Tarun Bharat

कोल्हापूर : ‘पीटीएम’चा गोलकिपर शब्बीरचा मैदानावरच मृत्यू

टर्फ मैदानावरील सामन्यानंतर हृदयविकाराचा झटका, सामना जिंकून देत घेतला अखेरचा श्वास
कोल्हापूरच्या फुटबॉल जगतावर शोककळा : आज सकाळी 8 वाजता निवासस्थान ते कबरस्थान अंत्ययात्रा

प्रतिनिधी / कोल्हापूर

एकेकाळी पाटाकडील तालीम मंडळाचा स्टार गोलकिपर म्हणून कोल्हापूरच्या फुटबॉल जगतात लौकिक मिळविलेला शब्बीर गुलाब नायकवडे (वय 53, रा. आर. के. नगर) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने फुटबॉलच्याच मैदानावर निधन झाले. शब्बीर टर्फ मैदानावरील ज्येष्ठांचा फुटबॉल सामना खेळण्यासाठी गेले होते. त्यांनी सामन्यात भागही घेतला. पेनल्टीवर संघाला विजयी देखील केले. सामना संपल्यानंतर बाहेर येत असताना अचानक त्यांना मैदानावरच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शब्बीर सध्या एसटीत कंडक्टर म्हणून सेवेत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कोल्हापूरच्या  फुटबॉल जगतावर शोककळा पसरली आहे. शब्बीर यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, दोन बहीणी असा मोठा परिवार आहे. उद्या रविवार दि.4 रोजी सकाळी 8 वाजता शब्बीर यांच्या निवासस्थानापासून कबरस्थानापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

शब्बीर यांनी ऐशी आणि नव्वदच्या दशकात कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये अव्वल गोलकिपर म्हणून नाव कमवले होते. 1985 मध्ये पाटाकडील तालीम मंडळाकडून त्यांची फुटबॉल कारर्कीर्द सुरू झाली. पुढे त्यांनी प्रॅक्टीस फुटबॉल क्लबचेही प्रतिनिधीत्व केले. शिवाजी विद्यापीठाकडून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेतही चमक दाखविली होती. त्याकाळी शब्बीर यांनी पाटाकडील तालमीला अनेक सामने जिंकून दिले. पाटाकडीलचा गोलसेव्हर म्हणून त्यांची ख्याती होती. पेनल्टी स्ट्रोक असो वा सडनडेथ असो, त्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूने मारलेला फटका सूर मारत रोखण्यात त्यांचा हातखंडा होता. फुटबॉलमधील कामगिरीच्या जोरावर त्यांना राज्य परिवहन मंडळात अर्थात एसटीत कंडक्टरची नोकरीही मिळाली. तेथे सेवा बजावत ते फुटबॉलचा छंदही जोपासत होते.

मैदानावर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर शहरात टर्फची अनेक छोटी फुटबॉल मैदाने आहेत. त्यामध्ये फुटबॉल सामने होत असतात. शाहू दयानंद हायस्कूल समोरील टर्फ मैदानावर शनिवारी ज्येष्ठाच्या फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले होते. त्यामध्ये एका संघाकडून शब्बीर   हे आपला एकेकाळचा सहकारी रिची फर्नाडिस यांच्याबरोबरीने सहभागी झाले होते. वीस मिनिटांच्या या सामन्यात शब्बीर गोलरक्षक म्हणून उतरले. सामना बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टीवर निकाल झाला. शब्बीर यांनी पेनल्टीवर गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर ते रिची फर्नांडिस यांच्याबरोबर मैदानातून बाहेर येत असताना ते पाणी पित होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि ते जमिनीवर कोसळले. अचानक घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. शब्बीर यांना रिची फर्नांडिस आणि इतर सहकाऱयांना रिक्षातून खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी शब्बीर यांचे निधन झाल्याचे सांगितले.

सीपीआरमध्ये गर्दी

शब्बीर यांचा मृतदेह सीपीआरमध्ये नेण्यात आला. तेथे त्यांच्या नातेवाईक, मित्रपरिवारासह फुटबॉल जगतातील आजी माजी खेळाडूंनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

फुटबॉल जगतावर शोककळा

शब्बीर यांनी पीटीएमचा गोलकिपर ते एसटी कंडक्टर असा खडतर प्रवास केला होता.  निवृत्तीसाठी पाच वर्षे शिल्लक असताना त्यांचा फुटबॉल मैदानावरच मृत्यू झाला आहे. त्याच्या अशा अचानक जाण्यामुळे नातेवाईकांसह मित्रपरिवाराला धक्का बसला असून स्थानिक फुटबॉल विश्वावर शोककळा पसरली आहे.

शब्बीर परफेक्ट पेनल्टी काढायचा

सामना पेनल्टी स्ट्रोकवर गेला की शब्बीरची प्रतिस्पर्धी संघाला धास्ती असायची. शब्बीरने परफेक्ट पेनल्टी काढायचा (गोल रोखायचा), त्यात त्याची मास्टकरी होती, अशी आठवण सांगताना रिची फर्नांडिस, आनंदा ठेंबरे यांना अश्रू अनावर झाले. आमचा शबऱया पुन्हा दिसणार नाही हे पटत नाही, असेही रिची फर्नांडिस म्हणाले.

Related Stories

अपघाताचा बनाव करून मुलानेच केला वडिलांचा खून

Archana Banage

कोडोलीतील यशवंत रुग्णालय कोरोनासाठी वरदान

Archana Banage

शाहूवाडीतील 14 जण इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन

Archana Banage

आयुष प्रणालीद्वारे ‘पन्नास’ वरील नागरिकांना औषधे

Archana Banage

अपघातांचे प्रमाण वाढल्याने कुंभोज बायपास रस्त्याची मागणी

Abhijeet Khandekar

एनआयएचा कोल्हापुरात छापा, तरुण ताब्यात

Kalyani Amanagi