वार्ताहर / नांदणी
जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार पासून लॉकडाऊन केले आहे. यामध्ये भाजीपाला वगळण्यात आले आहे. भाजीपाला हा अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतो. कोरोनामुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकर्यांच्या भाजीपाल्याच्या विक्रीवरील बंदी त्वरीत उठवावी, अन्यथा नुकसान झालेली भाजीपाला शासनाच्या दारात टाकू, असा इशारा स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने 23 मार्च पासून लॉकडाऊनमुळे शेतकरी अक्षरक्षः कंगाल झाला आहे. अनेक पिकांना दराअभावी टाकून द्यावी लागली. हजारो शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. सध्या कुठल्याच पिकाला भाव नाही. भाजीपाल्याचा ग्राहक कमी झाला आहे. यापुर्वी नुकसान झालेली भरपाई व्हावी म्हणून अनेक शेतकर्यांनी कर्जे काढून शेतात भाजीपाला पिकवलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाजीपाला विक्रीला बंदी घातलेली आहे. शेतात पिकलेला भाजीपाला काय करायचे ? हजारो टन भाजीपाला शेतात आहे. यावर बंदी घातल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. लॉकडाऊनला आमचा अजिबात विरोध नाही. भाजीपाला हा नाशवंत आहे. जिल्हा प्रशासनाने भाजीपाल्याला अत्यावश्यक सेवेमधून वगळले आहे. अनेक शहरात फिरून भाजीपाला विकण्यास परवानगी दिलेली आहे. भाजीपाला विक्रीमुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कुठे निदर्शनास आलेले नाही. सोशल डिस्टन्स ठेवून जिल्ह्यात शेतकर्यांना भाजीपाला विक्रीला परवानगी द्यावी, अन्यथा लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्यास सर्व भाजीपाला शासनाच्या दारात ओतून देऊन, त्याची नुकसान भरपाई प्रशासनाने द्यावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

