Tarun Bharat

कोल्हापूर : चूक रुग्णालयांची, शिक्षा पंचक्रोशीला

Advertisements

कोल्हापूर / कृष्णात चौगले

पश्चिम पन्हाळयातील मोठय़ा बाजारपेठेच्या गावामधील ह्य्दयविकाराचा त्रास असलेल्या एका रुग्णावर कोल्हापूरातील एका रुग्णालयामध्ये शस्त्रकिया करण्यात आली. वीस दिवसांपूर्वी ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला घरी आणले. पण अवघ्या चार ते पाच दिवसांतच त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यांच्या स्बॅबची तपासणी केल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला. त्यानंतर संबंधित रुग्णाच्या प्रथम संपर्कात आलेल्या कुटूंबातील सदस्यांसह प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवालदेखील कोरोना पॉझिटीव्ह आला. यामध्ये जवळपास 40 जण कोरोनाबाधित झाले. तर लक्षणे असूनदेखील स्वॅबच्या तपासणीसाठी बहुसंख्य नागरिक पुढे येत नसल्यामुळे येत्या काही दिवसात मोठय़ा समुह संसर्गाची शक्यता आहे. यामध्ये बेजाबदारपणे रुग्णसेवा करणाऱया खासगी रुग्णालयाची चूक असली तरी शिक्षा मात्र 15 ते 20 गावांतील नागरिकांना भोगावी लागणार आहे.

जिह्यात कोरोनाचा सामुहिक संसर्ग झाला असून दररोज 600 ते 700 कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मोठय़ा शहरांबरोबरच खेडय़ापाडय़ांपर्यंत कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे ग्रामीण जनता देखील दहशतीखाली सापडली आहे. गावात एक रुग्ण सापडल्यास त्याच्या प्रथम आणि द्वितीय संपर्कातील 40 ते 50 व्यक्ती बाधित होताना दिसत आहेत. गेल्या महिन्याभरात विविध विकारांच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला पहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी या शस्त्रक्रिया झाल्या, त्या हॉस्पिटल्मध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक उपायायोजना राबविल्या जात नसल्यामुळेच रुग्ण मूळ विकारातून बरे होत असले तरी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. विशेष बाब म्हणजे या रुग्णांच्या सेवेत असणारे कुटूंबातील सदस्य आणि प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जाणारे नातेवाईक देखील कोरोनाबाधित होताना दिसत आहेत.

 समुह संसर्गाला खतपाणी
 
कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेले बहुसंख्य नागरिक आपल्या आणि कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी स्वॅब तपासणी करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. ग्रामदक्षता समितीकडून याबाबत आवाहन केले जात असूनदेखील संबंधित नागरिकांकडून लक्षणे दिसूनही तपासणी केली जात नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील वृद्ध व्यक्तींना जास्त धोका निर्माण झाला असून अनेकांचा अचानकपणे मृत्यू झाला  आहे. तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱया अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्यामुळे समुह संसर्गाला एकप्रकारे खतपाणी घातले जात असल्याचे चित्र आहे.

अहवाल मिळण्यास होतोय उशीर, संसर्गाचा धोका वाढला

कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वाब तपासणीसाठी दिल्यानंतर त्याचा अहवाल 1 ते 2 दिवसात मिळणे आवश्यक आहे. पण 5 ते 6 दिवस अहवाल मिळत नसल्यामुळे संशयित रुग्णाची मोठी कुचंबना होत आहे. तसेच अहवाल मिळण्यास उशीर होत असल्यामुळे संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेले नागरिक आपल्या गावातून, वॉर्डातून मुक्तपणे संचार करताना दिसतात. त्यामुळे मोठय़ा समुह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. अहवाल लवकर मिळाल्यास संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करून त्यांची तत्काळ तपासणी करणे सोईस्कर ठरणार आहे. 

स्वॅबचा अहवाल आल्याखेरीज सुरु केले जात नाहीत उपचार

संस्थात्मक विलगीकरण केलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून देखील स्वॅबचा अहवाल आल्याखेरीज त्याच्यावर उपचार सुरु केले जात नाहीत. त्यामुळे मध्यम व तीव्र लक्षणे असलेले अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना आहेत. यामध्ये काही रुग्णांनी स्वॅब देण्यापूर्वी खासगी लॅबमधून केलेल्या चेस्ट स्कॅनिंगच्या अहवालामध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे असल्याबाबत स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीही विलगीकरण कक्षामध्ये स्वॅबचा अहवाल येईपर्यंत त्या रुग्णांवर उपचार केले जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी त्या रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असून त्यांच्या जिवीतास धोका आहे.
 
ग्रामदक्षता समित्यांची डोकेदुखी वाढली

ग्रामीण भागातील तरुण नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी जात असतात. कामानिमित्त ते दररोज शेकडो व्यक्तींच्या संपर्कात येत असतात. पण संपर्कात आलेली एखादी व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्यास त्या तरुणांनी स्वतःहून गृह अथवा संस्थात्मक विलगीकरण होणे अपेक्षित आहे. अनेकांकडून तसे होताना दिसत नाही. गावात कोणी संशयीत कोरोनाबाधित आढळल्यास त्याच्या स्वॅबचा अहवाल येईपर्यंत संपर्कातील इतर व्यक्तीनी दक्षता घेणे आवश्यक आहे. पण आरोग्य विभागाच्या सर्व सुचना पायदळी तुडवत ते गावातून मुक्तपणे फिरताना करताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामदक्षता समित्यांची डोकेदुखी वाढली आहे.

Related Stories

‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले”

Abhijeet Shinde

महापुरावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी शासनाला अहवाल द्या

Abhijeet Shinde

सातारा शहरातील सलून झाले सुरू

Patil_p

गोकुळची गरज ओळखूनच जागा खरेदी – चेअरमन विश्वास पाटील

Abhijeet Shinde

वाढीव वीज बिलांची त्रिसदस्यीय समितीतर्फे चौकशी करा

Abhijeet Shinde

मावळे असतात म्हणून राजे असतात, आमच्याकडून फाईल बंद: संजय राऊत

Rahul Gadkar
error: Content is protected !!