Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर ओसरण्याची गती होतेय संथ

-महामार्गांची वाढवलेली उंची, नदी मार्गातील पूल, बंधाऱयांसह अखूड नदीपात्र ठरतेय विसर्गासाठी अडथळा

कृष्णात चौगले/कोल्हापूर

जिह्यात आजपर्यंत आलेल्या महापुरासाठी अलमट्टी धरण आणि रेडझोनमधील बांधकामांना जबाबदार धरले गेले आहे. पण सध्या 75 टक्के पाणीसाठा असलेल्या अलमट्टी धरणातून 1 लाख 80 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातील पाण्याच्या फुगीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. गत आठवडय़ात तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा धोकापातळीच्या पुढे गेली. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तरीही पंचगंगेच्या पाणीपातळीत केवळ दोन फुटांनी घट झाली असून संथ गतीने पूर ओसरत आहे. महामार्गांचे बांधकाम करताना वाढवलेली रस्त्यांची उंची, पूर कालावधीत पाण्याच्या विसर्गासाठी महामार्गांवर मोहऱयांचा अभाव, नद्या, उपनद्यांची अखूड व उथळ पात्रे, नदी मार्गातील पूल आणि कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे हेच पूर ओसरण्यासाठी अडथळे ठरत असल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहे.

अलमट्टी धरण हे सांगली आणि कोल्हापूर या जिल्हयांना 2005 च्या पावसाळयात महापुराचा तडाखा देणाऱया नऊ कारणापैकी एक कारण असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे. हेच कारण संयुक्तिक धरून पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार सांगलीसह कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ, हातकणंगले तालुक्याचा भाग हा अलमट्टीचे पाणलोट क्षेत्र बनल्याचाच निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे शासन आदेशानुसार आणि आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून पाटब्ंाधारे विभाग दरवर्षी एक जूनपासूनच अलमट्टी धरणातील दैनंदिन पाणीसाठा, धरणातून पाणी सोडून देण्याची प्रक्रिया यावर लक्ष केंद्रीत करत आहे. जुलै 2005 मध्ये आलेल्या महापुराच्या तडाख्यात कोल्हापूर, सांगली जिल्हयांना मोठी हानी पोहोचली. पूर ओसरल्यावर सुरु झालेल्या अभ्यासात अलमट्टी धरणाची उंची आणि साठवले जाणारे पाणी यांचा एकत्रित परिणाम म्हणून फुग आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.

 कॅगच्या अहवाल, व पर्यावरणप्रेमींच्या अभ्यासातून अलमट्टी धरणच पुराला कारणीभूत ठरते असे गृहितक मांडण्यात आले. त्यानंतर 2019 च्या महापूरामध्येही अलमट्टी धरणाला महापूरासाठी जबाबदार धरण्यात आले. या धरणामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाल्यानंतर आवश्यक तितक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला नाही तर महापुराच्या अनेक कारणांपैकी अलमट्टीदेखील एक कारण बनते. म्हणूनच गेल्या आठवडय़ात आलेल्या महापूर कालावधीत महाराष्ट्र सरकारने अलमट्टीच्या पाणी पातळीसह धरणांतून होणाऱया विसर्गावर बारीक लक्ष ठेवून, त्याबाबत वेळोवेळी कर्नाटक शासनास सूचना दिल्या. पण महापूर कालावधीत अलमट्टी धरण केवळ 70 टक्केच भरले होते. तसेच 30 ते 40 हजार क्युसेकपर्यत विसर्ग सुरु होता. आता या धरणातील पाणीसाठा 75 टक्केपर्यंत पोहोचला असला तरी तब्बल 1 लाख 80 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सध्याच्या पूरस्थितीसाठी अथवा पूर ओसरण्यासाठी अलमट्टी धरणाचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे पर्यावरणतज्ञांचे म्हणणे आहे.

धोका पातळीसाठी रेडझोनमधील बांधकामे जबाबदार नाहीत

  पंचगंगेच्या इशारा आणि धोकापातळीपर्यंत पाणीपातळी पोहोचल्यानंतर रेडझोनमध्ये बांधलेल्या एकही इमारतीमध्ये पाणी शिरलेले नाही. त्यामुळे पूरस्थिती  धोका पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी रेडझोनमधील बांधकामेही जबाबदार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण पाणीपातळी 45 फुटांपेक्षा जास्त झाल्यानंतर शहरात निर्माण होणाऱया पूरस्थितीस मात्र रेडझोनमधील बांधकामे कारणीभूत ठरल्याचे गतवर्षीच्या महापूरामध्ये समोर आले आहे.

अनेक कारणांमुळे पूर ओसरण्यासाठी होतोय उशीर

  जिह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीसाठी पंचगंगा नदीपात्रात बांधलेले पूल, ठिकठिकाणी बांधलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तसेच महामार्गांचे बांधकाम करताना रस्त्यांची उंची वाढवली असून पाण्याच्या विसर्गासाठी मोहऱया बांधलेल्या नाहीत. पुलांचे बांधकाम करताना सरासरी पूररेषेचा विचार केलेला नाही. त्यामुळे पूर कालावधीत पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होत आहे. नद्यांची पात्रे झाडाझुडपांनी व गाळाने भरल्यामुळे ती आखूड आणि उथळ झाली आहेत. या सर्व कारणांमुळे केवळ दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर जिह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून पूर ओसरण्यासाठीही विलंब होत आहे.   – उदय गायकवाड, पर्यावरणतज्ञ

Related Stories

पंचगंगेची वाटचाल इशाऱ्याकडे….

Archana Banage

जिनोव्हा लस चाचणीसाठी हालचाली

Archana Banage

किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात याव आणि अंबाबाईचे दर्शन घ्यावं -हसन मुश्रीफ

Archana Banage

उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात 8 मे पर्यंत बंदी आदेश

Archana Banage

टरबूज आज कसब्यात फुटलं, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Archana Banage

सीमाप्रश्नावरील सुनावणी लांबणीवर

Abhijeet Khandekar