Tarun Bharat

कोल्हापूर : नॉन कोविड रूग्णांचा जीव टांगणीला!

उपचारासाठी मिळेनात हॉस्पिटल : खासगी दवाखाने फुल
शहरासह जिल्हय़ातील स्थिती : स्वतंत्र हॉस्पिटलच्या उभारणीची मागणी

संजीव खाडे / कोल्हापूर

कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या हॉस्पिटलसह सरकारी हॉस्पिटल कोविड सेंटर बनली आहे. सर्वात मोठा दवाखाना असणार्‍या सीपीआर रूग्णालयात तर केवळ कोरोनाच्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी रूग्णालये देखील हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे नॉन कोविड अर्थात इतर आजाराच्या रूग्णांवर उपचार करायचे तरी कुठे? असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. नॉन कोविड रूग्णांचे हाल सुरू असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी होत आहे.

शहरासह जिल्हय़ात सध्या कोरोनाचे रूग्ण दररोज मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. या रूग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागातील उपजिल्हा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत घेण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात सीपीआरसह महापालिकेच्या दवाखान्यात कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर विविध वसतिगृह, संस्थांच्या इमारती यामध्ये कोविड सेंटर उभारून उपचाराची सुविधा करण्यात आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्येही कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. कसबा बावडय़ातील सेवा रूग्णालयात सीपीआरमध्ये पूर्वी येणाऱया सर्व इतर आजाराच्या रूग्णांवर उपचार केले जात आहेत. पण तेथेही बेड आणि वॉर्डची मर्यादा आहे.

कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी एकीकडे कोविड सेंटर वाढत असताना आता नॉन कोविड रूग्णांच्या उपचाराचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, मेंदूचे विकार, पक्षाघात, किडनीचे विकार आदीसह इतर आजाराच्या रूग्णांना त्रास होऊ लागला अथवा प्रकृती गंभीर बनली तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी रूग्णांचे नातेवाईक करत आहेत.

खासगी दवाखान्यात नो एंट्री
नॉन कोविड रूग्णांची प्रकृती बिघडली, त्यांना ऑक्सिजन, व्हेटिंलेटरची गरज भासली तरी त्याला उपचार मिळतील यांची शाश्वती नाही, अशी स्थिती सध्या आहे. खासगी दवाखाने फुल्ल झाले असल्याचे कारण सांगत डॉक्टर अथवा दवाखान्याचे व्यवस्थापन नॉन कोविड रूग्णाला उपचारासाठी दाखल करून घेत नाहीत. त्यामुळे अनेक रूग्णांना केवळ उपचार न मिळाल्याने नाहक जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

दीड लाख भरा, दोन लाभ भरा मग ऍडमिट
कोरोनाच्या काळात शहरातील काही बडय़ा हॉस्पिटलमध्ये इतर आजाराचे रूग्ण दाखल होण्यासाठी आले तर दीड लाख, दोन लाख रूपये ऍडव्हान्स भरा मग पेशंटला ऍडमिट करून घेतो, असे सांगितले जाते. त्यामुळे रूग्ण आणि रूग्णांचे नातेवाईक बिथरून जातात. ऍडमिट केले नाही तर रूग्णाचा जीव जाईल ही भीती आणि हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी दीड दोन लाख आणायचे कुठून? या कात्रीत सापडलेल्या नातेवाईकांपुढे कर्ज काढणे, उसनवार करणे हेच मार्ग राहतात.

छोटे मोठे क्लिनिक, डॉक्टरांचा मोठा आधार
कोरोनाच्या काळात किरकोळ ताप, सर्दी, खोकला अथवा इतर त्रास झालेल्या रूग्णांना छोटय़ा मोठय़ा क्लिनिकच्या माध्यमातून खासगी डॉक्टर उपचार देत आहेत. त्या ठिकाणी रूग्णांची गर्दीही होत आहे. एकीकडे मोठ-मोठी हॉस्पिटल रूग्णांकडून वारेमाप पैसे उकळत असताना क्लिनिक चालविणारे डॉक्टर फॅमिली डॉक्टरप्रमाणे येणाऱया प्रत्येक रूग्णांवर उपचार करत आहेत. त्यातील काही कोविड पॉझिटिव्हही झाले. पण त्यातून बरे झाल्यानंतर अनेकांनी वैद्यकीय सेवा सुरू ठेवली आहे.

शासकीय अथवा महापालिकेचे रूग्णालय सुरू करा
नॉन कोविड रूग्णांवर उपचार करताना येणाऱया अडचणी आणि उपचाराचा मोठा खर्च पाहता जिल्हा प्रशासनाने शासकीय स्तरावर आणि महापालिकेने महापालिकेच्या स्तरावर नॉन कोविड हॉस्पिटल उभे करून गोरगरीब, मध्यमवर्गीय रूग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

स्वॅबचा रिपोर्ट आणा मग ऍडमिट करतो
नॉन कोविड रूग्ण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास गेला तर त्याला स्वॉबचा रिपोर्ट आणा मग ऍडमिट करू अशी उत्तरे काही हॉस्पिटलकडून दिली जात आहेत. मध्यंतरी करवीर तालुक्यातील एक गर्भवती महिला प्रसुती वेदना होऊ लागल्याने गंगावेश परिसरातील एका दवाखान्यात आली. तरी संबंधित दवाखान्यातील डॉक्टरने तिला कोरोचा टेस्ट करून या, स्वॉबचा रिपोर्ट आणा मग ऍडमिट करते, असे सांगून दवाखान्यात प्रवेश दिला नाही. विशेष म्हणजे ती महिला प्रारंभापासून त्याच दवाखान्यात उपचार घेत होती. नॉन कोविडच्या रूग्णांना अशा प्रकारे वागणूक काही हॉस्पिटल देत आहेत, अशाही तक्रारी आहेत.

स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांचे प्रयत्न
नूतन स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड उभारण्याचे आदेश देऊन प्रक्रिया सुरू केली आहे. या ठिकाणी महिला प्रसुतीगृह असल्याने नॉन कोविड रूग्णांच्या वॉर्डात महिलांवर उपचार केले जाणार आहेत. अन्य ठिकाणी नॉन कोविड हॉस्पिटल उभारणीसाठी सचिन पाटील यांचे प्रयत्न आहेत.

काय करायला हवे?
वॉड दवाखान्यात ऑक्सिजन बेडची सुविधा
शहरात जवळपास सर्व प्रभागात महापालिकेचे वॉर्ड दवाखाने आहेत. या वॉर्ड दवाखान्यात नॉन कोविड रूग्णांवर उपचार केले जातात. पण तेथे जर दवाखानाच्या क्षमतेनुसार ऑक्सिजन बेड ठेवले तर गंभीर स्थितीतील नॉन कोविड रूग्णांवर उपचार करणे शक्य होऊ शकते.

Related Stories

केएमटी पाठोपाठ टिपरांचाही ‘खुळखुळा’

Kalyani Amanagi

`गोकुळ’ च्या लढाईत जि.प.सदस्यांची उडी

Archana Banage

कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची फेरनिवड

Archana Banage

बिष्णोई टोळीकडून अंमली पदार्थ, शस्त्रांची तस्करी

Archana Banage

जांभळीत बेकायदेशीर ७५ हजाराचे देशी मद्य साठवणुक,विक्री करणाऱ्या एकास अटक

Archana Banage

शाहूवाडी तालुक्यात आज अखेर १०६ रूग्ण कोरोनामुक्त

Archana Banage
error: Content is protected !!