Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हय़ाचा विकास आराखडा 581 कोटींचा

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ासाठी 581 कोटींच्या विकास आराखडय़ाला शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हय़ातील 21 यात्रास्थळांना क वर्ग म्हणून मान्यता देण्यात आली असून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत 11 प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वॉटरबेल, नळ कनेक्शनन वॉटर मीटर, शहरातील 19 सिग्नलसाठी निधी आदींचा समावेश आहे. सभेत पूरग्रस्त निधी, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही चर्चेत आला. सर्व विभागांनी 100 टक्के निधी खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. माणगाव परिषद शताब्दी महोत्सवासाठी 50 लाखांची तरतूद करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची पहिलीच सभा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील  होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,  पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.

आरोग्य उपकेंद्राबाबत 15 दिवसांत बैठक घ्या

आरोग्य विभागाशी निगडीत आरोग्य केंद्रे, उपकेंद्राशी निगडीत प्रश्न मांडले. यावर सीपीआर हॉस्पिटलला कार्डीयाक रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलबाबत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्याच्या समवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, ग्रामीण रूग्णालये, आरोग्य उपकेंद्राबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी पंधरा दिवसांत बैठक घेऊन अहवाल द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

माणगाव परिषद शताब्दी महोत्सवासाठी 50 लाख

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील परिषदेला 21 मार्च रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हा शताब्दी सोहळा शासनाच्यावतीने व्हावा त्यासाठी 50 लाखांची मागणी करा, अशी  सूचना पालकमंत्र्यांनी केली. खासदार धैर्यशील माने यांनी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कामत यांना प्रस्ताव देण्यास सांगितले. कामत यांनी विशेष घटक योजनेची माहिती दिली.

पोलीस निवासस्थानासंदर्भात लवकरच बैठक

पालकमंत्री पाटील यांनी सुरूवातीलाच खर्च झालेल्या वन, सामाजिक वनीकरण, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभागांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकाऱयांना निधी खर्च का होत नाही, त्याबाबत विचारणा केली. राजाराम महाविद्यालयामधील यशवंतराव चव्हाण सभागृहासंदर्भात गतीने सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. पोलिसांच्या निवास व्यवस्थेबाबत लवकरच बैठक घेणार आहे. त्यावेळी सविस्तर आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

 956 कोटीसंदर्भात लवकरच खुलासा ग्रामविकासमंत्री

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱया शेतकऱयांची उपसमितीमार्फत माहिती घेण्यात येत आहे. त्यांनाही 1 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जिह्याच्या महापुराचा अहवाल जिल्हाधिकाऱयांनी राज्याला पाठवला होता, 956 कोटी राज्याला आले आहेत. मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. हा निधी कशासाठी आला आहे, त्याबाबत लवकरच  खुलासा होईल.

जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी  देसाई म्हणाले, मागील वर्षी 271 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद केली  होती. त्यापैकी 162.25 कोटी मिळाले आहेत. त्यापैकी 103.7 कोटी रूपये वितरीत केले आहेत. त्यापैकी 85 कोटी 12 लाख 75 हजार रूपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.

कर्ज घेतलेल्या शेतकऱयांना दुहेरी लाभ जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी देसाई यांनी महापुरामुळे 78 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले,  बाधित पिकांचे चालू कर्ज माफ केले आहे. ज्यांनी कर्ज घेतले नाही, त्यांना तिप्पट मर्यादा, पुरबाधित शेतकऱयांना या दोन्हींचा लाभ मिळणार आहे. 121 कोटीपैकी 36 कोटींचे वाटप पूर्ण झाले आहे. 15 दिवसांत उर्वरित वाटप पूर्ण होईल, असे सांगितले. पूरग्रस्तांना 300 कोटींचे वाटप झाल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट पेले.

जिल्हय़ात 21 वर्ग यात्रास्थळांना मंजुरी

नांदेकरवाडी अंबिका, हेळेवाडी-दत्तात्रय, मोहडे बुद्रुक-ज्योतीर्लिंग., बनाची वाडी-हनुमान, पिरळ-दत्त, सोन्याची शिरोली-भैरवनाथ, चंद्रे-मनुबाई, फराळे- अंबाबाई,डोंगराई,माळापुडे-विठ्ठलाईदेवी, हरोली-हालसिद्धनाथ, देऊळवाडी-, केदारलिंग, कलनाकवाडी-भावेश्वरी, कूर-विठूबाई, भादोले-म्हसोबा, कसबा नूल-हनुमान, बोरबेट-मोरजाईदेवी, धुंदवडे-जोतिर्लिंग, न्यू वाडदे-रामलिंग, निढोरी-भैरवनाथ, बेळवले खुर्द-भावेश्वरी तर सुरूपली येथील महादेव मंदिराला यावेळी क वर्ग यात्रास्थळे म्हणून मान्यता देण्यात आली.

नाविन्यपूर्ण योजनांना मान्यता

मौजे कोडोली येथे नळ कनेक्शनला वॉटर मीटर, विभागीय स्तरावर पुणे येथे तलाठी प्रशिक्षण केंद्र, दिव्यांगांना कृत्रीम अवयव, महिला सबलीकरणासाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रशिक्षण उपक्रम, अंबाबाई मंदिर परिसर सुधारणेंतर्गत भुयारी केबल, पुरातत्व विभागात अग्निशमन यंत्रणा, महापालिका हॉस्पिटलमध्ये रक्तघटक विघटन यंत्रणा (बीएसयू), कागलमधील क्रीडा संकुलात टर्फची निर्मिती यांचा समावेश आहे. जिल्हय़ातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी बोटलद्वारे दिले जाणार आहे. त्यासाठी वॉटरबेल योजना राबवली जाणार आहे. कोल्हापुरात 12 ठिकाणी नव्याने वाहतूक सिग्नल उभारले जाणार आहेत. त्यासाठी सव्वाकोटीची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात ६४ रुग्णांची वाढ

Archana Banage

कुंभोजमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ; शिरोलीच्या सर्वेश्वर संघाला उपविजेतेपद

Archana Banage

म्हासुर्लीतील गायरानात अतिक्रमण करण्यास लोकांची झुंबड

Archana Banage

शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी झाला जागतिक आघाडीच्या ‘कॉग्निझंट’ कंपनीचा प्रमुख

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने महिलेसह तिघांचा मृत्यू

Archana Banage

मल्हारपेठ येथे सकाळी गव्याचे दर्शन

Archana Banage