Tarun Bharat

कोल्हापूर : वाकरे नळपाणीपुरवठा योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पास निधी मंजूर

सौरऊर्जा प्रकल्पास निधी मिळवणारी वाकरे जिल्ह्यातील पहिलीच व एकमेव ग्रामपंचायत
सरपंच वसंत तोडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

प्रतिनिधी / वाकरे

वाकरे (ता.करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या नळपाणीपुरवठा योजनेस खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून सौरऊर्जा प्रकल्पासाठी सर्वसाधारण नियोजन समिती, जिल्हा वार्षिक योजनेतून ४९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सरपंच वसंत तोडकर आणि ग्रामविकास अधिकारी संभाजी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. नळपाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प निधी मिळवणारी वाकरे ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिलीच व एकमेव ग्रामपंचायत असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबतची सविस्तर माहिती देताना सरपंच तोडकर म्हणाले की वाकरे गावाला भोगावती नदीवरून पाणी उचलून ते प्राथमिक शाळेच्या आवारातील टाकीत सोडले जाते. तेथून सायफन पद्धतीने गावाला पाणी पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पाणीपुरवठ्यासाठी महिन्याला १ लाख रुपये आणि वार्षिक १२ लाख रुपये विज बिल होते. गावातील नळ कनेक्शन १२०० असून त्यामधून साडेचौदा लाख रुपये उत्पन्न मिळते. मात्र विज बिल आणि अन्य अनुषंगिक  खर्च वजा जाता पाणी पुरवठा विभाग चालवणे जिकिरीचे होते. या पाणीपुरवठ्यासाठी २० हॉर्स पॉवर वीज पंपाचा उपयोग केला जातो. 

यामधून ग्रामपंचायतीच्या खा. संजय मंडलिक यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यांनी सर्वसाधारण नियोजन समिती जिल्हा वार्षिक योजनेतून ४९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. या योजनेसाठी ५७ लाख रुपये खर्च असून ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून ७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. या सौरऊर्जा प्रकल्पातून २० हॉर्स पॉवर वीज पंपासाठी १०० किलो वॅट वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीची वर्षाकाठी १२ लाख रुपयांची बचत होणार आहे.

त्याचबरोबर ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून गावातील प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, गाव चावडी, अंगणवाडी इत्यादी ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे आणि सर्व शासकीय कार्यालये सौर विजेवर चालवली जाणार आहेत.एकूण या दोन प्रकल्पातून १३६ किलो वॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून सौर ऊर्जा प्रकल्प राबवणारी वाकरे ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे ते म्हणाले. या योजनेसाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील,जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचा यांत्रिक विभाग आणि ऊर्जा विभागाच्या तांत्रिक विभागाने चांगली मदत केली, त्यामुळेच हे हा प्रकल्प पूर्णत्वास जात असल्याचे त्यांनी सांगितले.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील,जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपसरपंच शारदा पाटील, माजी उपसरपंच कुंडलिक पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे या प्रकल्पासाठी सहकार्य लाभले असे ते म्हणाले.या प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली असून येत्या काही महिन्यात हा प्रकल्प गावतलावाच्या परिसरात उभा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सौरऊर्जा प्रकल्पातून पैशाची बचत होणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

Kolhapur : मणेर मळ्यातील दोघे अल्पवयीन मुले सापडली

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 20 बळी, 781 पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापुरात कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांमध्ये वाढ

Archana Banage

आयटीआयची प्रवेश प्रक्रिया जाहीर

Archana Banage

ए. डी. सायंटिफिक इंडेक्समध्ये विद्यापीठाचे ४८ संशोधक

Archana Banage

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक मे अखेर

Archana Banage