पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाले उल्लंघन; मुख्याधिकाऱ्यांनी केला दंड
प्रतिनिधी/इचलकरंजी
येथे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षसह ४५ नगरसेवकांना मुख्याधिकाऱ्यांनी दंडाची नोटीस बजावली आहे. आतापर्यंत एका सभापतीसह नगरसेवकाने दंड भरला आहे.
कोरोना संसर्गामुळे पालिकेची सर्वसाधारण सभा सहा महिन्यांपासून झालेली नव्हती. यामुळे पालिका प्रशासनाने बुधवार १६ सप्टेंबर रोजी ऑनलाईन सभा घेण्याचे नियोजन केले. पण सभेच्या दिवशी घडलेल्या काही घडामोडींमुळे ही सभा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेण्यात आली. श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत एकूण ९३ विषयांवर सुमारे साडेचार तास चर्चा झाली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे शहरातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
सोशल मिडियावर याबाबत पालिकेच्या कार्यपध्दतीबाबत मोठी टिका झाली होती. अखेर मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी कठोर भूमिका घेत बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षसह ४५ नगरसेवकांना प्रत्येकी २०० रूपये दंडाची नोटीस पाठवली आहे. शुक्रवारी एका सभापतींनी तर सोमवारी सकाळी एका नगरसेवकांनी दंड भरून पावती केल्याचे समजते. तसेच मुख्याधिकारी यांनीही दंड भरून पावती केली आहे.

