराष्ट्र बंदला म्हासुर्लीत बाजारपेठा बंद ठेवत प्रतिसाद

Archana Banage

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह संख्या 507 वर

Archana Banage

अंबाबाई मंदीर व्यवस्थापनाकरिता कायद्याची अंमलबजावणी करा -आ. प्रकाश आबिटकर

Archana Banage

शेतकरी समाधानी, कारण गतवर्षाच्या तुलनेत 40 टक्के अधिक पाऊस

Rahul Gadkar

महावितरणकडून राधानगरी धरणाचा वीज पुरवठा खंडित

Abhijeet Khandekar

Kolhapur : आरे- सावरवाडी जवळील नदीपात्रात आढळला बेवारस मृतदेह

Abhijeet Khandekar