कबनूर (ता. हातकणगंले) येथे कारवाई, कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
प्रतिनिधी/इचलकरंजी
व्यापारी विद्युत जोडणीचे मीटर बसवल्याचे बक्षीस म्हणून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंत्यासह एजंट आणि सरकारी इलेक्ट्रिकल ठेकेदाराला रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली आहे. अटक केलेल्यांमध्ये कनिष्ठ अभियंता अमोल बाळासो कणसे ( रा. अवधूत आखाडा इचलकरंजी) असे लाचखोर कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे तर सरकारी इलेक्ट्रिकल ठेकेदार हारुण लाटकर (रा कबनुर )असे एजंटांचे नाव आहे.
या बाबत समजलेली माहिती अशी, कबनुर येथील तक्रारदराने आपल्या व्यवसाया करीता लागणाऱ्या विजेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीकडे अर्ज दाखल केला होता. तो अर्ज महावितरण कंपनीने मंजूर करून संबधित तक्रारदाराचे विद्युत जोडणी केली आहे. या जोडणीचे बक्षीस म्हणून तक्रारदाराकडे कनिष्ठ अभियंता अमोल कणसे याने 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. 5 हजारापैकी 2 हजार रुपयेची लाच कनिष्ठ अभियंता स्वीकारताना तर एजंट व सरकारी विद्युत ठेकेदार लाटकर याला 3 हजार रुपयांची लाच घेत असताना मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडून अटक केली.
ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंदक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुद्धवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, हवालदार शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम , विकास माने, सुनील घोसाळकर, आदींच्या पथकाने केली..