हातकणंगले / प्रतिनिधी
विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रवीण जणगोंड यांनी अचानक आळते येथील शाळेस भेट दिल्यानंतर शिक्षक जागेवर नसल्याने चांगलीच खळबळ उडाली. तर, जणगोंड यांनी संबंधित शिक्षकांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
आळते येथील केंद्र शाळा आळते येथे सकाळच्या सुमारास जणगोंड यांनी शाळेला अचानक भेट दिली असता शाळेत एकही शिक्षक नसून फक्त एक मदतनीस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता ही मदतनीसच सकाळी शाळेचे गेट उघडत असल्याचे माहिती मिळाली. यावेळी जणगोंड यांनी तात्काळ मुख्याध्यापकांशी मोबाइलवर संपर्क साधला असता मी रजेवर आहे व इतर शिक्षक येत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. मात्र या वेळेस सर्व कार्यालयाची दरवाजे तसेच महत्त्वाच्या फायली उघड्यावरच असल्याने या कागदपत्राला वाली कोण असा प्रश्न समोर आला. यावेळी तात्काळ प्रवीण यांनी मोबाईल वर व्हिडिओ शूटिंग करून सदर शूटिंग हे वरिष्ठ अधिकार्यांना पाठवले तात्काळ प्रशासन हरकतीत येथ संबंधित शिक्षकांच्या वर चौकशी सुरू केली असून योग्य ती कारवाई लवकरच करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळांचे सत्य समोर आल्याचे प्रवीण जणगोड यांनी म्हटले आहे.

