Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात आता ‘इर्मजन्सी’साठीच कोरोना लस!

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

राज्यातील कोरोना प्रतिबंधक लस तुटवड्याचा प्रभाव शुक्रवारी जिल्ह्यातील 210 केंद्रांवर झाला. लस संपल्याने ही केंद्रे बंद ठेवावी लागली. सध्या 40 केंद्रांवरच लस उपलब्ध आहे. अन् तिचा वापर फक्त इर्मजन्सीसाठीच होणार आहे. ही 40 केंद्रेच मिनी लॉकडाऊन काळात सुरू राहणार आहेत. पण लॉकडाऊनमध्ये लस घेण्यासाठी नागरीक कसे बाहेर पडणार, हा प्रश्न आहे.

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे. जिल्ह्यात लस तुटवडा असल्याने गुरूवारी 100 केंद्रे बंद होती. शुक्रवारी आणखी 110 केंद्रे लस नसल्याने बंद राहिली. देशात लसीकरणात महाराष्ट्र `टॉप’वर, तर राज्यात कोल्हापूर लसीकरणात `अव्वल’ आहे. फक्त 45 वर्षांवरील 5 लाख 10 हजार 899 लाभार्थींना पहिला डोस मिळाला आहे. जिल्ह्याने आजपर्यत 10 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. 15 लाख लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. पण लस तुटवड्यामुळे त्यात अडथळे आले आहेत.

जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर शुक्रवारीही लस संपली आहे, असे फलक होते. आरोग्य विभागाने 2 लाख 80 हजार लसीची मागणी केली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यत ही लस मिळालेली नव्हती. सोमवारी ती मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने 15 रोजी सर्वत्र लस उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले आहे. पण रूग्णांची वाढती संख्या पाहता लस घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढल्याने लस मागणी अन् पुरवठ्यातील समतोल बिघडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी लस संपल्याने आणखी 110 केंद्रे बंद झाली. सध्या जिल्ह्यातील फक्त 40 केंद्रांवर लस उपलब्ध आहे. यामध्ये 24 शासकीय हॉस्पिटल आणि 16 खासगी हॉस्पिटल्सचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी उर्वरीत 50 हजार डोसही जिल्ह्यातील विविध केंद्रांना वितरीत करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या 40 केंद्रांवर उपलब्ध लसीचा वापर हा केवळ इर्मजन्सीसाठी केला जाणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.

आरोग्य उसंचालक कार्यालयाकडे अवघे 30 बॉक्स शिल्लक

दरम्यान, आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे आजपर्यत कोव्हिशिल्डच्या 8 लाख 97 हजार 840 लस मिळाल्या आहेत. कोव्हॅक्सिनच्या 1 लाख 20 हजार 530 लस मिळाल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी 10 लाख 18 हजार 370 डोस आले होते. त्यापैकी 10 लाख 18 हजार 340 डोसचे वितरण झाले आहे. फक्त 30 बॉक्सचा साठा इर्मजन्सीसाठी शिल्लक आहे. तो नव्याने डोस उपलब्ध होईपर्यत जिल्हÎांना दिला जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. बोरसे यांनी सांगितले.

राज्यात शनिवारी, रविवारी मिनी लॉकडाऊन आहे. शुक्रवारी रात्रीपासून संचारबंदी आहे. शनिवारी, रविवारी सुटीदिवशी 40 केंद्रे सुरू राहणार आहेत. पण लस घेण्यासाठी लाभार्थी केंद्रांवर कसे पोहोचणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे या दिवशी लसीकरणाची दैनंदिन टक्केवारी अत्यल्प येण्याची शक्यता आरोग्य विभागातून व्यक्त करण्यात आली.

Related Stories

Kolhapur : कॅफिनयुक्त शितपेये विक्री करणाच्या दुकानदारांना सांगरूळ ग्रामपंचायतीच्या नोटीसा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एकास अटक

Archana Banage

गोकुळ निवडणूक : खासदार माने-महाडिक यांच्यात खलबते

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे 17 रुग्ण

Archana Banage

राधानगरी तालुक्यात 27 ते 29 नोव्हेंबर रोजी फिरत्या लोकअदालतीचे आयोजन

Abhijeet Khandekar

शिवसेना फुटीचा सेनेसह आबिटकर, मंडलिकांना फटका

Kalyani Amanagi
error: Content is protected !!