Tarun Bharat

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’चा आज पहिला दिवस

प्रतिनिधी / कोल्हापूर

देशातील 76 दिवसांच्या सार्वजनिक लॉकडाऊननंतर कोल्हापूर जिह्यात सोमवार 20 पासून पुन्हा 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरु होत आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या गतीने वाढू लागल्यामुळे लॉकडाऊन करावा की नको? याबाबत मोठा काथ्याकुट सुरु होता. परस्परविरोधी मते मांडली गेल्याने सामान्य जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस जनरेटा वाढल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह जिह्यातील लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनच्या निर्णायाला मान्यता दिली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी लॉकडाऊनच्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये किरकोळ बदल करून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

लॉकडाऊनच्या पुर्वसंध्येला नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडवून दिली. आणि या गर्दीकडे पोलीस व मनपा कर्मचारी मात्र असहाय्यपणे पाहत असल्याचे चित्र होते. शहरातील महाद्वार रोड, शाहूपुरी भाजी मार्केट, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, लक्ष्मीपुरी मार्केट आदी ठिकाणी मोठी गर्दी दिसत होती.

प्रतिबंधात्मक आदेशात किरकोळ बदल
जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी लॉकडाऊनबाबत काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये किरकोळ बदल करण्यात आला आहे. यामध्ये मूळ आदेशामध्ये केवळ बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सीची कामे सुरु करण्यास परवानगी दिली होती. आता सुधारीत आदेशानुसार सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱयांच्या उपस्थितीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. दुध संकलनासाठी सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत सुरु परवानगी दिली होती. नवीन आदेशानुसार दुध संकलन व वाहतूक सुरु राहणार आहे. ग्रामीण भागातील एमआयडीसी व औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक आस्थापनामध्ये 25 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. नवीन आदेशानुसार 50 टक्के कर्मचारी क्षमतेने उद्योगधंदे सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

जूनपासून कोरोना रुग्णात मोठी वाढ
देशभरात लागू केलेले लॉकडाऊन जूनच्या सुरुवातीपासून शिथिल केल्यानंतर बाहेरील जिल्हा आणि राज्यातील लोकांना ऑनलाईन पासद्वारे जिह्यात येण्यास परवानगी दिली. यावेळी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणाहून हजारो लोक कोल्हापूरात आले. तेव्हापासूनच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली. मे आणि जून महिन्याचा आढावा घेता या कालावधीत दररोज सुमारे 15 ते 25 रूग्णांची भर पडत होती. हा चढता आलेख जूनअखेर थोडा घसरला. जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला असून सुमारे 1 हजार रुग्णांची भर पडली आहे.

अनेक गावांत कोरोनाची दहशत
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने मास्क आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. तर मास्कशिवाय फिरणाऱया नागरिकांकडून दंडाचीही आकारणी केली जात आहे. लक्षणे दिसणार्‍या प्रत्येक नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. तरीही संसर्गाचे प्रमाण कमी होत नसून वाढतच चालले आहे. त्यामुळेच लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

नियमांचे पालन करून लॉकडाऊन यशस्वी करा- पालकमंत्री सतेज पाटील
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून जिल्ह्यात सात दिवसांचे कडक लॉकडाऊन केले आहे. या कालावधीत केणत्याही नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. जेणेकरून त्याचा इतरांना संसर्ग होणार नाही. प्रत्येकाने आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी. लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. कोणीही घराबाहेर पडू नये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन यशस्वी करावे.

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा – डॉ.योगेश साळे – जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.कोल्हापूर
आरोग्य विभागाने निश्चित केलेली कोरोनाची लक्षणे जाणवल्यास आपण त्याच्यापासून सोशल डिस्टन्स ठेऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो. पण लक्षणेच जाणवली नाही तर आपण त्याच्यासोबत खुलेपणाने वावरतो. त्यामुळे अशा व्यक्तीकडून मोठय़ा प्रमाणात संसर्गाचा धोका आहे. जिह्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे यापुढे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगसह ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’ या प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

Related Stories

शिराळा तालुक्यातील 50 पेक्षा जास्त वयाच्या लोकांची दैनंदिन तपासणी करावी : जिल्हाधिकारी

Archana Banage

चिंताजनक : नागपूरमध्ये दिवसभरात 60 मृत्यू, 3,630 नवे रुग्ण

Tousif Mujawar

कोपार्डेच्या जनावर बाजारात ३५ लाखाची उलाढाल

Archana Banage

व्याधीग्रस्त नागरिक, प्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस; आजपासून लसीकरणास सुरुवात

Archana Banage

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवारांची पक्षातून हकालपट्टी करा

Archana Banage

शरद पवार कोल्हापुरात दाखल

Archana Banage