वार्ताहर / सिद्धनेर्ली
बामणी ता. कागल येथे मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतमजूर विधवा महिलेचे घर व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. तरुणांच्या प्रसंगावधानामुळे महिलेसह तिच्या मुलग्यास सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेमध्ये घराच्या छतासह , धान्य, भांडी,कागदपत्रे आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे दोन लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे ही शेतमजूर महिला उघड्यावर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की येथील आक्काताई शशिकांत सुतार या आपल्या मुलासह या कौलारू घरात राहतात. नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले असताना रात्री दिडच्या सुमारास घरामध्ये त्यांना मोठा आवाज आला. जाग येऊन पाहिले असता हा आवाज फ्रीजच्या स्फोटाच्या असल्याचे दिसले. व घरात आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब आरडाओरडा केला. त्यामुळे आसपासचे नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. जळत असलेल्या खोलीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी होती. दोन तरुणांनी या जळत्या खोलीमध्ये धाव घेऊन ही टाकी बाहेर काढली. अन्यथा या टाकीचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. शिवाय घरामध्ये असलेली मोटरसायकल सुद्धा सुखरूपपणे बाहेर काढली.
ग्रामसेवक संग्राम खाडे, तलाठी टी पी नाईक ,पोलीस पाटील महादेव कुंभार, सागर बाबर आदींनी या जळीत घराचा पंचनामा केला. दरम्यान हातावर पोट असलेल्या शेतमजूर महिले पुढे आता निवाऱ्यासह दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.


previous post