Tarun Bharat

कोल्हापूर : मणकर्णिका कुंडात सापडल्या ४५७ वस्तू

मूर्तींसह नाणी, रिव्हॉल्व्हर, बॅटरी, घड्याळ, भांड्यांचाही समावेश
प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांची माहिती

प्रतिनिधी / कोल्हापूर

देवतांच्या मूर्ती, दुर्मिळ नाणी, तांबे, काश्याची भांडी, कंदील, घड्याळ, बॅटरीसह जर्मन बनावटीची जुनी जीर्ण रिव्हॉल्व्हर, 8 बुलेट व काडतुसांचा संच असा जुना खजिनाच अंबाबाई मंदिरातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खननात मिळून आला. आजअखेर या उत्खननात 457 वस्तू सापडल्या असून, अखेरच्या टप्प्यात आणखी काही वस्तू सापडण्याची शक्यता सोमवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

या वस्तू कोणत्या काळातील आहेत, याची कालनिश्चिती करून त्याचे मंदिर परिसरात स्वतंत्र संग्रहालय करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, साठ बाय साठ फुट लांबीचे मणकर्णिका कुंड 65 वर्षांपूर्वी मुजवण्यात आले होते. पण धार्मिक अधिष्ठान व जलाशयाच्या बांधकामाचा एक प्राचिन नमुना नव्या पिढीसमोर यावा, या हेतूने त्याचे उत्खनन करण्याचा निर्णय समितीने घेतला. उत्खननाचे काम अंतिम टप्प्यात असून महिन्याभरात मूळ स्वरूपात मनकर्णिका कुंड दिसू लागेल. या कामात काही न्यायालयीन बाबी आल्याने त्याचेही निराकरण होईल.

उत्खननाचे हे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसारच सुरू आहे. पुरातत्वचे या कामाबाबत असलेले निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत. उत्खननामुळे कुंडाचे नेमके स्वरूप आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. तरीही न्यायालयीन प्रक्रियेमुळे एका भागाचे काम अपुरे आहे. कुंडात उतरण्यासाठी दक्षिण व उत्तर बाजुने दोन वाटा आहेत. पाच ओवऱ्या आहेत. कुंडाच्या चारही बाजूला शिवलिंग आहे. आतापर्यंत साडेदहा मीटरपर्यंतचा गाळ काढला आहे. आणखी अडीच ते तीन फुटावर तळ लागेल अशी शक्यता आहे.

उत्खननाचे हे सर्व काम सीसीटीव्हीच्या निगरानीखाली सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. सध्या 8 मिटर खोदाई झाली असून ज्या पायऱ्यांचे दगड तुटलेले नाहित, तेथे बांधकाम करून त्याला मूळ स्वरूप देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, हेरिटेज संवर्धन समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, अभियंता सुदेश देशपांडे, मंदिर व मूर्ती संशोधक उमाकांत राणिंगा, ऍड. प्रसन्न मालेकर उपस्थित होते.

कुंडात १६ जिवंत झरे

या कुंडाला 16 जिवंत पाण्याचे झरे आहेत. ते सर्व पुन्हा जिवंत होतील व कुंड पूर्वीप्रमाणे पाण्याने भरून जाईल, असा समितीचा कयास आहे. कुंडातील खर मातीची भर काढल्यानंतर काही झरे आताच जिवंत झाले आहेत. शिवलिंग घोड्यावर बसलेल्या पार्वतीची पितळी मूर्ती, 135 तांब्याची नाणी व बौद्ध किंवा जैन धर्माशी प्रथम दर्शनी साधर्म्य दिसणारी एक दगडी मूर्ती मिळाली आहे. याशिवाय 50 दगडी विरगळीही आहेत. कंदीलाची काच आजही जशीच्या तशी आहे. गेली साठ वर्षे दगड व मातीखाली दबलेल्या या कंदीलाची काच तत्कालीन काच निर्मितीतील दर्जा दाखवणारी आहे.

Related Stories

राज्य मागासवर्ग आयोगाच झालं काय ?

Abhijeet Khandekar

ग्रामीण भाग फटाकेमुक्त,शहरांचे काय ?

Archana Banage

एकाच दिवसातील तीन मृत्यूमुळे मंत्री मुश्रीफ तडक पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात

Archana Banage

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदत वाढली

Archana Banage

आण्णा गँगला मोका; गँगच्या म्होरक्यासह 9 जणांवर कारवाई

Abhijeet Khandekar