प्रतिनिधी/कोल्हापूर
चार दिवसांपुर्वी सीपीआरमधून रिक्षातून पळून गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा बुधवारी सकाळी सीपीआरमध्ये उपचार सुरू असता मृत्यू झाला. इचलकरंजीतील हा तिसरा बळी ठरला. या 56 वर्षीय पुरूषाच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 12 झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 15 पॉझिटिव्ह रूग्ण मिळून आले. यामध्ये इचलकरंजीतील 6, गडहिंग्लज तालुक्यातील 4, आजरा तालुक्यातील 2 आणि शिरोळ, करवीर आणि कागल तालुक्यातील एकाचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 865 वर पोहोचली आहे.
इचलकरंजी येथील कुडचे मळय़ातील 55 वर्षीय यंत्रमाग कामगार 22 जूनला उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल झाला. त्याचा स्वॅब घेण्यात आला. 23 जून रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 24 जून रोजी दुपारी सीपीआर हॉस्पिटलमधून हा रूग्ण पळाला. त्याने महाराणा प्रताप चौकातून रिक्षा पकडली अन् तो इचलकरंजीती कुडचे मळा येथील घरी पोहोचला. त्यासाठी त्याने रिक्षाला 700 रूपये भाडे दिले. त्याला पोलिसांनी त्याच रिक्षातून पुन्हा सीपीआरमध्ये दाखल केले. या रूग्णाला कॅन्सर होता. त्याच्यावर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे दोन लाख रूपये खर्च केले आहेत. या रूग्णाचा बुधवारी सकाळी 8 वाजता उपचार सुरू असता मृत्यू झाला. त्यामुळे इचलकरंजीतील हा तिसरा कोरोना बळी ठरला. तर जिल्हय़ातील हा बारावा बळी आहे.
जिल्हय़ात रात्री आठ वाजेपर्यत 15 जण पॉझिटिव्ह रूग्ण मिळून आले. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील 27 वर्षीय महिला, केरूर येथील 25 वर्षीय पुरूष, बेळगाव येथील 37 वर्षीय पुरूष, बाळेकुंद्री येथील 27 वर्षीय महिला, शिरोळ येथील 70 वर्षीय वृद्धा, इचलकरंजीत कलानगर येथील 44 वर्षीय पुरूष, अवधुत आखाडा येथील 30 वर्षीय महिला, गावभाग परिसरातील 35 वर्षीय पुरूष, अवधुत आखाडा येथील 26 वर्षीय पुरूष, गुरूकन्नाननगर येथील 12 वर्षीय मुलगी, 65 वर्षीय पुरूष, कागल येथील यशोदा पार्कमधील 29 वर्षीय पुरूष, आजरा तालुक्यातील निंनुगडे येथील 70 वषींय वृद्ध, हारूर येथील 64 वर्षीय पुरूष, करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील 42 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
जिल्हय़ात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी रात्री 10 वाजेपर्यत 2 हजार 120 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 445 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तसेच संशयित 246 जणांना आयसोलेटेड केले आहे. उपलब्ध 385 स्वॅब रिपोर्टपैकी 24 पॉझिटिव्ह आले आहेत. 359 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 725 झाली आहे. तसेच 15 पॉझिटिव्ह रूग्णांमुळे एकूण कोरोनाबाधित 865 झाले आहेत.
गडहिंग्लज येथे कर्नाटकातील 3 पॉझिटिव्ह, 20 कोरोंटाईन
गडहिंग्लज तालुक्यातील चार पॉझिटिव्ह रूग्णांत महागावची 27 वर्षीय महिला वगळता अन्य 3 रूग्ण कर्नाटकातील आहेत. यामध्ये केरूर येथील तरूण, बेळगाव येथील तरूण आणि बाळेकुंद्री येआाrल तरूणीचा समावेश आहे. दरम्यान, या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या गडहिंग्लज शहरातील 10 जणांना, महागाव येथील 5 जणांना, बाळेकुंदी येथील 5 अशा 20 जणांना कोरोंटाईन करण्यात आले आहे.
कोरोनाचा बारावा बळी हा न्यूमोनियामुळे
इचलकरंजी कुडचे मळा येथील 55 वर्षीय पुरूष 22 जूनला सीपीआरमध्ये दाखल झाला. त्याचा बुधवारी सकाळी 8 वाजता मृत्यू झाला. तो कोरोना पॉझिटिव्ह होता, त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने, न्यूमोनियाने झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
कोरोनामुक्तांची संख्या 725 वर ः डॉ. केम्पीपाटील
जिह्यात आजपर्यत 865 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 725 जणांना डिस्चार्ज दिला आहे. जिह्यात 128 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली. रात्री आठपर्यंत 15 पॉझिटिव्ह अहवालात आजरा 2, गडहिंग्लज 1, कागल 1, करवीर 1, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्र 6 व इतर राज्यातील तिघांचा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 81, भुदरगड 76, चंदगड 91, गडहिंग्लज 105, गगनबावडा 7, हातकणंगले 16, कागल 58, करवीर 26, पन्हाळा 29, राधानगरी 69, शाहूवाडी 186, शिरोळ 9, नगरपालिका क्षेत्र 48, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 47 असे 848 आणि पुणे 2, सोलापूर 3, मुंबई 2, नाशिक 1, सातारा 1, कर्नाटक 7, आंध्र प्रदेश 1 असे इतर जिल्हा व राज्यातील 17 मिळून 865 रुग्णसंख्या आहे. जिह्यातील 865 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 725 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. 12 जणांचा मृत्यू झाल्यामुळे उपचारार्थ दाखल रूग्णांची संख्या 128 असल्याचे डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितले.


previous post