Tarun Bharat

कोल्हापूर : गणी आजरेकरांनी बदनामीचा दावा करून दाखवावाच

प्रतिनिधी / कोल्हापूर

महापौर निलोफर आजरेकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून खासगी जागेत महापालिकेच्या निधीची तरतूद केली. ही बाब समोर आल्यानंतर भाजपने नगरविकास खात्याकडे महापौरांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी तक्रार नोंदविली. या तक्रारीनंतर गणी आजरेकर यांनी भाजपाच्या पदाधिकाऱयांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी असा दावा दाखल करावाच, असे आव्हान भाजपाचे सरचिटणीस अशोक देसाई, हेमंत आराध्ये यांच्यासह पदाधिकाऱयांनी एका पत्रकाव्दारे दिले आहे.

महानगरपालिकेच्या सन 2020-21 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात बाबुजमाल जवळील एका खासगी बोळास सार्वजनिक बोळ संबोधून त्यात ड्रेनेज लाईन व पेव्हिंग ब्लॉकसाठी तीन लाखांची तरतूद मंजूर करून घेण्यात आली. हा बोळ वास्तवात सार्वजनिक नसून खासगी असल्याचे भाजपाने त्या जागेचा नकाशा व प्रॉपर्टी कार्डांवरून सिध्द केले. तसेच महापौरांचे पती व दीर यांच्या नावे असलेल्या जागांवर चाललेल्या बांधकामासाठीच या ड्रेनज लाईन व पेव्हिंग ब्लॉकचा वापर होणार हे देखिल सिध्द झाले. तरीही वारंवार महापौरांचे कुटुंबीय या जागेशी त्यांचा संबंध नसल्याचे म्हणत आहेत व बदनामीचा दावा दाखल करण्याची धमकी देत आहेत. त्यांनी तो दावा करावाच असे या पत्रकात म्हटले आहे.

नुकतेच त्या बोळातील इतर सर्व मालमत्ताधारकांनी आयुक्तांना एक पत्र दिले आहे. त्या पत्रामध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम 262 ते 264 अंतर्गत महानगरपालिकेचे बजेट खर्च करण्याचे पूर्ण अधिकार आयुक्तांना आहेत असे म्हटले आहे. वास्तविक या अधिनियमाचे नाव बदलले असून त्यातील कलम 262 ते 264 ही बांधकाम परवानगीशी संबंधीत आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच या पत्रामध्ये सदर बोळ हा कारंजकर वाडा या खासगी मिळकतीतील बोळ असून ‘सदरचा बोळ तांत्रिकदृष्टय़ा महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास तयार आहोत.” असेही संबंधित नागरीकांनी म्हटले आहे.’ याचा अर्थ सद्यःस्थितीत हा बोळ खासगी आहे. ज्या नागरीकांनी कामासाठी निधीची मागणी केली तेच नागरीक हा बोळ खासगी मिळकत असल्याचे या पत्राद्वारे सांगत आहेत. त्यामुळे आता आजरेकर कुटुंबाने कोल्हापूरकरांची दिशाभूल थांबवावी आणि महापौर निलोफर आजरेकर यांनी तातडीने राजीनामा द्यावा. यापूर्वी मागणी करूनही महापौरांनी राजीनामा दिला नसल्यामुळे येत्या दोन दिवसात भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक होऊन त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे ही या पत्रकात म्हटले. पत्रकावर उपाध्यक्ष संजय सावंत, शिवाजी पेठ मंडल अध्यक्ष प्रदीप पंडे, मंडल सरचिटणीस राहुल पाटील, प्रभाग अध्यक्ष संजय फलटणकर यांच्याही स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

ध्येयवेड्या प्रसन्नजितची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी

Archana Banage

कोल्हापूर : टाकळीवाडीनजीक कर्नाटक बनावटीच्या दारु जप्त

Archana Banage

कोरोना मदत कार्यास नागरीकांनी सहकार्य करावे – मुख्याधिकारी काटकर यांचे आवाहन

Patil_p

गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या कार्यालयातील 20 जण पॉझिटिव्ह

datta jadhav

मुख्यमंत्र्यांनी प्रताप सरनाईक यांच्याबद्दल घेतला मोठा निर्णय, संजय राऊतांचं मोठं विधान

Archana Banage

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आढावा बैठकांना वेग

Patil_p