Tarun Bharat

कोल्हापूर नाक्यावर 460 कोटींचा सहापदरी उड्डाणपूल होणार

प्रतिनिधी/ कराड

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 558 कोटी 24 लाख एवढा भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारणीसह महामार्ग दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांचा महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे. यात कोल्हापूर नाका (कराड) येथे 460 कोटी रूपये खर्चून सहापदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे महत्वाचा प्रश्न सुटणार आहे.

     कागल ते शेंद्रे महामार्गाच्या पटृयातील पाच धोकादायक ठिकाणांच्या (ब्लॅक स्पॉट) दुरुस्ती व सुधारणांसाठी तब्बल 646 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामधील पाच पैकी चार ठिकाणे ही सातारा जिल्हय़ातील असून त्यामध्ये मलकापूर (ता. कराड) येथील नव्या उड्डाणपुलासाठी 459 कोटी 52 लाख रुपये, मसूर फाटा येथील अंडर पास पुलासाठी 47 कोटी 18 लाख, इंदोली फाटा अंडर पास पुलासाठी 45 कोटी 35 लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूस दीड किलोमीटर अंतराच्या सेवा रस्त्यासाठी 6 कोटी 19 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या कामांची अंमलबजावणी सातारा-कागल महामार्गाच्या सहापदरीकरण कामाबरोबरच करण्यात येणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यांनी मागणी केलेल्या सदर कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे. 

    सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनी कामाचा धडाका लावला आहे. निवडणूक निकालानंतर त्यांनी लगेचच नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी  पत्रव्यवहार करुन तर अनेकदा त्यांना प्रत्यक्ष भेटून सातारा जिह्यातून जाणाऱया राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. सातारा ते कागल अशा 132 किलोमीटर अंतरामध्ये मार्गाची झालेली दुर्दशा, त्यामुळे वाहतुकीसाठी निर्माण होत असलेली धोकादायक परिस्थिती तसेच या पटृय़ात होणारे अपघातांचे प्रमाण आणि त्यामध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी याबाबत त्यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन नामदार गडकरी यांनी 22  सप्टेंबर 2020 रोजी पत्र लिहून त्यांना आपल्या मागणीप्रमाणे सातारा-कागल महामार्गावरील प्रमुख पाच धोकादायक व अपघात प्रवण ठिकाणे निश्चित करुन त्याची दुरुस्ती व सुधारणा करण्याचे काम हाती घेतले असल्याचे कळविले होते. त्यानंतरही नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या  बजेट अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या काळात  खासदार पाटील यांनी हे मुद्दे लावून धरत या मागण्या केल्या होत्या. या मागण्यांची सोडवणूक त्वरित केली जाईल, असे त्यावेळी गडकरी यांनी आश्वासित केले होते.

     सातारा जिह्यातून जाणाऱया महामार्गा संदर्भात केलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष्य देऊन मोठा निधी उपल्ब्ध करून दिल्याबद्दल मंत्री गडकरी यांचे खा. पाटील यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, जिल्हय़ातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील इतर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करुन त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला कळवण्यात यावेत. त्याबाबतही तातडीने निर्णय घेण्यात येथील, असे ठोस आश्वासन गडकरी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना लोकसभेत केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिले होते. त्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व आरटीओ अधिकाऱयांसोबत बैठक घेऊन जिल्हयातील सर्व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्याचे काम हाती घेणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले आहे.

Related Stories

Nashik Oxygen Leak : मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो याचिका; राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

Archana Banage

सांगली :शिक्षणातून पारधी समाजाचा पांग फेडला, दहावीच्या 2 मुलांचा केला गौरव

Archana Banage

सोलापुरात बुधवारी नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage

सदावर्ते यांचा अडचणींचा वनवास संपता संपेना, आता ‘हे’ पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता

Archana Banage

कोपार्डेत अडकलेल्या ८० खुदाई मजुरांना मदतीची गरज

Archana Banage

सातारा: १५० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर ४ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage